Month: May 2024

कैद्यांनाही वैद्यकीय उपचार मिळण्याचा अधिकार

मुंबई : कैद्यांनाही वैद्यकीय उपचार मिळण्याचा अधिकार असून तो त्यांचा आत्मसन्मानाचा हक्क आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर करताना नोंदवले आहे. कच्चा कैदी म्हणून उपचार घेणे आणि कोणत्याही बंधनात नसलेल्या सर्वसामान्य व्यक्तीने उपचार घेणे यामध्ये फरक आहे, असेही न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकल खंडपीठाने स्पष्ट केले. गोयल यांच्या वैद्यकीय चाचण्या, अहवालांचा अभ्यास केल्यानंतर ते आजारी नाहीत असे म्हणू शकत नाही. तसेच, गोयल हे आवडीच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांना जामीन नाकारावा हा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) युक्तिवादही मान्य करता येणार नाही. किंबहुना, एखाद्या व्यक्तीला आवश्यक उपचार मिळाल्यास तो जामिनास पात्र नाही हा युक्तिवाद स्वीकरणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातत्र्यांवर गदा आणण्यासारखे आहे, असेही न्यायालयाने गोयल यांची वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर करण्याची मागणी मान्य करताना नमूद केले. गोयल हे खटल्यापासून पळ काढण्याची किंवा पुरावे नष्ट करण्याचीही शक्यता नाही, असेही न्यायालयाने म्हटले. कॅनरा बँकेची ५३८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने गोयल यांना अटक केली होती. विशेष न्यायालयाने वैद्यकीय जामीन देण्यास नकार दिल्यानंतर गोयल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने गोयल यांना सोमवारी दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर केला होता.

कल्याण-सीएसएमटी सकाळची १५ डबा लोकल तीन महिन्यांपासून गायब

कल्याण: सकाळी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवर उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने सकाळच्या वेळेत कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १५ डब्यांची लोकल गेल्या वर्षीपासून सुरू केली आहे. अशा प्रकारच्या दोन लोकल आहेत. यामधील एक लोकल गेल्या तीन महिन्यांपासून गायब असल्याने रेल्वे प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. कल्याण रेल्वे स्थानकातून सकाळी ८.३२ वाजता सुटणारी १५ डब्यांच्या लोकलमुळे प्रवाशांना धक्के खाण्यापेक्षा सुखाने प्रवास करता येत होता. या लोकलला महिलांंसाठी दोन स्वतंत्र डबे, प्रथम श्रेणीचे वाढीव डबे होते. त्यामुळे नियमित लोकलवर येणारा भार या लोकलमुळे कमी होत होता. या लोकलला महिलांसाठी वाढीव डबे असल्याने महिला प्रवाशांना धक्केबुक्के न खाता लोकलमध्ये शिरता येत होते. या १५ डब्यांच्या लोकलमुळे कल्याण, डोंबिवली, ठाणे दरम्यानच्या फलाटांवरील प्रवाशांंना नऊ आणि १२ डब्याच्या लोकलपेक्षा दिलासा मिळत होता. अशाप्रकारच्या दोन लोकल सकाळच्या दरम्यान होत्या. यामधील कल्याणहून सकाळी ८.३२ वाजता सुटणारी लोकल गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. प्रवाशांसाठी महत्वाची असणारी ही लोकल का बंद आहे याचे कोणतेही कारण रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना दिले जात नाही. ही लोकल सुरू करावी म्हणून रेल्वे प्रवासी, प्रवासी संघटना रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत, त्यांना कोणी दाद देत नाही. कल्याण ते ठाणे दरम्यान रेल्वे प्रवाशांचे गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर उपाय म्हणून अधिकाधिक प्रवाशांच्या सोयीच्या लोकल सोडणे आवश्यक असताना रेल्वे प्रशासन उलट महत्वाच्या लोकल बंद ठेऊन प्रवाशांची गैरसोय करत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे अशा लोकलची आता गरज आहे, असे प्रवासी सांगतात. उपनगरी रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी यासंदर्भात मध्य रेल्वेच्या विभागीय परिचलन अधिकाऱ्यांना संपर्क साधला, त्यांनी १५ डब्याच्या लोकलची दोन वर्षातून एकदा देखभाल, दुरुस्ती करावी लागते. या कामासाठी कमीतकमी ४० दिवस लागतात. त्यामुळे अशा लोकल प्रवासी सेवेत येण्यास उशीर होतो. यावर अरगडे यांनी अलीकडे लोकल देखभाल, दुरुस्तीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असताना एवढे दिवस देखभालीसाठी लावून रेल्वे प्रशासन नक्की काय साध्य करते, असे प्रश्न अरगडे यांनी अधिकाऱ्यांंसमोर उपस्थित केले. डोंबिवली ते मुंब्रा दरम्यानचे बहुतांशी रेल्वे प्रवासी मृत्यू हे गर्दीमुळे होत आहेत. याची जाणीव ठेऊन रेल्वे प्रशासनाने १५ डबा लोकल लवकर सुरू करावी, अशी मागणी अध्यक्षा अरगडे यांनी केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात २५ ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई !

आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ठाणे : दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने महापालिका क्षेत्रात २५ ठिकाणी एमसीएचआय आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. नागरीकरणामुळे शहरात वाढत जाणाऱ्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या संकटावरील नियंत्रणासाठी ठाण्याचा सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका व काऊन्सील ऑफ ऍनर्जी एनव्हायरोमेंट अॅण्ड वॉटर या संस्थांनी हा आराखडा एकत्रितपणे तयार केलेला आहे. उष्णतेच्या लाटेच्या सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सजग असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार, सीएसआरच्या माध्यमातून पाणपोई सुविधा उपलब्ध केली गेली आहे. या २५ ठिकाणी पाण्याचे मोठे माठ, ग्लास ठेवण्यात आले आहेत. तेथे दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संबंधित संस्था करत आहेत, माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली. ठाणे स्टेशन, कोपरी पूल, आईस फॅक्टरी, जवाहरबाग, आशर आयटी पार्क, किसननगर शाळा, अंबिका नगर नं. ३, पडवळ नगर, हाजुरी गाव, पासपोर्ट ऑफिस, तीन हात नाका, कोलशेत रोड नाका, बाळकूम नाका, माजीवडा नाका, कळवा स्टेशन, ९० फूट रस्ता-खारेगाव, कळवा नाका-दत्त मंदिर, कौसा तलाव, वफा पार्क, अमृत नगर, लोकमान्य डेपो, राबोडी, कोर्ट नाका, वर्तकनगर नाका, शास्त्री नगर नाका अशा २५ ठिकाणी पाणपोई सुरू करण्यात आली आहे.

श्रम घेतले तर कमी खर्चात ही यश मिळू शकते –  डॉ. प्रणिता पगारे

अनिल ठाणेकर ठाणे : पदवीनंतर स्टाफ सिलेक्शन सारख्या अनेक सरकारी परीक्षा आहेत. बैंकांच्या आँनलाईन परीक्षा आहेत. मोबाईलचा योग्य उपयोग करून अभ्यास केला तर श्रम घेतले तर कमी खर्चात ही यश मिळवू शकता, असा सल्ला फादर एग्लेल प्रशिक्षण संस्थेच्या सेंटर मैनेजर डॉ.प्रणिता पगारे यांनी दहावी नंतर काय? या विषयावर बोलताना दिला. राबोडी फ्रैंड्स सर्कल संचालित शाळेत समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने एकलव्य सक्षमीकरण कार्यशाळेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे जनरल सेक्रेटरी सईद शेख होते. फादर एग्नेल टेक्निकल इंस्ट्यूट मार्फत सुरू असलेले विविध टेक्निकल कोर्सेस ची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सर्व कोर्सेस मोफत शिकवले जातात. शिवाय नोकरी मिळवून देण्यासाठी सुध्दा संस्था मदत करते. पुढे त्यांनी सांगितले की, आपले स्वप्न साकार करण्यासाठी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतचे टाईम टेबल तयार करून मेहनतीने अभ्यास करावा. टेक्सटाइल टेक्नॉलॉजीस्ट व करिअर मार्गदर्शक शैलेश मोहिले यांनी दहावी नंतर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स शाखेतील विविध विषयांची माहिती देत पदवीनंतर रोजगाराभिमुख शिक्षणासाठी भरपूर संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. विदेशी भाषांमध्ये पदवीनंतर रोजगार मिळवू शकता. त्यांनी दहावीचा निकाल लागण्या आगोदर आपल्याला पुढे काय करायचं ते  आत्मविश्वासाने ठरवा. असा सल्ला ही त्यांनी दिला. माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक डॉ नसिब मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना आपलं व्हिजन ठरविण्याचे या वेळी सुचविले. सक्षमीकरण योजनेच्या संयोजिका लतिका सुप्रभा मोतीराम यांनी आपल्या कुवतीनुसार कौशल्य प्रशिक्षण घ्यावे असे सूचविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या इंग्रजी शिक्षिका हुसना शेख यांनी केले तर  कार्यक्रमात समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा हर्षलता कदम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया, फादर एग्नेल टेक्निकल इंस्ट्यूटच्या फैशन डिझाईन शिक्षिका अश्विनी पाटील आणि प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका फरहाना शेख आदी उपस्थित होते. यावेळी सुमारे ६० विद्यार्थी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत सहभागी झाले होते.

उल्हासनगरमधील लेवा पाटीदार एकता संघाचा डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठींबा!

लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होण्यासाठी दिल्या शुभेच्छा! डोंबिवली : उल्हासनगरमधील लेवा पाटीदार एकता संघाने कल्याण लोकसभेचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. लेवा पाटीदार एकता संघाच्या सदस्यांनी आज डोंबिवली येथे डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत हा जाहीर पाठिंबा दिला. याप्रसंगी खासदार शिंदे यांनी त्यांचे आभार मानत आगामी काळात समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे सांगितले. कल्याण लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी मागील १० वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण लोकसभा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ओळख निर्माण झाली असून त्यामुळेच विविध संस्था, संघटना यांच्याकडून सातत्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला जात आहे. आता उल्हासनगरमध्ये मोठ्या संख्येने वास्तव्याला असलेल्या लेवा पाटीदार समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघानेही खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी शिवसेनेचे उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह उल्हासनगर लेवा पाटीदार एकता संघाचे सदस्य उपस्थित होते.

श्री गणेशपूजा प्रशिक्षण निशुल्क वर्ग

मुंबई : भाद्रपद शुद्ध चतुर्थी, गणेश चतुर्थीला, श्री गणेश पूजन कसे करावे ह्याचे प्रशिक्षण आणि पूर्वी शिकलेल्यांसाठी उजळणी वर्ग १२  मे २०२४  पासून, दर वर्षी प्रमाणे, दर रविवारी सकाळी ९  ते ११ वाजे पर्यंत, वनमाळी हॉल , छबिलदास रोड, दादर पश्चिम, मुंबई ४०००२८ येथे होतील.  सदर वर्ग नि:शुल्क आहेत आणि सर्व जाती, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, लिंग, वय असे कसलेही भेद पाळत नाही.  सर्वास खुले आहेत. प्रत्येकास १२ मे पासून श्रावण महिना संपे पर्यंत दर  रविवारी हजर राहायचे आहे. नोंदणी आवश्यक नाही.  ईच्छुकांनी थेट  वनमाळी हॉल येथे वही आणि पेन घेऊन हजर  रहावे. काही शंका असल्यास, प्रमोद नाईक —, ९९२००६६५७५

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनची नवीन कार्यकारिणी

अध्यक्षपदी  एस. के. शेट्ये, कार्याध्यक्षपदी डॉ. यतीन पटेल, जनरल सेक्रेटरीपदी सुधाकर अपराज यांची निवड अनिल ठाणेकर मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी  एस. के. शेट्ये, कार्याध्यक्षपदी डॉ. यतीन पटेल, जनरल सेक्रेटरीपदी सुधाकर अपराज यांची निवड करण्यात आली. भारतातील प्रमुख बंदर व  मुंबई बंदरातील सर्वात जुनी १०४ वर्षे कार्यरत असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉइज युनियनच्या २५ एप्रिलला माझगाव येथील कामगार सदन सभागृहात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष, कार्याध्यक्ष व जनरल सेक्रेटरी पदासाठी बिनविरोध निवड झाली होती. सभागृहाने ठराव करून अध्यक्ष, कार्याध्यक्ष व जनरल सेक्रेटरी यांना उर्वरित पदांसाठी कार्यकारिणी निवडीचेअधिकार दिले होते. त्याप्रमाणे  ६ मे ला   २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी निवडलेली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणी :  अध्यक्षपदी – एस. के. शेट्ये, कार्याध्यक्षपदी – डॉ. यतीन पटेल, जनरल सेक्रेटरीपदी – सुधाकर अपराज, उपाध्यक्षपदी –  अहमदअली काझी, शीला भगत, विष्णू पोळ, प्रदीप नलावडे, रमेश कुऱ्हाडे, सेक्रेटरीपदी – विद्याधर राणे, दत्तात्रय खेसे, विजय रणदिवे, मनीष पाटील, खजिनदारपदी – विकास नलावडे, प्रसिद्धीप्रमुख –  मारुती विश्वासराव, संघटक सचिवपदी – मिर निसार युनूस, संदीप चेरफळे, प्रवीण काळे, संतोष कदम, अनंत भोसले.

रेवण्णांच्या निमित्ताने नवी शोषणगाथा

दखल श्रीनिवास राव व्हाईट कॉलर पिता-पुत्र, असहाय्य मुली आणि अनेक अश्लील व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह… देशभरात खळबळ माजवणार्‍या या कथेचे खलनायक आहेत माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे चिरंजीव एच. डी. रेवण्णा…

आरोग्य विम्याचा हप्ता महागणार

विमा नियामक प्राधिकरणा (इर्डा) ने नुकतेच आरोग्य विम्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यानंतर विमा क्षेत्रात काही बदल होऊ शकतात. त्याचा परिणाम भविष्यात विम्याच्या हप्त्यावर दिसू शकतो. नवीन नियमानुसार आता…