Month: May 2024

‘कोजागिरी पोर्णिमेच्या चांदण्यात ताजमहालचे थडगे पहाण्यापेक्षा रायगडाचे दर्शन घ्या’!

शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजेश उर्फ राजू देसाई यांची आग्रही भूमिका जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला  उत्साहात संपन्न मुंबई : कोजागिरी पोर्णिमेच्या चांदण्यात आग्र्याला जाऊन ताजमहालचे थडगे पहाण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडाचे दर्शन घ्यावे, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजेश उर्फ राजू देसाई यांनी आग्रही भूमिका मांडली. बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत एका प्रकट मुलाखतीत शिवभक्त राजेश उर्फ राजू देसाई यांनी ही भूमिका मांडली. शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि शिवभक्त श्री राजू देसाई यांनी १७ मार्च २०२४ रोजी पाचशेव्यांदा रायगड सर करुन एक ऐतिहासिक अभिनव विक्रम पूर्ण केला. यानिमित्ताने ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री. विजय वैद्य यांच्या संकल्पनेतून तसेच प्रा. सौ. नयना रेगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शिवभक्त श्री राजू देसाई यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम यंदाच्या ४२ व्या वर्षाच्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत आयोजित करण्यात आला होता. पाचशेव्यांदा रायगड सर केल्याबद्दल राजू देसाई यांना शिवरायांच्या मावळ्याची पगडी आणि संपूर्ण मावळ्याची वस्त्रे, शाल श्रीफळ देऊन विजय वैद्य यांच्या शुभहस्ते तर सौ. रेवा राजू देसाई यांना साडी, खण आणि श्रीफळाची ओटी भरुन सौ. माया योगेश त्रिवेदी यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी प्रकट मुलाखत घेतांना प्रश्नांच्या उत्तरांच्या ओघात राजू देसाई यांनी संपूर्ण शिवकाल उपस्थितांसमोर उभा केला.  प्रत्येक शाळेमध्ये रोज शिवरायांची आरती प्रार्थनेवेळी लावण्यात यावी. तसेच कोजागिरी पोर्णिमेच्या चांदण्यात ताजमहाल नावाचे थडगे पहाण्यापेक्षा रायगडाचे दर्शन घ्यावे. अरबी समुद्रातील शिवस्मारकाबद्दल विचारले असता देसाई म्हणाले की, या स्मारक बांधणीचा कोट्यावधी रुपयांचा खर्च गडकिल्यांसाठी वापरावा कारण गडकिल्ले हेच छत्रपतींचे खरे स्मारक आहे‌. छत्रपती शंभूराजे यांचे औरंगजेबाने जे अतोनात हाल केले तो संपूर्ण प्रसंग राजू देसाई यांनी उपस्थितांसमोर सादर केला तेंव्हा उपस्थित शिवभक्तांच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याच भारलेल्या वातावरणात प्रकट मुलाखतीची सांगता झाली. एका रात्रीत टकमक टोक चढून जाण्याचा रोमांचकारी आणि अंगावर काटा उभा राहण्याचा प्रसंग, राजू आणि रेवा देसाई यांचा मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने झालेला शुभविवाह, छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगण्यात येणे, राज्याभिषेक नव्हे तर राजाभिषेक असे ठासून सांगणे या शिवचरित्र कथनामुळे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेतील या कार्यक्रमास श्रोत्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सौ‌. नयना रेगे यांनी केले. पाच दिवसांच्या या वसंत व्याख्यानमालेत  लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे यांचा शाहिरांचा पोवाडा, रवींद्र देवधर, हृषिकेश कानडे आणि नयना रहाळकर यांनी सादर केलेला ‘मी भारतीय’ हा दीर्घांक; ख्यातनाम सदाबहार चित्रपट अभिनेते देव आनंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रख्यात चित्रपट समीक्षक श्री. दिलीप ठाकूर यांनी सांगितलेल्या असंख्य आठवणी आणि संतोष पिसाट, प्रमोद कुंभार, संगीता मिरकर, रश्मी मुळे व सहकाऱ्यांनी सादर केलेली अजरामर गाणी; विजय मडव(शारदा), दिलीप चव्हाण, वसंत सावंत(जय महाराष्ट्र नगर भूषण), विजय घरटकर(प्रेरणा), हर्षिता वायंगणकर(मल्लखांब सुवर्ण पदक) यांना शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आलेले विविध पुरस्कार; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्याम कदम यांनी ४२ व्या व्याख्यानमाले निमित्त श्री. विजय वैद्य यांना ४२ गुलाबपुष्पांची माळा व शाल देऊन सन्मानित केले. सातत्याने ४२ वर्षे जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत उपस्थिती लावणारे वर्तक गुरुजी यांनाही सन्मानित करण्यात आले. अनेकांनी आठवणी कथन केल्या. सचिन वगळ यांनी पुरस्कार सन्मानित मान्यवरांच्या सन्मान पत्राचे आपल्या खड्या आवाजात वाचन केले.

