Month: May 2024

मतदान यंत्रे सीलबंद करण्याची प्रक्रिया सुरू

24 कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी लागणारी ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यात 20 मे  रोजी मतदान होणार असून यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच निवडणूक यंत्रणा कार्यरत आहे. 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाकरीता 1960 मतदान केंद्र असून, प्रत्येक मतदान केंद्रावर लागणारे ईव्हीएम मशीन, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशीन्स सील करण्याची प्रक्रिया आज करण्यात आली. सदरची प्रक्रिया उद्या 14 मे 2024 रोजी व  आवश्यकता भासल्यास 15 मे रोजी सुरू राहणार आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री.मनोज जैन यांनी समक्ष या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते उपस्थित होत्या. सदरची प्रक्रिया ही उमेदवारांच्या राजकीय प्रतिनिधींसमक्ष करण्यात येत आहे.

टपाली मतदानाची सुविधा

अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी 14 मे पासून ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघात नियुक्तीस असलेल्या अत्यावश्यक सेवेतील मतदार व निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदार यांनी नमुना १२ डी भरून दिला आहे. त्यांचे मतदान पोस्टल वोटिंग सेंटर (पीव्हीसी) येथे तर त्या ज्यांनी नुमना 12 भरून दिला आहे, त्यांचे मतदान सुविधा केंद्र (एफ.सी) येथे होणार आहे. यासाठी भिवंडी लोकसभा मतदार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोस्टल वोटिंग सेंटर व मतदान सुविधा केंद्र सुरू केले असून या मतदारांना दि. 14 ते 19 मे या कालावधीत मतदान करता येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाकडे यांच्याकडील  दिनांक 31 ऑक्टोबर 2023 परिपत्रकनुसार पोस्टल  वोटिंग व मतदान सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी 23  भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावरील या मतदारांच्या मतदानाच्या तारखा खालील प्रमाणे आहेत. पोस्टल वोटिंग सेंटर 138 कल्याण पश्चिम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, मुंबई युनिव्हर्सिटी उपकेंद्र, वसंत व्हॅली रोड, खडकपाडा कल्याण पश्चिम येथे दिनांक 14, 15,16 मे रोजी सकाळी 9 ते 5 या दरम्यान मतदान होणार आहे. 23 भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, एस. टी.स्टँड समोर भिवंडी येथे दिनांक 17,18,19 मे रोजी सकाळी 9 ते 5 या दरम्यान मतदान केंद्र सुविधा केंद्रात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अत्यावश्यक सेवेतील मतदार, निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदारांनी या मतदान सुविधा केंद्रामध्ये मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी केले आहे. ठाणे : भारत  निवडणूक आयोगाने अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 25- ठाणे लोकसभा मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेत असलेल्या तसेच निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना दि. 14 मे 2024 ते 19 मे 2024 या कालावधीत टपाली मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली. नोंदणीकृत मतदार- पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी,अग्निशमन दल, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मतपत्रिकेसाठी नमुना 12 ड भरुन दिला आहे, त्यांचे टपाली मतदान दि. 14 मे 2024, दि. 15 मे 2024 व दि. 16 मे 2024 या कालावधीत “प्रशिक्षण केंद्र, जिल्हा विकास उद्योजक केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे प 400601 येथे सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत होणार आहे. तसेच ‍निवडणूक कामी कर्तव्यावर असलेले व अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी ज्यांनी नमुना 12 भरुन दिला आहे, अशा कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान दि. 17 मे 2024,‍ दि. 18 मे 2024 व  दि. 19 मे 2024 या दिवशी प्रशिक्षण केंद्र, जिल्हा विकास उद्योजक केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे प. – 400601 येथे  सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त झालेले अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांनी आपले मत नोंदवून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन 25- ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये-धुळे  यांनी केले आहे.

