मुंबई: एक्झिट पोलमध्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महाराष्ट्रात धुव्वा उडाला असला तरी अरुणाचलमधून खुशखबर आहे. अरुणाचल विधानसभा निवडणूकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३ आमदार निवडूण आले आहेत.
अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण 15 उमेदवार उभे होते. यापैकी तीन जण निवडून आले आहेत. तर एक उमेदवार दोन मतांनी पडला आहे. दुसरा उमेदवार 200 मतांनी पडला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष. 46 आमदार जिंकत भाजपने विधानसभेतील आपली सत्ता राखली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रुफल पटेल यांनी अरुणाचल प्रदेशातील विजयाबद्दल तेथील विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा जिंकल्या असून पक्षाला एकूण 10 टक्के मतं पडली आहेत. राष्ट्रीय पक्ष होण्याच्यादृष्टीने हा विजय राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रफुल पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
लोकसभा निवडणूक संपल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोल्समध्ये महाराष्ट्रात अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. या निवडणुकीत अजितदादा गटाचे चार उमेदवार रिंगणात होते. तर राष्ट्रवादीच्या वाट्याची परभणीची पाचवी जागा अजित पवारांनी महादेव जानकर यांच्यासाठी सोडली होती. मात्र, अजित पवार यांनी लढवलेल्या एकाही जागेवर उमेदवार निवडून येतो की, नाही याबाबत साशंकताच आहे. एक्झिट पोलनुसार, अजित पवार गटाची फारफार तर एक जागा निवडून येऊ शकते.
विधानसभेची मुदत संपत असल्याने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारीच पार पडली.