बोर्डी : राज्याच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील उंबरगाव आणि नारगोल समुद्रकिनारी प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यामुळे गुजरात राज्यातील पर्यटकांचा ओघ आता बोर्डी या निसर्गरम्य समुद्रकिनारी, तसेच येथील वॉटरपार्कमध्ये वाढला आहे.
आता पावसाळा उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने कोणत्याही वेळी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन गुजरात प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यावरील बहुसंख्य पर्यटन केंद्रावर पर्यटकांना जाण्यास मनाई हुकूम काढला आहे. गुजरात राज्यातील वापी, सुरत, तसेच अन्य शहरांमध्ये प्रचंड तापमान वाढल्यामुळे थोडासा दिलासा मिळावा, म्हणून त्या भागातील ग्रामस्थ पर्यटनाचा व थोडाफार थंड हवेचा आनंद लुटण्यासाठी उंबरगाव, नारगोल, तसेच अन्य समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात पर्यटनाचा ओघ वाढला होता; मात्र १ जूनपासून गुजरात प्रशासनाने राज्यातील पर्यटकांवर समुद्रकिनारी जाण्यास मनाई हुकूम काढला आहे. हे नागरिक बोर्डी परिसरातील वॉटरपार्क, तसेच समुद्रकिनारी गार्डनमध्ये फिरण्यासाठी येत असल्यामुळे बोर्डी परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
