Month: May 2024

यांत्रिक मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीस मनाई

ठाणे : मासळी साठ्यांचे जतन तसेच मच्छिमारांच्या जिवित व वित्त यांचे रक्षण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश, 2021 अन्वये यावर्षी 01 जून  ते 31…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना आनंद परांजपे यांनी केले अभिवादन

ठाणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी,  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, मासुंदा तलाव, जांभळी नाका, ठाणे येथील स्मारकास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ठाणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला त्यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार संजय भोसले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जॅकलीन फर्नांडिसच्या योलो फाउंडेशनची उन्हाळ्यात वॉटर बाऊल वितरण मोहीम

  ठाणे : प्रसिद्ध अभिनेत्री आणि योलो फाऊंडेशनच्या संस्थापक जॅकलीन फर्नांडिसने सिटीझन् फॉर अॅनिमल प्रोटेक्शन फाऊंडेशन (CAP) यांनी रस्त्यावरील प्राण्यांना मदत करण्यासाठी मुंबई आणि उपनगरात वॉटर बाऊल वितरण मोहीम सुरू…

ठाण्यातील ९६३ शाळांसह १६६ आरोग्य संस्था तंबाखू मुक्त

ठाणे : शासकीय संस्थांसह शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या होणाऱ्या विक्रीमुळे विद्यार्थ्यांना त्याचे व्यसन जडण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सलाम फाऊंडेशन, मुंबई यांच्या सहकार्यातून ‘तंबाखूमुक्त शाळा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमातून ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील ९६३ शाळा तर, १६८ आरोग्य संस्था तंबाखूमुक्त झाल्या आहेत. तर, दुसरीकडे कोपटा कायद्यानुसार २०५ जणांवर दंडात्मक कारवाई करीत ४१ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर समोर आली आहे. भारतासारख्या विकसनशील देशातील तरुणाईला तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाने ग्रासले आहे. अशातच ज्या ठिकाणी देशाची भावी पिढी संस्कारक्षम व्हावी, धूम्रपान, मद्यपान या अनिष्ट व्यसन प्रवृत्तीपासून ती दूर राहावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार शाळा व शाळा परिसर हा तंबाखूमुक्त असावा, यासाठी तंबाखूमुक्त शाळा या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेच्या आवारात जनजागृतीचे तीन फलक लावण्यात आले आहेत. तसेच ज्या शाळा तंबाखूमुक्तीचे ११ निकष पूर्ण करतील, अशा शाळांना तंबाखूमुक्त म्हणून घोषित केले जाते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील शहरी भागातील शाळांसह ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची सलाम मुंबई फाऊंडेशनच्या ॲपवर नोंद करण्यात येत असते. नोंदणी झालेल्या शाळांपैकी ज्या शाळांनी तंबाखूमुक्तीचे ११ निकष पूर्ण केले, अशा ९६३ शाळा तंबाखूमुक्त म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर, दुसरीकडे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, नगर परिषद अशा १६६ शासकीय संस्थादेखील तंबाखूमुक्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. ठाणे जिल्ह्यात सलाम मुंबई फाऊंडेशन आणि जिल्हा तंबाखू नियंत्रण विभागाच्या माध्यमातून तंबाखू सेवनापासून प्रवृत्त करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. तर, तंबाखूमुक्ती केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत १२ हजार १३९ तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्याचे समुपदेशन केले. या समुपदेशनाची फलश्रुती म्हणजे १४९ जण तंबाखूमुक्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. २०५ जणांवर दंडात्मक कारवाई ठाणे जिल्ह्यातील शासकीय संस्था, आरोग्य विभाग आणि रस्त्यावर तंबाखूचे सेवन करून थुंकणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील वर्षी एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत तंबाखूचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालयाच्या आवारात थुंकणाऱ्या ८७० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात एक लाख ६३ हजार ९१० रुपयांचा दंड वसूल केला. तर, यंदा एप्रिलमध्ये २०५ जणांवर कारवाई करीत ४१ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

