अनिल ठाणेकर
ठाणे : शहापूर तालुक्यातील तानसा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील बोराळे पाडा भागातील विद्यार्थ्यांसाठी असलेली यांत्रिक बोट सुव्यवस्थित असून शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ने आण करण्याचे काम नियमितपणे सुरू होईल. तसेच बोटीसाठी आवश्यक प्रमाणात पेट्रोल उपलब्ध करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.
तानसा धरणक्षेत्रातील बोराळे पाडा ते सावरदेव पाडा भागातील मुलांना शाळेत ये जा करण्यासाठी दिलेली – बोट बंद असल्याबाबतच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या होत्या. या गोष्टीची शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन बोट चालू असल्याची खात्री केली तसेच त्या बोटीतून स्वतः व वर्षभर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यासह प्रवास केला. त्यामुळे यासंबंधी प्रसारित झालेल्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले आहे. बोराळे भागातील मुलांना शाळेत जा ये करण्यासाठी जुन्या बोटीचा वापर होत होता. परंतु या बोटी धोकादायक असल्याने राज्य शासनाने या विद्यार्थ्यांसाठी नवीन यांत्रिक बोट वर्षभरापूर्वी दिली होती. राज्य शासनाने दिलेली ही यांत्रिक बोट बंद असल्याबाबतच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी तातडीने याची दखल घेऊन शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्री. हिवाळे यांना जागेवर जाऊन चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज प्रकल्प अधिकारी श्री हिवाळे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यावेळी राज्यशासनाने दिलेली यांत्रिक बोट सुरू असल्याचे दिसून आले. तसेच ही बोट सुरू करून त्यातून त्यांनी व उपस्थित विद्यार्थ्यांनी फेरी ही मारली. सध्या शाळांना सुट्ट्या असल्याने या यांत्रिक बोट थांबलेली आहे. शाळा सुरू होताच ही बोट पुन्हा वापरात येऊ शकेल. या पाहणी वेळी या बोटीचा वर्षभर वापर करणारा विद्यार्थी कैलाश चिमडा व सावरदेव मधील नागरिक प्रदीप हे सुद्धा उपस्थित होते. ही बोट वर्षभर सुरू होती व पेट्रोल ची कोणतीही अडचण नव्हती. सध्या शाळा बंद असल्याने बोटीचा वापर होत नव्हता. परंतु ही बोट चालू स्थितीत असल्याचे श्री. प्रदीप यांनी यावेळी सांगितले. या बोटी शिवाय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर यांनी या वर्षी न्यूक्लिअस बजेट योजनेतून आणखी एक नवीन आधुनिक यांत्रिक बोट येथे उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता दोन्ही बोटी या कार्यरत रहाणार आहेत, असेही जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी स्पष्ट केले आहे.
