Month: May 2024

लोकलच्या वेगमर्यादेमुळे हार्बरवासीयांचे हाल!

वडाळा ते सीएसएमटी गाड्यांची रांग मुंबई : सीएसएमटी स्थानकात तीन दिवसांत दोनदा लोकल रुळांवरून खाली घसरण्याची घटना घडली. त्यानंतर मध्य रेल्वेने प्रशासनाने रेल्वे रुळांची दुरुस्ती केल्यानंतर खबरादारी म्हणून हार्बर मार्गावरील अपघातग्रस्त जागेवर १० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा लागू केली. त्यामुळे हार्बर मार्गावरून सीएसएमटी येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल सेवा कासवगतीने ये-जा करत असल्याने लोकल सेवांचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना लेटमार्क लागला. उन्हाळ्यामुळे मुंबईकरांना लोकलच्या गर्दीचा प्रवास नकोसा वाटत आहे. त्यातच सलग दोन दिवस लोकल रुळावरून खाली घसरल्याने मुंबईकरांचे पुरते हाल झाले. पनवेल- सीएसएमटी लोकल सोमवारी (ता. २९) सीएसएमटी स्थानकात शिरताना प्लॅटफॉर्म क्रमाक दोनवर घसरली. या घटनेनंतर बुधवारी (ता. १) चाचणीदरम्यान त्याच ठिकाणी लोकलच्या एका डब्याची दोन चाके रुळावरून घसरली. यामुळे हार्बर आणि मुख्य मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले. लागोपाठ दोन घटना झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने गुरुवारी (ता. २) मस्जिद बंदर ते सीएसएमटी स्थानकापर्यंत लोकलची वेगमर्यादा १० किलोमीटर प्रतितास ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे सकाळपासून लोकलचे वेळापत्रक पुरते विस्कळित झाले होते. लोकलच्या रांगा हार्बर मार्गावरील लोकलचा वेग गुरुवारी (ता. २) सकाळपासून मंदावला होता. त्यामुळे वडाळा ते सीएसएमटीदरम्यान लोकलची एकामागोमाग एक रांग लागली होती. रेल्वे स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली होती. अनेकांनी कंटाळून टॅक्सी आणि रिक्षाने जाणे पसंत केले. वेगमर्यादेमुळे विस्कळित झालेले वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकाळी अनेक लोकल रद्द केल्या. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करावा लागला.

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ला बसणार आळा?

राज्य सरकार करणार कठोर कारवाई मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे. फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध तंत्रांचा गैरवापर करून डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करण्यात येतो. निवडणुकीदरम्यान या तंत्राचा गैरवापर हा सध्या चिंतेचा विषय आहे. एखादा उमेदवार, राजकीय पक्ष किंवा निवडणुकीच्या मुद्द्याविषयी चुकीचे व्हिडिओ, ऑडिओ, फोटो तयार करण्यात येतात किंवा खऱ्या फोटो, ऑडिओ, व्हिडिओमध्ये फेरफार करून ते चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात येतात. हे डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स किंवा फोटो खरे असल्यासारखे भासतात आणि त्यामुळे संबंधिताविषयी गैरसमज किंवा बदनामी होते. निवडणूक काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असून यावर आळा घालण्यासाठी तसेच स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने ‘डीप फेक’ कंटेंट तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. राज्य शासनामार्फत पोलीस महासंचालकांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून पोलीस खात्यामार्फत यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगानेही विपर्यस्त माहिती रोखण्यासंदर्भात त्यांच्या मार्गदर्शिकेमध्ये सूचना दिल्या आहेत. डिप फेक व्हिडीओ या निवडणूकीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरक्षण समाप्त करण्याबद्दलचा व्हिडीओ प्रसारीत झाला. हा व्हिडीओ डिप फेक असून विरोधकांनी तो पसरवला असल्याचा आरोप अमित शहा यांनी आरोप केला. यावरुन दिल्ली पोलिसांनी काही जणांना अटक केली असून तेंलगणाचे मुख्यमंत्र्यांना समन्स जारी केले आहे.काही अभिनेत्यांचे प्रचाराचे डिप फेक व्हिडीओ प्रसारीत झाले आहेत.काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आणि राहुल गांधी यांचेही काही डिप फेक व्हिडीओ प्रसारीत झाले आहे.

