७ जूनपूर्वी कामे न झाल्यास कारवाई
प्रशासनाचा इशारा
मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावरील रस्ते वाहतुकीसाठी योग्य असावेत, यासाठी आवश्यक तेथे सपाटीकरण करावे, रस्त्यांच्या सखल भागात पावसाचे पाणी साचणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच खड्डे बुजविण्याच्या कामात कोणतीही दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडतोड खपवून घेतली जाणार नाही. सर्व रस्त्यांच्या डागडुजीची कामे ७ जूनपूर्वी पूर्ण करावीत. या मुदतीत कामे न झाल्यास संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा शुक्रवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकारी आणि अभियंत्यांना दिला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे बांगर यांनी शुक्रवारी पूर्व द्रुतगती महामार्गावरील विविध ठिकाणी भेट देऊन रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. चेंबूर पूर्व येथील के. बी. गायकवाडनगर, कुर्ला येथील राहुलनगर, घाटकोपर येथील छेडानगर, घाटकोपर येथील पंतनगर जंक्शन, जोगेश्वरी – विक्रोळी जोड रस्ता (जेव्हीएलआर) जंक्शन आणि घाटकोपर पूर्वस्थित नालंदानगर या ठिकाणांना त्यांनी भेट दिली.
यावेळी त्यांनी संबंधितांना आवश्यक सूचना केल्या. पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुख्य रस्ते आणि सेवा रस्ते वाहतुकीयोग्य असावेत, यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यात खड्डे बुजविण्याबरोबरच सुधारणा तसेच अयोग्य भागांच्या (बॅड पॅचेस) सपाटीकरणाचा समावेश आहे.
‘पावसाळ्यात खड्डे आढळल्यास ते तत्काळ बुजवा’
१) जोगेश्वरी – विक्रोळी जोड रस्ता (जेव्हीएलआर) जंक्शन येथे प्रायोगिक तत्त्वावर ‘जिओ पॉलिमर’ आणि घाटकोपर येथील गोदरेज कंपनीसमोर ‘मायक्रो सरफेसिंग’ या पद्धतींचा अवलंब करण्यात आला आहे.
२) रस्ते अभियंत्यांनी या दोन्ही पद्धतींचे फायदे स्पष्ट केले आहेत. सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेची आहेत. पावसाळ्यात खड्डे आढळल्यास ते तत्काळ बुजवावेत, असे निर्देश बांगर यांनी दिले.
‘समन्वय साधून प्राधान्यक्रम निश्चित करा’-
१) रस्ते विभागातील अभियंत्यांनी प्रत्येक झोनचे उपायुक्त, विभागांचे सहायक आयुक्त यांच्याशी समन्वय साधून रस्त्यांच्या डागडुजीचा प्राधान्यक्रम निश्चित करावा आणि वाहतुकीस अडथळा न येता दिवस – रात्र कामे पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी हे रस्ते पूर्ण वाहतुकीसाठी मुंबईकरांना उपलब्ध करून द्यावेत, असे बांगर यांनी नमूद केले.