मुंबई : या वर्षीचा क्रिकेट मौसम आता संपला असून लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. मात्र पाऊस आहे म्हणून चार महिने घरात बसून न राहता या वेळेचा सदुपयोग करताना शारीरिक फिटनेस आणि क्रिकेटचं तंत्र पक्कं कारण्यासाठी इनडोअर क्रिकेटच्या सुविधांचा लाभ करून घ्या असे आवाहन भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी एजिस फेडरल इन्शुरन्स कप या १५ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात केले. तुम्ही जर असे केलेत तर ऑक्टोबर मध्ये जेव्हां नवीन मोसमाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही फॉर्मात राहू शकाल. मुंबईतील युवा क्रिकेटपटूनसाठी पावसाच्या चार महिन्यात इनडोअर क्रिकेटच्या सुविधा या महत्वपूर्ण ठरू शकतात असेही त्यांनी पुढे सांगितले. माहुल, चेंबूर येथील वेंगसरका क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत स्पोर्टींग्स क्लब कमिटी ठाणे संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी मुंबई क्रिकेट क्लब संघावर ९९ धावांनी विजय मिळविला.
मुंबई क्रिकेट क्लब संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, मात्र याचा लाभ उठवत स्पोर्टींग्स क्लब कमिटी संघाने निर्धारित ४० षटकांत ७ बाद २५७ धावांचे लक्ष्य उभारले. त्यांच्या प्रणव अय्यंगार याने सर्वाधिक ७९ धावा करताना तिसऱ्या विकेटसाठी रुद्र बन्दीछोड (४४) याच्या साथीने ९१ धावांची तर नंतर युग पाटील (४५) यांच्यासह चौथ्या विकेटसाठी ७५ धावांची भर टाकली.
या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई क्रिकेट क्लबच्या अरहाम शहा (४७) आणि आरव ठाकर (४६) या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली त्यावेळी हा संघ जोरदार लढत देणार असेच वाटत होते. मात्र हे दोघे बाद होताच त्यांच्या अन्य फलंदाजांनी देवांश शिंदेच्या अचूक गोलंदाजीसमोर सपशेल शरणागती पत्करली. देवांशने केवळ १८ धावांत ७ फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखवत त्यांचा डाव ३३ षटकांत १५८ धावांतच गुंडाळला. देवंशाला युग पाटीलने २६ धावांत २ बळी मिळवत चांगली साथ दिली. अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अपेक्षेप्रमाणेच देवांश शिंदेची निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आणि सर्वोत्तम खेळाडू म्हणून कृष्णा पोस्वाल (१३ बळी) याला गौरविण्यात आले तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून अरहाम शहा (१६२ धावा) आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून श्लोक शिगवण (५ झेल) यांना गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, एम.सी.ए.चे खेळपट्टी बनविण्यात विशेषज्ञ नदीम मेनन आणि एजिस फेडरलचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय गंगार्डे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक – स्पोर्टींग क्लब कमिटी ठाणे – ४० षटकांत ७ बाद २५७ ( विवान हजारे २५, रुद्र बन्दीछोड ४४, प्रणव अय्यंगार ७९, युग पाटील ४५) वि वि. मुंबई क्रिकेट क्लब – ३३.१ षटकांत सर्वबाद १५८ (अरहाम शहा ४७, आरव ठाकर ४४; देवांश शिंदे १९ धावांत ७ बळी , युग पाटील २६ धावांत २ बळी )