कल्याण शहराला कोंडीचा विळखा

कल्याण : कल्याण शहरातील वाहन कोंडीची समस्या सुटता सुटत नसल्याने प्रवासी हैराण आहेत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत कल्याण पूर्व, पश्चिमेतील बहुतांशी रस्ते वाहन कोंडीत अडकत असल्याने यामध्ये कामावरून परतणाऱ्या नोकरदारांचे सर्वाधिक हाल होत आहेत. या कोंडीतून सुटण्यासाठी एक ते दीड तास लागत आहे. कल्याण शहरातील अरूंद रस्ते, दामदुपटीने वाढलेली वाहने आणि वाहनतळांच्या सुविधा नसल्याने रस्तोरस्ती दुतर्फा उभी करून ठेवण्यात आलेली मोटारी, टेम्पोसारखी वाहने या कोंडीत सर्वाधिक भर घालत आहेत. कल्याण रेल्वे स्थानक भागात तर मागील पाच वर्षापासून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उड्डाण पूल उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे हा भाग सतत कोंडीत असतो. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक, महमद अली चौक, गुरुदेव हॉटेल चौक, संतोषी माता रस्ता, सहजानंद चौक भागातून वाहनांची सर्वाधिक वर्दळ असते. कल्याण पश्चिमेतील पूर्व भागात जाण्यासाठी बहुतांशी मोटार चालक, अवजड वाहन चालक रामबागेतील गल्ल्यांचा वापर करतात. ही वाहने या गल्ल्यांमधून मुरबाड रस्त्यावर येऊन बाईच्या पुतळ्याकडे वळण घेत असताना कल्याण रेल्वे स्थानकाकडून येणारी आणि स्थानकाकडे जाणारी वाहने या कोंडीत अडकतात. याठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने दुचाकी स्वार या कोंडीत आणखी भर घालतात. कल्याण वाहतूक विभागाच्या हाताबाहेर परिस्थिती जाण्यापूर्वी ही कोंडी आटोक्यात आणण्याची मागणी होत आहे. कल्याण पश्चिमेतील वाहतूक कोंडीत अडकायला नको म्हणून अनेक वाहन चालक कल्याण पूर्व भागातून एफ केबिन पुलावरून कल्याण पश्चिमेत येतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील बस थांबे बंद करण्यात आल्याने हे थांबे गोविंद करसन चौकात सुरू करण्यात आले आहेत. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील या बसमुळे कोंडी होते. दुर्गाडी पूल, आधारवाडी भागातून येणारी वाहने सहजानंद चौक येथून संतोषी माता रस्त्याने रामबागेतून मुरबाड रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतात. ही वाहने कल्याण शहरात सर्वाधिक कोंडी करत आहेत. कल्याण शहरात मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर टोलेजंग इमारती उभारण्यास पालिकेच्या नगररचना विभागाने परवानग्या दिल्या आहेत. अनेक इमारतींच्या तळ मजल्याची वाहनतळे पालिका नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी अधिमूल्य भरणा करून तेथे सदनिका उभारणीस किंवा तेथील वाहनतळ रद्द करून देण्यास विकासकांना मोलाची मदत केल्याने या नवीन इमारतींमधील सर्व वाहने रहिवासी रस्त्यावर उभी करतात. पालिका आयुक्तांसह नियत्रक अधिकाऱ्यांचे शहरावर नियंत्रण राहिले नसल्याने पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील रस्ते जागोजागी खोदून ठेवण्यात आले आहेत. पत्रीपुलाजवळ नेहमीप्रमाणे कोंडीला सुरूवात झाली आहे. नागरिकांना होणाऱ्या त्रासाविषयी पालिकेसह वाहतूक विभागाला सजगता नसल्याने नागरिक संतप्त आहेत. अगोदर उन्हाचे चटके, त्यात कोंडीचा त्रास अशा दुहेरी कोंडीत सध्या कल्याणमधील नागरिक अडकले आहेत. पावसाळ्यापूर्वीचे सामान घर खरेदीसाठी कल्याण शहरा जवळील मुरबाड, शहापूर भागातील नागरिक अधिक संख्येने वाहने घेऊन शहरात येत आहेत. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील इंग्रजी माध्यमाच्या शाळा अनधिकृत