मुंबईतील मिठागरांवर पुनर्वसन करताना फक्त अदानीचा विचार नको –  वॉचडॉग फाउंडेशन

रमेश औताडे मुंबई : मुंबईचा विकास व ग्लोबल वॉर्मिगचा धोका पाहता भविष्यात मुंबईला पूर आणि मोठ्या वादळांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मुंबईचा विकास करताना फक्त अदानीचा विचार करू नका. मुंबईतील मिठागरांच्या जमिनीवर झोपडपट्टीचे संभाव्य पुनर्वसन  हे तर महाधोकादायक आहे. अशी भीती  वॉचडॉग फाउंडेशनने व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मुंबईला समुद्र पातळीचा धोकासमुद्र पातळीत वाढ होत असल्याचा सर्वाधिक धोका मुंबई किनारपट्टीला बसणार आहे. २०५० पर्यंत समुद्र पातळीच्या संभाव्य वाढीमुळे सुमारे ९९८ इमारती आणि २४ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रभावित होणार आहे. तर भरतीच्या वेळी समुद्र पातळी वाढल्याने अंदाजे २ हजार ४९० इमारती आणि १२६ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रभावित होण्याचा इशारा आरएमएसआय या संस्थेने काही वर्षांपूर्वी दिला होता. यामुळे हाजी अली दर्गा, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वांद्रे-वरळी सी-लिंक आणि मरीन ड्राईव्हवरील क्वीन्स नेकलेस पाण्याखाली जाणार असल्याची भीती संस्थेने व्यक्त केली आहे. धारावीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून अदानी कंपनीची निवड धारावी पुनर्वसन प्राधिकरणाने केली आहे. धारावीतील प्रत्येक झोपडीधारकांना घर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याप्रमाणे धारावीतील झोपडीधारकांचे सर्वेक्षण करण्याचे काम कंपनीने हाती घेतले आहे. धारावी पुनर्विकासात अपात्र ठरणाऱ्या नागरिकांना भाडेतत्वावरील घरे देण्यात येणार आहेत. भाडेतत्वावरील घरे उभारण्यासाठी वडाळा येथील मिठागराची जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुलुंड मधील डम्पिंग ग्राउंडच्या जवळील जमिनीवर धारावीतील नागरिकांना घरे देण्याची योजना होती. या योजनेला मुलुंडकरांनी विरोध दर्शविला आहे. तर  निवडणुकीत मतांच्या जोग्व्यासाठी धारावीतील नागरिकांना वडाळा मिठागरांच्या जमिनीवर घरे देणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे. या निर्णयाला वॉचडॉग या संस्थेने विरोध केला आहे. समुद्राच्या पातळीत वाढ होणार असल्याने मुंबईसह जगभरातील समुद्र किनारी असणाऱ्या शहरांना धोका आहे असे पर्यावरण तज्ञ सांगत आहेत. त्यामुळे अनियोजित विकास मुंबईकरांची सुरक्षितता पाहता हानिकारक ठरू शकतो. मिठागरांच्या जमिनीवर इमारती उभारल्यास भविष्यात मुंबईला धोका निर्णय होऊ शकतो. त्यामुळे धारावीकरांचे पुनर्वसन धारावी किंवा पर्यायी ठिकाणी करावे, अशी मागणी वॉचडॉग संघटनेचे पदाधिकारी गॉडफ्रे पिमेंटा यांनी मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्याकडे केली आहे.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राची

हिंदुस्थानी ख्याल गायन स्पर्धा मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आयोजित हिन्दुस्थानी ख्याल गायन स्पर्धा  शनिवार दिनांक १५ जून २०२४ या दिवशी सकाळी ९.३० वाजता वय वर्षे १६ ते ३० वयोगटांसाठी होणार आहे. सर्व स्पर्धक अव्यावसायिक हौशी कलाकारच असावेत. पहिले पारितोषिक १० हजार रुपयांचे आहे. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १३ जून २०२४ आहे . अर्ज संस्थेच्या कार्यालयात तसेच फेसबुक, ट्विटर आणि संस्थेच्या www.dadarmatungaculturalcentre. org या वेब साईटवर उपलब्ध आहेत. अधिक माहिती साठी – ०२२-२४३०४१५०, ७७००९९४४९५ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्पोर्टींग क्लब कमिटीची आगेकूच कायम

महिला कांगा क्रिकेट स्पर्धा ठाणे : स्पोर्टींग क्लब कमिटीने डोंबिवली क्रिकेट क्लबवर सहा धावांनी निसटता विजय मिळवत मुंबई क्रिकेट संघटना आयोजित महिला बाद पद्धतीच्या डॉ कांगा क्रिकेट स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.  ध्रुवी पटेलच्या अर्धशतकी खेळीमुळे ३५ षटकात ८बाद १८० धावा उभारल्यावर स्पोर्टींग क्लब कमिटीच्या गोलंदाजांनी डोंबिवली क्रिकेट क्लबला ५ बाद १७४ धावांवर रोखत अंतिम फेरीच्या दिशेने आगेकूच कायम राखली. नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करताना स्पोर्टींग क्लब कमिटीची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीची जोडी अवघ्या १५ धावांत माघारी परतल्यावर ध्रुवी पटेलने ५४ धावा करत संघाला सुस्थितीत नेले. तन्वी चव्हाणने नाबाद २४ आणि  प्रणाली मळेकरने ११ धावांची खेळी केली. प्रीती चौधरी आणि सानिका खैरनारने प्रत्येकी दोन बळी मिळवले. दिक्षा दुबे, सायली भालेराव, ध्रुवी कापडणेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.  उत्तरादाखल  लावण्या शेट्टीने अर्धशतक झळकवत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण इतर फलंदाजांनी अपेक्षेनुसार कामगीरी न केल्याने डोंबिवली क्रिकेट क्लबला पराभव पत्करावा लागला. लावण्याने ६४ आणि सायली भालेरावने ३९ धावा केल्या. अभिगील नाईक, वैष्णवी पालन, आर्या कानडे, स्वरा दिवेकर आणि अंजु सिंगने प्रत्येकी एक विकेट मिळवली. संक्षिप्त धावफलक : स्पोर्टींग क्लब कमिटी : ३५ षटकात ८ बाद १८० (ध्रुवी पटेल ५४, तन्वी चव्हाण नाबाद २४, प्रणाली मळेकर ११, प्रिती चौधरी ५-३७-२, सानिका खैरनार ६-३०-२, दिक्षा दुबे ४-२३-१, सायली भालेराव ६-३४-१, ध्रुवी कापडणे ७-२६-१) विजयी विरुद्ध डोंबिवली क्रिकेट क्लब : ३५ षटकात ५ बाद १७४ (लावण्या शेट्टी ६४, सायली भालेराव ३९, अभिगील नाईक ४-२९-१, वैष्णवी पालन ७-४०-१, आर्या कानडे ४-३३-१, स्वरा दिवेकर ३-२२-१, अंजु सिंग ३-१०-१ ).

