मुंबई : देशात भाजपायुक्त एनडीए साडेतीनशे पार जात असल्याचे एक्झिट पोलमधून दिसत असले तरी महाराष्ट्रात मात्र महायुतीला फटका बसला आहे. फोडाफोडीचं राजकारण जनतेला
रुचलं नाही, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. विशेष म्हणजे खडसे भाजपाच्या वाटेवर असले तरी अद्याप त्यांचा पक्षात प्रवेश झालेला नाही.
राज्यात फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसे रुचलेल दिसत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं काही जागा कमी झाल्याचं चित्र दिसतय. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकसाठी महायुतीनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे खडसे म्हणाले.
मागील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही विकासकामं केली आहेत, ते पाहता जनतेने त्यांना पुन्हा एकदा पाठींबा दिल्याचं पाहायला मिळत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. चारशे पार होईल अशी आपल्याला अपेक्षा नव्हती. मात्र साडेतीनशे पार होईल हा विश्वास होता. पोलचां निकाल पाहता साडेतीनशे वर जागा मिळतील अशी चिन्हे आहेत असंही खडसे म्हणाले.
घरातील महिलांनी तुतारीचा प्रचार केला असला तरी कमळाला मतदान केल्याचे रक्षा खडसे यांनी वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचे एकनाथ खडसे यांनी खंडन केले आहे. रोहिणी खडसे यांनी उन्हा तन्हात फिरुन त्यांनी त्यांच्या पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळं लोक त्यांच्या पक्षाला मतदान करणार हे निश्चित असल्याचे खडसे म्हणाले. त्यामुळं रक्षा खडसे यांच्या मताशी आपण सहमत नसल्याचे खडसे यांनी म्हटलं आहे. रक्षा खडसे चांगल्या मतांनी निवडूण येतील असेही खडसे म्हणाले.
निवडणूक निकालानंतर आपला लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याची माहितीही एकनाथ खडसे यांनी दिली आहे.