कल्याण : शासनाची परवानगी न घेता सुरू करण्यात आलेल्या कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील तीन शाळा अनधिकृत म्हणून पालिकेच्या शिक्षण विभागाने घोषित केल्या आहेत. या तीन शाळा टिटवाळा भागात आहेत. या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. मागील वर्षी अशाप्रकारच्या अनधिकृत शाळांची संख्या सहा होती. त्या शाळांनी शासनाच्या अटीशर्ती पूर्ण केल्याने त्या शाळांना परवानगी मिळाली आहे. अनधिकृत म्हणून घोषित केलेल्या शाळांमध्ये येत्या जूनमधील नवीन शैक्षणिक वर्षापासून आपल्या मुलासाठी प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन पालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त धर्येशील जाधव यांनी केले आहे. एम. जी. टी. एलिमेंटरी स्कूल, सांगोडा रोड, स्मशानभूमीजवळ, मांडा-टिटवाळा, संकल्प इंग्रजी स्कूल, बल्याणी, टिटवाळा, ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल, डोंगरवाली माता मंदिर, बल्याणी टेकडी, टिटवाळा पूर्व. अशी अनधिकृत शाळांची नावे आहेत. या शाळेत यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन केले जाईल. तसेच, या शाळांवर दंडात्मक कारवाईचा इशारा उपायुक्त जाधव यांनी दिला आहे. अलीकडे मुलांना इंग्रजी शाळेत टाकण्याची मोठी स्पर्धा पालकांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्याच्या आशेने आपल्या घराजवळच्या इंग्रजी शाळेत मुलांना दामदुप्पट शुल्क भरून, देणगी घेऊन प्रवेश घेतात. या शाळा शासन परवानगीने सुरू आहेत का. येथील शिक्षक वर्ग कोण आहे याची कोणतीही माहिती पालक घेत नाहीत. पालकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन शाळा चालक या नियमबाह्य शाळा चालवितात, असे शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांचे सर्वेक्षण तात्काळ थांबवा