अंधेरीत गॅसगळतीमुळे दुकानांना आग, चारजण जखमी

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील ए. बी. नायर मार्गावरील जुहू टपाल कार्यालयाजवळ शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास गॅसगळतीमुळे काही दुकानांना आग लागली. या दुर्घटनेत एकूण चारजण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त परिसरातील महानगर गॅस कंपनीच्या गॅस वहिनीतून शुक्रवारी अचानक गळती सुरू झाली. त्यामुळे दोन ते तीन दुकानांमध्ये आग लागली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य हाती घेतले. अग्निशामकांना दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी आग विझविण्यात यश आले. या दुर्घटनेत नरसिंह फगिल्ला (५०), वाझिर हुसेन (३०), शांतीलाल चौधरी (२४), आसिफ हुसेन (३०) हे चौघे जखमी झाले. जखमींना तात्काळ नजीकच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ?

माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज डोंबिवली – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील केडीएमसीचे माजी महापौर रमेश जाधव यांनी शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज…

बेवारस वाहनांच्या मालकी हक्काबाबत पोलिसांकडून आव्हान

नवी मुंबई, :- एन आरआय सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्या पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस पडून असलेल्या  मोटार  दुचाकी, स्कुटर, ऑटो रिक्षा,फोर व्हिलर  या वाहनांच्या मालकी हक्काबाबत एन आरआय सागरी पोलीस ठाणे, नवी मुंबई यांच्याशी संपर्क साधण्यात यावा. अशी माहिती एन आरआय सागरी पोलीस पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश कदम यांनी दिली आहे. एन आर आय सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारणास्तव प्राप्त झालेली 55 दुचाकी वाहने, 4- चारचाकी वाहन, 1 थ्री व्हीलर एकूण 60 बेवारस वाहने एन आर आय सागरी पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र करुन ठेवण्यात आली आहेत. वर्षानुवर्षे या वाहनांचे मूळ मालक सदर वाहने घेऊन जाण्यास आलेले नसल्याने एन आर आय सागरी पोलीस ठाण्यामार्फत सदर वाहनांच्या मूळ मालकांनी सात दिवसांच्या आत आपली वाहने कागदपत्रे दाखवून या बातमी सोबत दिलेल्या यादीतील आपल्या वाहनांची ओळख पटवून ती घेऊन जावी असे आवाहन एन आरआय सागरी पोलीस पोलीस ठाणे नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश कदम यानी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

वीज चोरांविरुद्ध महावितरणची धडक कारवाई

टिटवाळा, अंबरनाथ आणि वाड्यात कल्याण/वसई: एप्रिल महिन्यात महावितरणच्या टिटवाळा, अंबरनाथ पूर्व आणि वाडा उपविभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. टिटवाळा उपविभागा‍त १२४ जणांविरुद्ध कारवाई करून ४१ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. अंबरनाथ पूर्व उपविभागात मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या १९ ग्राहकांकडे २६ लाख ३५ हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली. तर वाडा उपविभागात तब्बल १०४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून १ कोटी ९ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडलात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई सातत्याने सुरू आहे. त्यानुसार टिटवाळा उपविभागातील जीआर नगर, बल्याणी गाव, आंबिवली रोड, वैष्णवी देवी चाळ, गुरुवली पाडा, शिवनगरी चाळ भागात एकाच दिवशी राबवलेल्या शोध मोहिमेत १२४ जणांकडे सुरू असलेल्या वीजचोऱ्या शोधण्यात यश आले. या १२४ जणांकडून सुमारे ४१ लाख रुपये किंमतीची १ लाख ८० हजार ८८१ युनिट विजेची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहाय्यक अभियंता तुकाराम घोडविंदे, कनिष्ठ अभियंते सचिन पवार, अलंकार म्हात्रे यांच्या पथकांने ही कारवाई केली. अंबरनाथ पूर्व उपविभागात ३३३७ ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी करण्यात आली. यात १९ वीज मीटरमध्ये फेरफार करण्यात आल्याचे आढळून आले. या १९ ग्राहकांनी २६ लाख ३५ हजार रुपये किंमतीची ९८ हजार ९९६ युनिट विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती, सहाय्यक अभियंते वैशाली पाटील, प्रशांत नाहीरे, हरेश विशे, प्रतिक म्हात्रे, मोहित ठाकुर, रविंद्र नाहिदे, सहायक लेखापाल मयुरी बोरसे यांच्या पथकांनी ही कारवाई केली. तर वाडा उपविभागात वाडा शहर आणि ग्रामीण, गोऱ्हा, अंबाडी, कुडूस आदी भांगामध्ये राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेत १०४ जणांकडे विजेचा चोरटा वापर आढळून आला. या १०४ जणंनी १ कोटी ९ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधितांना चोरीच्या विजेचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून विहित मुदतीत या रकमेचा भरणा टाळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होण्यासाठी पोलिसांत फिर्याद देण्यात येणार आहे. वाड्याचे उपविभागीय अभियंता अविनाश कटकवार, सहायक व कनिष्ठ अभियंते, जनमित्र तसेच सुरक्षारक्षक यांच्या चमुने ही कामगिरी केली.