पथनाट्यांतून पर्यावरण विषयक जनजागृती

‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत नवी मुंबई : शहरातील पर्यावरण सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविले जात असून नवी मुंबई महानगरपालिकेने अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवत नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. यावर्षीही ‘माझी वसुंधरा अभियान’ 4.0 अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये लोकसहभागावर विशेष भर देण्यात येत असून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरण विषयक जनजागृती करताना पथनाट्यासारख्या लोकांना चटकन् भावणा-या माध्यमाचा प्रभावी उपयोग करण्यात येत असून 21 मेपासून नमुंमपा क्षेत्रातील आठही विभागांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी दैनंदिन जीवनात प्रत्येक माणसाने करावयाच्या छोट्या छोट्या बाबींची माहिती पथनाट्यांच्या माध्यमातून त्यावर हसत खेळत भाष्य करीत सादर करण्यात आली असून या माध्यमातून जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या आठही विभागांत गर्दी असते अशा मुख्य 22 ठिकाणी सादर झालेल्या माझी वसुंधरा अभियानविषयक पथनाट्यांना उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला असून पथनाट्य सादरीकरण करणा-या कलावंत समुहाचे उपस्थिांकडून कौतुक झाले आहे. पथनाट्याप्रमाणेच मोठ्या सोसायट्यांमध्ये जाऊन माझी वसुंधरा अभियानामध्ये पर्यावरण संवर्धन माहितीपूर्ण कार्यशाळा आयोजित करूनही जनजागृतीवर भर दिला जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (2) श्री. शिरिष आरदवाड यांनी दिली आहे.

कोकण पदवीधर निवडणूक मतदान 26 जूनला

28 मेपर्यंत करता येईल पदवीधर मतदार नोंदणी ठाणे : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे 28 मे 2024 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची मतदार नोंदणी करावयाची आहे. तरी जिल्ह्यातील अद्यापही नोंदणी न केलेल्या पात्र पदवीधारकांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, असे  आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अर्चना कदम यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने 24 मे 2024 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची मुदत दि.7 जुलै, 2024 रोजी समाप्त होणार आहे. या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे :- निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्दी करण्याचा दिनांक 31 मे, 2024 (शुक्रवार), नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक 7 जून, 2024 (शुक्रवार), नामनिर्देशनपत्रांची छाननी दि.10 जून, 2024 (सोमवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 12 जून 2024 (बुधवार), मतदानाचा दिवस 26 जून 2024 (बुधवार) आणि मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजता, मतमोजणीचा दिनांक 1 जुलै 2024 (सोमवार), निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 5 जुलै 2024 (शुक्रवार). दि. 24 मे 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संबंधित मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नमुना नं. 18 भरुन सादर करावयाचा आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे दि. 28 मे, 2024 पर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची मतदार नोंदणी करावयाची आहे. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने करण्याची (de-nova) असल्याने सर्व पात्र उमेदवारांनी नव्याने नमुना क्र. 18 भरणे आवश्यक आहे. ही मतदारयादी नव्याने तयार करावयाची असल्याने जुन्या यादीत जरी आपले नाव असले तरीही नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. नमुना नं. 18 हस्तलिखित / टंकलिखित किंवा खासगीरित्या छापलेले अर्ज देखील स्वीकारले जातील. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदणीसाठी पदवीधर मतदारास नमुना नं.18 पुढील ठिकाणी सादर करता येईल 1) संबंधित तहसिलदार कार्यालय / उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय किंवा 2) मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://gterollregistration.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल.