उद्योजकांची एमआयडीसी अधिकऱ्यांकडे मागणी डोंबिवली : डोंबिवलीतील सरसकट सर्व कंपन्यांचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) सुरू करण्यात आलेले सर्वेक्षण तात्काळ थांबवा. अमुदान कंपनी स्फोटाची दुर्घटना दुखदायकच आहे. या स्फोटानंतरची परिस्थिती सावरण्यासाठी आणि यापुढे अशी कोणतीही दुर्घटना घडणार नाही, याविषयी प्राधान्याने उद्योजकांबरोबर चर्चा करावी. त्यानंतर सर्वेक्षण, कंपन्या स्थलांतर या विषयांपर्यंत पोहाचावे, अशा मागण्या ‘कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ने (कामा) शुक्रवारी एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेऊन केल्या. अमुदान कंपनीतील स्फोटानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, कामगार विभाग, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाने एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये जाऊन तपासणी, सर्वेक्षण सुरू केले आहे. या अचानक सुरू करण्यात आलेल्या प्रकाराने उद्योजक त्रस्त आहेत. कंपनी उत्पादन, त्याची पाठवणी, माल खरेदीदारांबरोबरच्या बैठका याविषयासाठी वेळ देण्याऐवजी डोंबिवलीतील उद्योजकांना अमुदान कंपनी स्फोटामुळे विविध तपास यंत्रणांना सामोरे जावे लागत आहे. शासन आदेशाप्रमाणे एमआयडीतील अतिधोकादायक, कंपन्या स्थलांतराच्या हालचाली प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरू केल्या आहेत. या प्रकाराने हवालदिल झालेल्या ‘कामा’ संघटनेच्या सदस्यांनी ‘कामा’चे अध्यक्ष राजू बेलारे, माजी अध्यक्ष अध्यक्ष देवेन सोनी यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीचे उपअभियंता राजेश मुळे यांची भेट घेतली. यावेळी अधीक्षक अभियंता हर्षे, कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड उद्योजकांबरोबरच्या बैठकीला अनुपस्थित होते. अमुदान कंपनी स्फोटाची दुर्घटना दुर्देवी आहे. अशा दुर्देवी घटना पुन्हा एमआयडीसी भागात घडू नयेत यासाठी सर्व उद्योजक आपल्या पध्दतीने काळजी घेतील. प्रत्येक जण आपल्या कंपनीत औद्योगिक सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यासाठी कटिबध्द आहे. बहुतांशी कंपन्यांमध्ये अशाप्रकारच्या अत्याधुनिक सुविधा आहेत. त्यामुळे सरसकट सर्वच कंपन्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांना स्थलांतरासाठी राजी करू नये. एमआयडीसीने गेल्या तीन दिवसात रासायनिक कंपन्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना ज्या रासायनिक कंपनीत उत्पादन प्रक्रिया, कामगार सुरक्षा आणि उत्पादित माल, साठा केंद्रे, रासायनिक भांडार कक्ष याविषयी काही त्रृटी आढळल्या असतील तर त्या कंपनीच्या मालकांना एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रथम आहे त्या त्रृटींचे अनुपालन करण्यासाठी अवधी द्यावा. त्या अवधीत त्याने ते काम केले नाही. त्यांच्या कंपनीत काही दुर्घटना घडली तर त्या कंपनीचे स्थलांतर करण्यासाठीची प्रक्रिया जरूर प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावी. कामा संघटनेचे सदस्यही या कामासाठी शासकीय यंत्रणांना सहकार्य करतील, असे आश्वासन अध्यक्ष राजू बेलूर यांनी एमआयडीसीला दिले आहे. एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला उद्योजकांकडून जे सहकार्य लागेल ते देण्याची आपली तयारी असेल असे आश्वासन कामाच्या सदस्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले. डोंबिवली एमआयडीसीत सुरू असलेले सर्वेक्षण तात्काळ थांबविण्यात यावे. ज्या रासायनिक कंपन्यांमध्ये सर्वेक्षणाच्यावेळी त्रृटी आढळून आल्या आहेत. त्यांना एक वेळ सुधारण्याची संधी द्यावी. त्यानंतर काही दुर्घटना घडली तर या दोन्ही यंत्रणांनी संबंधित कंपनीबाबत योग्य निर्णय घ्यावा. त्याला ‘कामा’चे सहकार्य असेल असे आश्वासन एमआयडीसीला दिले आहे. -राजू बेलूर, अध्यक्ष, कामा.

ठाणे स्थानक परिसराने घेतला मोकळा श्वास

ठाणे: स्थानक परिसरात नेहमीच नागरिकांचा गजबजात पाहायला मिळतो. अनेकदा नागरिकांना येथून मार्ग काढणे कठीण होते, इतकी रहदारी याठिकाणी असते. परंतू, मध्य रेल्वेने शुक्रवार पासून घेतलेल्या मेगाब्लाॅकमुळे स्थानक परिसराने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले. नागरिकांची अगदी तुरळक गर्दी या ठिकाणी होती. नेहमी रिक्षाची वाट पाहत उभे असणारे प्रवासी आज हे चित्र बदललेले होते. रिक्षा चालक प्रवाशांच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून आले. ठाणे मध्यवर्ती शहर असून येथे लोकवस्ती मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्याही जास्त आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातून मोठ्यासंख्येने नागरिक दररोज ठाणे रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. त्यामुळे स्थानक परिसर सकाळ- संध्याकाळ गजबजलेला दिसून येतो. दररोज गावदेवी मंदिरापासून ते स्थानक पर्यंत प्रवाशांची रहदाळी पाहायला मिळत असते. परंतू, शुक्रवारी मेगाब्लॅाकमुळे हे चित्र बदलेले दिसून आले. ऐन शुक्रवार म्हणजेच कामाचा दिवस असून देखील स्थानक परिसरात नागरिकांची रहदारी नव्हती. स्थानक परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. मध्य रेल्वे महामार्गावरील काही महत्त्वाचे कामे करण्यासाठी शुक्रवार पासून मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे, अशी पूर्व सुचना मध्य रेल्वे मार्फत देण्यात आली होती. त्यानुसार, अनेक कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना या मेगाब्लाॅकचा त्रास होऊ नये यासाठी घरातून काम करण्याची सुचना दिली होती. तर, काही नोकरदारांनी स्वत:च्या वाहनांनी किंवा खासगी वाहनाने कार्यालय गाठले. तसेच नोकदारवर्गा व्यतिरिक्त काही इतर नागरिक कामानिमित्त बाहेर पडत असतात. ते देखील मेगाब्लाॅकमुळे घरा बाहेर पडले नाही. त्यामुळे रस्त्यावर फार तुरळक गर्दी दिसून आली. रिक्षा चालक प्रवाशांच्या प्रतिक्षेत ठाणे स्थानक येथील गावदेवी मंदिर परिसरात शेअरिंग रिक्षाचा थांबा आहे. या थांब्यालर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करत असतात. बदलापूर, कल्याण-डोंबिवली तसेच मुंबईतून ठाण्यात कामासाठी येणारे नोकरदार या थांब्यावरुन रिक्षा पकडतात. त्यामुळे येथे प्रवाशांची तसेच रिक्षा चालकांची मोठी गर्दी आणि गोंधळ पाहायला मिळतो. नेहमी प्रवासी रिक्षा चालकांच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येतात. मात्र, आज चित्र उलटे होते. रिक्षा चालक हे प्रवाशांच्या प्रतिक्षेत असल्याचे पाहायला मिळाले. या मेगाब्लाॅकमुळे अनेक नोकरदारांना घरुन काम करत आहेत. त्यामुळे आज प्रवाशांची संख्या घटली असून दररोज उत्पन्नात घट झाली असल्याची प्रतिक्रिया स्थानक परिसरातील एका रिक्षा चालकाने दिली.