पंतप्रधान मोदींचे बाळासाहेब ठाकरेंबद्लचे विधान हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’

वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल मुंबई : पराभवाच्या भितीने घाबरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दारूण पराभव होणार असल्याची जाणीव झाल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरेंबद्दल आपुलकी व प्रेम व्यक्त करत आहेत. एवढेच जर प्रेम असते तर बाळासाहेबांची शिवसेना कटकारस्थान करून फोडली नसती. मोदींनी व्यक्त केलेले बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरेंबद्दलचे प्रेम व आदर हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबईच्या काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा समाचार घेत प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले, महाविकास आघाडीचे सरकार पाडले. बाळासाहेबांबदद्ल प्रेम, आदर व आपुलकी असती तर भाजपाने असे उद्योग केलेच नसते. शिवसेना व काँग्रेस यांची विचारधारा वेगळी आहे, असे असले तरी उद्धव ठाकरे संकटात असताना काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांनी फोन करून सोबत असल्याचा शब्द दिला, उद्धवजी आजारी असतानाही त्यांची विचारपूस केली पण जाहीरपणे वक्तव्य करून त्याचे राजकीय भांडवले केले नाही, हा शिष्टाचाराचा व राजकीय संस्क़ृतीचा भाग आहे आणि उध्दव ठाकरे आजारी असताना कटकारस्थान करून शिवसेना पक्ष फोडणे याला विकृती म्हणतात. “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ऋण मी विसरु शकत नाही, ज्या दिवशी कौटुंबिकदृष्ट्या श्रीमान उध्दव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा पहिला मदतीला धावून मी जाईन’’ ही नरेंद्र मोदी यांचे विधान स्पष्ट, स्वच्छ आणि निर्मळ भूमिका असणारे नाही तर वातावरण निवळण्यासाठी चालवलेला खटाटोप आहे. नरेंद्र मोदी आज काहीही बोलले तर शिवसैनिक व महाराष्ट्रातील जनता त्यांना माप करणार नाही. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सकाळी लोकमान्य टिळक नगर, येथील गोल मैदान येथे मार्निंग वॉक करत स्थानिक लोकांशी संवाद साधला. वाकोला मार्केट येथे विविध समाजाच्या प्रमुख नेत्यांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. वांद्रे-कुर्ला कॉमप्लेक्समधील मोहमद इस्टेट येथील स्थानिकांशी संवाद साधला. तसेच टिळक नगर, कुर्ला, कलिना भागातील शिवसेना शाखांना भेटी दिल्या.