प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवा – आयुक्त डॉ. कैलास शिंदे

प्रतिबंधात्मक कारवाईत ८५ हजार दंडात्मक रक्कम तसेच ३९.७५० किलो प्लास्टिक जमा अशोक गायकवाड नवी मुंबई : एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईत ८५ हजार दंडात्मक रक्कम तसेच ३९.७५० किलो प्लास्टिक जमा करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ही एकल प्लास्टिक वापर प्रतिबंधात्मक कारवाई अशीच सुरू राहणार असून नागरिकांनी पर्यावरणास व मानवी जीवनास विघातक अशा एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.* नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र एकल वापर प्लास्टिकमुक्त असावे यादृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने याविषयी जनजागृती करण्यासोबतच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. सर्वच विभाग कार्यक्षेत्रात संबंधित विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. अशा एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेअंतर्गत १५ ते २२ मे २०२४ या आठवड्याभराच्या कालावधीत विभागीय कार्यक्षेत्रात ७१ ठिकाणी तपासणी करण्यात आली आणि दंडात्मक कारवाई तसेच प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये दोषी आढळलेल्या १७ व्यावसायिक व आस्थापनांकडून एकूण रू. ८५ हजार दंडात्मक रक्कम तसेच ३९ किलो ७५० ग्रॅम प्लास्टिक पिशव्यांचा साठा तसेच एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले. यामध्ये बेलापूर विभागात ७ व्यावसायिक / आस्थापनांवर कारवाई करीत ३५ हजार दंडात्मक रक्कम व २४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. वाशी विभागात ३ व्यावसायिक / आस्थापनांवर कारवाई करीत १५ हजार दंडात्मक रक्कम व ३ किलो एकल वापर प्लास्टिकची जप्ती केली. ऐरोली विभागातही व्यावसायिक / आस्थापनांवर कारवाई करण्यात आली व त्यामध्ये 15 हजार दंड वसूली व 10 किलो 500 ग्रॅम एकल वापराचे प्लास्टिक जप्ती करण्यात आली. परिमंडळ 2 विभागाच्या भरारी पथकाने 4 व्यावसायिकांवरील कारवाईत 20 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 2 किलो 250 ग्रॅम एकल वापर प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. अशाप्रकारे या आठवड्यात 17 व्यावसायिक / आस्थापनांकडून 85 हजार दंडात्मक रक्कम वसूली तसेच 39 किलो 750 ग्रॅम एकल वापर प्लास्टिकचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ही एकल प्लास्टिक वापर प्रतिबंधात्मक कारवाई अशीच सुरू राहणार असून नागरिकांनीही पर्यावरणास व मानवी जीवनास विघातक अशा एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा असे आवाहन करण्यात येत आहे.

डोंबिवलीत देवीचापाडा येथे गर्दुल्ल्यांचा रिक्षा चालकावर हल्ला

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील देवीचापाडा, मोठागाव, गणेशनगर उल्हास खाडी किनारा भागात गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळेत गर्दुल्ले, चरस-गांजा सेवन करणारे, मद्यपी यांची वर्दळ वाढली आहे. या भागातील झाडे, झुडपे, मोकळ्या मैदानांचा आधार घेऊन ही मंडळी पोलिसांचा धाक नसल्याने बिनधास्त नागरिकांना उपद्रव देत आहेत. रविवारी रात्री देवीचापाडा गोपीनाथ चौक येथे एका रिक्षा चालकावर एका गर्दुल्ल्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आहे. जगदीश म्हात्रे असे रिक्षा चालकाचे नाव आहे. ते गोपीनाथ चौकातील सद्गुरू दर्शन सोसायटीत राहतात. माजी नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांचे ते नातेवाईक आहेत. रविवारी रात्री वाढत्या उष्णतेमुळे जगदीश म्हात्रे घराच्या बाहेर बसले होते. त्यावेळी रात्रीच्या वेळेत सद्गुरू दर्शन सोसायटी लगतच्या भरत भोईर नाल्याच्या कट्ट्यावर, काही जण नाल्या जवळील झाडाखाली चरस-गांजा यांचे सेवन करत बसले होते. काही जण मद्यपान करत टोळक्याने बसले होते. ही टोळकी मद्य सेवन करून या भागात ओरडा करत होती. रात्रीची वेळ झाली असल्याने लोकांना सोमवारी कामाला जायचे आहे. ओरडा करू नका असे रिक्षा चालक जगदीश म्हात्रे यांनी घरा जवळून चाललेल्या गर्दुल्ल्यांना सांगितले. त्याचा राग एका गर्दुल्ल्याला आला. त्याने काही क्षणात जगदीश म्हात्रे यांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण करत हातामधील धारदार स्टीलच्या कड्याचा वार रिक्षा चालक जगदीश यांच्या नाकावर केला. नाकातून रक्त वाहू लागले. त्यानंतर दुसरा वार हल्लेखोराने रिक्षा चालकाच्या डोळ्यावर करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर गर्दुल्ल्याने रिक्षा चालकाला जोराने जमिनीवर ढकलून देऊन हल्लेखोर पळून गेला. विष्णुनगर पोलिसांना ही माहिती म्हात्रे यांनी दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी आले. हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी परिसरात घेतला पण ते या भागातून पळून गेले होते. देवीचापाडा येथील कलावती आई मंदिराजवळील एका मोकळ्या भूखंडावर दररोज रात्री आठ ते रात्री ११ वाजेपर्यंत मद्यपींचे एक टोळके उघड्यावर मद्य सेवन करण्यासाठी बसते. मद्याची गुंगी चढल्यावर ते अश्लिल भाषेत शिवीगाळ करतात. पादचाऱ्यांना टोमणे मारतात. कलावती आई मंदिरात अनेक भाविक उपसना करण्यासाठी आलेले असतात. काही जण प्रार्थना करतात. त्यांनाही या मद्यपींचा उपद्रव वाढला आहे. परिसरातील सोसायटी, चाळींमधील रहिवासी या मद्यपींच्या त्रासाला कंटाळले आहेत. मागील काही महिन्यांपासून उघड्यावर हे मद्यपी मद्य सेवन करत आहेत. विष्णुनगर पोलिसांनी रात्रीच्या वेळेत खाडी किनारची झुडपे, झाडे परिसरात गस्त घातली तर गांजा सेवन करणारे, मद्यपी टोळकी सापडण्याची शक्यता रहिवाशांकडून वर्तवली जात आहे. रिक्षा चालकावर हल्ला झाल्याने रिक्षा चालक संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली आहे.