महावितरणकडून स्मार्ट मीटरची सुरुवात

मुंबई : वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली असून महावितरणची १८ कार्यालये आणि कर्मचारी निवासमधील ३२३ सदनिका अशा ३४१ वीज ग्राहकांसाठी स्मार्ट बसविण्यात आले आहेत. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविताना सर्वप्रथम महावितरणची कार्यालये आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची सूचना केली आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी वरदान ठरणाऱ्या या उपक्रमामध्ये महावितरणने स्वतःपासून सुरुवात करून उदाहरण घालून द्यावे, असे त्यांनी सांगितले. नागपूर शहरात ६०, गोंदियामध्ये १४६, वर्धा येथे ३०, भंडारा येथे १० आणि चंद्रपूरमध्ये ९५ अशा एकूण ३४१ वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये महावितरणची कार्यालये आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारे राज्यात कृषी ग्राहक वगळता सर्व ग्राहकांच्या कार्यालय अथवा निवासस्थानी विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता प्रत्यक्ष मीटर बसविण्यात येत आहेत. वीज ग्राहकांना महावितरणकडून स्मार्ट मीटर मोफत मिळणार आहेत. तसेच संबंधित कंपन्यांवर या मीटरची दहा वर्षे देखभाल दुरुस्ती करण्याचे बंधन आहे. महावितरणच्या वीज ग्राहकांना देण्यात येणारे स्मार्ट मीटर हे आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यामुळे वापरलेल्या विजेची अचूक नोंद होईल तसेच वीज ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर नियमितपणे आपला वीजवापर समजेल. सध्या सर्वत्र वापरात असलेल्या पारंपरिक मीटरच्या बाबतीत चुकीचे रिडिंग होणे, वेळेवर रिडिंग झालेले नसणे, चुकीची बिले येणे, अशा काही समस्या जाणवतात. मोठा वीजवापर झाल्यानंतर बिल मिळाले की अचानक ग्राहकाला आपल्या वीजवापराबद्दल समजते आणि धक्का बसतो. अत्यंत पारदर्शी पद्धतीने अचूक बिलिंग हे स्मार्ट मीटरचे वैशिष्ट्य आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या बिलाविषयीच्या तक्रारींचे संपूर्ण निराकरण होईल. असे मीटर वापरणे काळाची गरज झाली आहे. देशामध्ये मध्य प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यात स्मार्ट मीटरचा वापर काही प्रमाणात सुरू झाला आहे व तेथील ग्राहक अचूक बिलिंग आणि वीजवापराची नियमित माहिती मिळणे या सुविधेचा वापर करत आहेत.