मुंबईतील मोदींच्या सभेला यशस्वी करणे महायुती म्हणून आमची जबाबदारी…- – सुनिल तटकरे

मुंबई : राज्यात चारही टप्प्यात झालेले मतदान महायुतीला अनुकूल असून चौथ्या टप्प्यापर्यंत चांगले यश महायुतीला मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. मुंबई प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांशी बोलताना सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना महायुतीच्या विजयाचीही खात्री सांगितली.विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जागा आहेत तर शेवटच्या टप्प्यात मुंबईसह ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक आहे त्यामुळे आणखी वेग येईल असेही सुनिल तटकरे म्हणाले. महायुतीची लाट आहे असे ते म्हणणार नाहीत आणि ते स्वाभाविकच आहे. त्यांना कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवायचे असल्यामुळे आणि पाचव्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार लढत असल्यामुळे मतदारांच्या मनात किंवा कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास टिकून रहावा या हेतूने त्यांनी ते वक्तव्य केले असावे यापेक्षा ग्राऊंड रिअ‍ॅलिटी फार वेगळी आहे असा टोलाही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लगावला. खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुनेत्रावहिनी पवार यांना फार मोठी आघाडी म्हणजे २०१९ मध्ये भाजपला मिळाली होती त्यापेक्षा जास्त आघाडी मिळेल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. आम्ही सर्व जागा महायुतीमध्ये लढत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आम्ही जरी जागा लढल्या असल्या तरी महायुती म्हणून राज्यात सर्वाधिक जागा जिंकणार आहोत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. बारामतीमध्ये निकाल काय लागणार आहे याची रोहित पवार यांनी पराजयाची प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष ट्वीट करत कबुली दिली आहे असा थेट हल्लाबोल सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत सभा होत असून या सभेचे नियोजन तिन्ही पक्षांचे नेते करत आहेत. मी स्वतः बुधवारी कल्याण येथील सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे. मोदींची मुंबईतील सभा यशस्वी करणे हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे व घटक पक्षाचे कर्तव्य आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने

मतदार, निवडणूक यंत्रणा आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे मानले आभार मुंबई :- १० राज्ये आणि ९६ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान शांततापूर्ण वातावरणात पार पाडल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मतदार, निवडणूक यंत्रणा आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी…

