मृतांच्या नातेवाईकांसाठी पाणपोई व इतर सुविधा
घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः घाटकोपर येथील राज्य सरकारच्या अखत्यारीतील राजावाडी शवविच्छेदन केंद्राच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. केंद्राची मोडकळीस आलेली इमारत, शवविच्छेदन सुरू असताना नातेवाईकांना बसायला नसलेली जागा, पाणपोई आदी सुविधा आता निर्माण झाल्या आहेत.
विशेष म्हणजे यासाठी पोलिस सर्जन डॉ. कपिल पाटील तसेच शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी यांनी सतत पाठपुरावा केला होता. अखेर या केंद्राला आता नवी झळाळी मिळाली आहे. पालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाजवळील हे शवविच्छेदन केंद्र फारच जुने होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. मोडकळीस आलेली इमारत, छत कोसळण्याचे प्रकार, मृतांच्या नातेवाईकांची आसन व्यवस्था, पिण्याचे पाणी, अस्वच्छता, कमी मनुष्यबळ अशा तक्रारींत वाढ झाली होती. याची दखल घेत केंद्राचे मुख्याधिकारी, पोलिस सर्जन डॉ. कपिल पाटील यांनी या ठिकाणी पाहणी करून राज्याचे वैद्यकीय उपसंचालक यांच्याकडे सतत पत्रव्यवहार केला होता.
दररोज ४० मृतदेहांची चिकित्सा
घाटकोपरच्या या केंद्रावर नवी मुंबई, मुंबई उपनगरे तसेच ठाण्यापासून ते अगदी रेल्वेच्या हद्दीतील मृतांचे शवविच्छेदन केले जाते. रोज हा आकडा सरासरी ३५ ते ४० इतका असतो. मात्र त्या तुलनेत सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकदा नागरिकांना याचा त्रास होत होता. याची दखल घेत डॉ. पाटील यांनी पोलिस सर्जन म्हणून नागपाडा येथे पदभार घेतल्यानंतर कमी वेळेत या केंद्राचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