जितेंद्र आव्हाड महाड येथे बुधवारी करणार मनुस्मृतीचे दहन !

अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने  राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड हे या मुद्द्यावरुन कमालीचे आक्रमक झाले आहेत. शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या हालचालींना जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी जितेंद्र आव्हाड बुधवारी महाड येथे जाऊन मनुस्मृतीची होळी करणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथेच मनुस्मृतीची होळी केली होती. ही बाब लक्षात घेत सरकारचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड देखील महाड येथेच मनुस्मृतीची होळी करणार आहेत. मनुस्मृतीमधील तीन श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयाविरोधात डॉ. जितेंद्र  आव्हाड यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आव्हान केले आहे. ज्या मनुस्मृतीने स्त्रियांचे अधिकार नाकारले, ज्या मनुस्मृतीमुळे आपले पूर्वज ५००० वर्ष त्रासात जगले, तीच मनुस्मृती पुन्हा एकदा हे सरकार आणत आहे, याचा तीव्र विरोध व्हायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी या मनुस्मृतीचे दहन केले, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊन याचं दहन करणार आहोत आणि सरकारचा निषेध करणार आहोत त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. सत्ताधारी मागच्या दाराने त्यांच्या मनातील गोष्ट पूर्ण करु पाहत आहेत. आमच संविधान म्हणजेच मनुस्मृती, असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं, त्याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांचा यादीत पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश होत आहे. ज्या मनुस्मृतीने भारताच्या वाटोळं केलं, समाजात दुही माजवली आहे, समाजामध्ये चातुवर्ण्याचा समावेश केला, जातीभेद निर्माण केला, स्त्रियांना तर सर्वात घाणेरडी वागणूक घेण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्मला घातली, ती मनुस्मृती परत आणली जात आहे. जे लोक १९५० साली म्हणाले की, आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही, आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती. तेच लोक आता मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत.  तुम्हाला आणि आम्हाला संविधान वाचवायचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ मध्ये मनुस्मृती दहन केलं आणि १९५० मध्ये संविधान जन्माला घातलं त्यासाठी आपण महाडला जात आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीच दहन करतोय, संविधानासाठी दो बलिदान, असे डॉ.  जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. सुरबानानांचे नातू करणार मनुस्मृतीचे दहन २५ डिसेंबर १९२७ रोजी मंचावर सहस्रबुद्धे, चित्रे, चिटणीस आदी उपस्थित होते. त्यांच्या समोर डॉ.  बाबासाहेब आंबेडकर हे मनुस्मृतीमधील प्रत्येक अध्याय वाचून दाखवत होते. मनुस्मृतीमधील हे अध्याय मंजूर आहेत का, असेही विचारत होते. त्यावेळेस लोकांकडून उत्स्फूर्तपणे नाही असेच उत्तर येत होते. त्यानंतर त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय जाहीर केला अन् मनुस्मृती जाळत असताना त्यांनी सहस्रबुद्धेंना विचारले, तुम्हाला मनुस्मृती जाळणे मान्य आहे का? त्यावर सहस्रबुद्धे म्हणाले, ब्राह्मण म्हणून नाहीच; पण, माणूस म्हणून तर नाहीच नाही! या सर्वांच्या मागे जी शक्ती उभी होती ती म्हणजे तत्कालीन नगराध्यक्ष सुरबानाना उपाख्य  चिटनीस  यांचे नातू मिलींद चिटणीस यांच्या हस्ते एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून बुधवारी मनुस्मृती जाळण्यात येणार आहे, असेही डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने, माजी पंतप्रधान, भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी.जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी, महापालिकेचे विधी सल्लागार मकरंद काळे, सहाय्यक आयुक्त (लोकमान्य नगर-सावरकर नगर प्रभाग समिती) भालचंद्र घुगे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर, उथळसर प्रभाग समितीत, आंबे-घोसाळे तलावाशेजारी असलेल्या पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