फ्लॅश मॉबव्दारे मॉलमध्ये मतदार जनजागृती

नवी मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा अधिकार असणा-या नागरिकांनी मतदान करुन मतदानाचा हक्क बजावावा याकरिता स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये नुकताच मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेले पहिल्यांदाच मतदान करणारे 18 वर्षावरील युवक व युवती यांना मतदान करण्याकरीता प्रोत्साहित केले जात असून महाविद्यालयांमध्ये तसेच युवक संघटनांमध्येही मतदार जनजागृती विषयक उपक्रमांवर भर दिला जात आहे. या अनुषंगाने शनिवार व रविवारी होणारी मॉलमध्ये येणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन वाशी येथील इनॉर्बीट मॉल तसेच सीवूड येथील ग्रॅंड सेंट्रल मॉल या दोन ठिकाणी लोकांना चटकन आकर्षित करुन घेणा-या फ्लॅश मॉब सारख्या संगीतमय कलाप्रकाराचा मतदार जनजागृतीसाठी प्रभावी वापर करण्यात आला. मॉलमधील वातावरण खरेदीसाठी उत्साही असताना व तशा प्रकारची लगबग मॉलमधील प्रत्येक दुकानातून सुरु असताना अचानक मोठया आवाजात गीत – संगीत वाजायला सुरुवात होते. गाणे कुठे वाजते आहे याचा कानोसा घेत लोक आवाजाच्या दिशेने सूरांचा शोध घेण्यासाठी पुढे येतात. त्यावेळी त्यांना मॉलच्या तळमजल्यावर मधल्या मोकळया पॅसेजमध्ये संगीत वाजायला सुरुवात झाल्याचे लक्षात येते व त्या तालावर नृत्यासाठी सज्ज असलेले तरुण, तरुणी दिसतात. गाणे वाजायला सुरुवात होते आणि त्या तालावर ते तरुण – तरुणी समुहनृत्य सुरू करतात. बघता बघता हे नृत्य पाहण्यासाठी त्यांच्या भोवतालची गर्दी वाढत जाते. सुरूवातीच्या गाण्यानंतर चक्क मतदान विषयक जनजागृती करणारे गाणे सुरू होते. मग मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणारी गाणी एकापाठोपाठ एक नृत्यासह सादर होत जातात. तळमजल्यावरच नव्हे तर मॉलमधल्या प्रत्येक मजल्याच्या कठडयाजवळ येऊन नागरिक तळमजल्यावर नृत्य करणा-या कलावंताकडे आकर्षित होऊन गर्दी करतात. नृत्याविष्काराच्या अखेरीस 20 मे रोजी होणा-या ठाणे लोकसभा निवडणूकीत प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मतदान करण्याविषयीचे फलक उंचावत केले जाते. नागरिकही या तरुणाईला प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात त्यांच्या नृत्याचे कौतुक करतात व लोकसभा निवडणूकीत आम्ही मतदान करणार आहोत अशी ग्वाही देखील देतात. वर्दळीच्या ठिकाणी अचानक सुरु होणारा गीतसंगीतमय फ्लॅश मॉब हा नागरिकांना आकर्षित करणारा व त्याच वेळी मतदानाविषयी जनजागृती करणारा असल्याने हा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी झाला.

रेवदंड्यात हवामन बदलाचा फटका

रेवदंडा : मागील काही दिवसांपासून परिसरात हवामान बदलाचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. दुपारनंतर ढगाळ हवामानामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे शेतकरीवर्गाचे नुकसान होत आहे. यंदा तालुक्‍यात हवामानात वेगाने बदल होत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सातत्याने बदलत्या हवामानामुळे शरीराची लाही लाही होत असून नागरिक हैराण झाले आहेत. ढगाळ हवामानामुळे हवेत मळभ दाटून आल्‍याने उष्म्याची तीव्रता वाढली आहे. सकाळी दहानंतर ते सायंकाळी सहापर्यंत नागरिक घराबाहेर पडण्याऐवजी घरातच थांबणे पसंत करताना दिसून येत असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. येथील अनेक समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी बहरून गेले आहेत. मात्र, वाढत्‍या उष्म्यामुळे पर्यटक लगेच परतत आहेत.

वीजपुरवठा खंडित झाल्याने जव्हार परिसरात अंधार

जव्हार : गेल्या दोन दिवसांपासून जव्हार, मोखाडा तालुक्यात ढगाळ वातावरण होते. त्यातच काही वेळ कडक ऊन, तर काही वेळ ढगाळ वातावरण अशाप्रकारे सायंकाळपर्यंत ऊन-सावलीचा खेळ सुरू होता; परंतु सोमवारी  दुपारी साडेबारा वाजता वादळी-वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे वातावरण थंड झाले; पण वादळामुळे रस्त्यावरील झाडे कोलमडल्याने, विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित होऊन तालुक्यात अंधार पसरला होता. तालुक्यातील ग्रामीण भागात खेडो-पाड्यांतील बहुतांश घरे विटा, माती, कौलारू, लाकडाची झोपडी, कुडाचे घर अशा ठेवणीची आहेत. गोठ्यांच्या अवतीभोवती पावसाळ्यात बचावासाठी ताडपत्री, प्लास्टिक बांधण्याची तयारी सुरू असताना जनावरांसाठी ठेवण्यात आलेला चारा, चार महिन्यांसाठी गोळा केलेले सरपण आणि पावसाळ्यापूर्वीची कामे मध्यावर असताना आज अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वांना बाधित करून अतोनात नुकसान झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पसरले आहे. तालुक्याची भौगोलिक रचनाच अशी आहे की, डोंगरउतार, दरी खोऱ्यांतील लोकवस्ती आहे. वादळी- वाऱ्यामुळे कित्येक घरांवरील सिमेंट पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या मातीच्या भिंती पडल्या आहेत. जोरदार वाऱ्यामुळे विजेचे खांब, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून तारांवर पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. महावितरण कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात गती देऊन लवकरच वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे महावितरणचे अधिकारी किरण जाधव यांनी सांगितले.