ऐन उन्हाळ्यात कलिंगड विक्री थंड

नवी मुंबई : उन्हाळा सुरू होताच थंडगार शीतपेय, रसाळ फळांना अधिक मागणी असते. यंदा तर अधिक उष्मा आहे. मात्र असे असताना देखील सध्या बाजारात आंब्याचा हंगाम सुरू असल्याने कलिंगडची मागणी रोडावली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच एपीएमसी फळ बाजारात थंडगार, रसाळ फळांच्या हंगामाला सुरुवात होत असते. आंब्यापाठोपाठ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात फळ बाजारात कलिंगड दाखल होण्यास सुरुवात होते तर मार्च-एप्रिलपासून मागणीत वाढत होते. सध्या बाजारात लाल रंगाच्या रसरशीत शरीराला थंडावा देणारी कलिंगड बाजारात मुबलक उपलब्ध झाली असून, तिची चव चाखण्यासाठी ग्राहकांनी मात्र पाठ फिरवली आहे, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. एपीएमसीत सध्या महाराष्ट्रसह तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथून आवक होते. सध्या बाजारात कलिंगडच्या १०० ते १३० गाड्या दाखल होत आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलोला ११ते १२ रुपये दर आहेत. तेच एप्रिल मध्ये १५ ते १६ रुपये बाजारभाव होते. एपीएमसीत आता आंब्याची आवक जास्त होत असून इतर फळांची मागणी कमी आहे. बहुतांशी ग्राहक आंबा खरेदीकडे वळला आहे. त्यामुळे बाजारात कलिंगडला म्हणावी तशी मागणी नाही. कोट एपीएमसी घाऊक बाजारात सध्या आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे ग्राहक आंबा खरेदीला पसंती देत असून कडक उन्हाळा असूनही रसाळ कलिंगडाची मागणी कमी आहे. मुर्तीझा खान, कलिंगड व्यापारी, एपीएमसी

‘राजाश्रय दिलेले गुंड तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको’

जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला ठाणे : ज्या गुंडांना गेल्या अडीच वर्षांत राजाश्रय देण्यात आला होता. त्या गुंडांनीच शिवसेनेच्या रॅलीत टोळीयुद्ध घडविले. हे गुंड कुणाचेच नसतात. आज ते एकमेकांच्या अंगावर गेले; उद्या ते तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको, अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यास जात असताना त्यांच्या रॅलीत सहभागी गुंडांमध्ये टोळीयुद्ध झाले. यासंदर्भात आव्हाड यांनी एक्स पोस्ट करून टीका केली. आपण जे पेरतो, तेच उगवत असतं. शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार आपला अर्ज भरायला जात असताना,  ज्या गुंडांना गेली अडीच वर्षे राजाश्रय दिला होता; त्या गुंडांच्या टोळ्यांमध्ये भररस्त्यात उघडपणे मारामारी झाली. स्वतः मुख्यमंत्री ज्या पक्षाचे प्रमुख आहेत, ते ज्या शहरात राहतात; त्याच शहरात त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची मिरवणुकीत टोळीयुद्ध होणार असेल तर हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. पूर्ण महाराष्ट्रात ठाण्याची लाज गेली. माझी खात्री आहे, पोलीस याच्यावर कुठलीही कारवाई करणार नाहीत. एखादा गुन्हा असलेल्यांना तडीपार करण्याच्या ऑर्डर काढणाऱ्या पोलिसांचे मला कौतूक वाटते. ज्या दोन गुंड टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध झाले. त्या टोळ्यांचे म्होरके हे कित्येक खुनाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. जणूकाही ते प्रशासनाचे जावई आहेत.  म्हणूनच आपण कोणाला जवळ ठेवतो आणि कोणाला मोठं करतो, याचे भान प्रत्येक राजकीय पक्षाने ठेवायला हवे. आज ते एकमेकांच्या अंगावर गेलेत. कारण ते कुणाचेच नसतात. उद्या ते तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको, असे आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

पालघरमधून अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात

पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात गुरुवारी आठ उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला. त्यात महाविकास आघाडीच्या तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या भारती कामडी यांचाही समावेश आहे. त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघात आता अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या तथा उद्धव गटाच्या भारती कामडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी पालघर-बोईसर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात माजी मंत्री आदित्य ठाकरे, कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा व आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे यांचीही उपस्थिती होती. यावेळी काढलेल्या रॅलीत तारपा नृत्य, ढोल-ताशांच्या गजरात मोठे शक्तिप्रदर्शन केले गेले. जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांच्या उपस्थितीत उमेदवार कल्पेश भावर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीतर्फे भरत वनगा, मार्क्सवादी लेनिन पार्टीतर्फे राहुल मेढा, सुरेश जाधव, दिनकर वाढान, भारत आदिवासी पार्टीतर्फे मोहन गुहे तसेच वासंती झोप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर दोन दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीतर्फे आमदार राजेश पाटील वंचित बहुजन आघाडीतर्फे विजया मात्रे तर बहुजन मुक्ती पार्टीतर्फे मीना भड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याने अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.