मैन्युअल स्कैवेंजिंग विरोधी कायद्याचे ठामपाकडून खुलेआम उल्लंघन-जगदीश खैरालिया

कायद्याच्या अंमलबजावणीसाठी  पुणे समाज कल्याण आयुक्तांची नोडल ऑफिसर नेमणुकीची शासनाची न्यायालयात माहिती अनिल ठाणेकर ठाणे महानगरपालिका हद्दीत भूमिगत गटारे सफाई करतांना कंत्राटी कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा सुविधा पुरविल्या जात नाही, याबाबतची तक्रार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. मैन्युअल स्कैवेंजिंग विरोधी कायद्याच्या तरतुदींचे ही खुलेआम उल्लंघन महापालिका प्रशासन आणि ठेकेदार करत असल्याने या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आता महाराष्ट्र शासनाने २ मे २०२४ पासून समाज कल्याण आयुक्त, पुणे यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केली असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला सुनावणी दरम्यान दिली आहे. यामुळे मृतक सफाई कामगारांच्या कुटुंबातील वारसांना आता नोडल ऑफिसर यांच्याकडेही दाद मागता येईल, अशी माहिती श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत भूमिगत गटारे सफाई करतांना कंत्राटी कामगारांना कोणत्याही सुरक्षा सुविधा पुरविल्या जात नाही. या बाबतीत श्रमिक जनता संघाचे महासचिव जगदीश खैरालिया यांनी सफाई कामगार गटारात काम करतांनाचे विडिओ आणि फोटो सहित महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रारही केली आहे. किमान वेतन अधिनियम १९४८ आणि मैन्युअल स्कैवेंजिंग विरोधी कायद्याच्या तरतुदींचे ही खुलेआम उल्लंघन महापालिका प्रशासन आणि ठेकेदार करत असल्याचे आरोप ही जगदीश खैरालिया यांनी केले आहे. या अगोदर मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेत १६ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना मानवी मैला सफाई प्रतिबंध कायद्याच्या तंतोतंत अंमलबजावणीचे अंतरिम आदेश दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला मॉनिटरिंग कमिटीची किमान सहा महिन्यांत एकदा मीटिंग घेऊन राज्यातील मैन्युअल स्कैवेंजिंग/ सीवर डेथ प्रकरणी पुनर्वसन बाबत आढावा घेण्यासाठी  आदेश श्रमिक जनता संघाने दाखल करण्यात रिट याचिका क्र.१५७०/ २०२३ मध्ये १० मे २०२४ रोजी दिले आहे. तसेच मैन्युअल स्कैवेंजिंग विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केलेले समाज कल्याण आयुक्त, पुणे यांना रिट याचिका क्र.१५७०/ २०२३ मध्ये  प्रतिवादी म्हणून सामिल करण्यासाठी श्रमिक जनता संघ युनियनच्या मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाने २ मे २०२४ पासून समाज कल्याण आयुक्त, पुणे यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केली असल्याची माहिती  मुंबई उच्च न्यायालयाला सुनावणी दरम्यान दिली आहे.

कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागा अंतर्गत  श्री. बजरंग महादेव गोळे, रूम नंबर 335 सेक्टर-15 कोपरखैरणे, नवी मुंबई व श्री. कारभारी रामभाऊ ढोले, रूम नंबर 122 सेक्टर 05, कोपरखैरणे, नवी मुंबई. यांनी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे आर.सी.सी. स्वरूपाचे बांधकाम सुरू केले होते. अनधिकृत बांधकामास कोपरखैरणे विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये अनुक्रमे दि.29/02/2024 व दि.26/03/2024 रोजी नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. सदरची दोन्ही अनधिकृत बांधकामे आज दिनांक 24/05/2024 रोजी निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, 08 मजूर, 01 गॅस कटर, 02 ब्रेकर, 1 पीकअप व्हॅन कारवाई करीता वापर करण्यात आले. तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.