जालना : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल नुसार राज्यातक भाजपाप्रणित महायुतीच्या जागा कमी होताना दिसत आहेत. मराठा आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते आपल्या कर्माची फळे भोगत आहेत अशा शब्दात मनोज जरांगे यांनी एक्झिट पोलच्या निकालावर आपली प्रतिक्रीया दिली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी पंतप्रधानांवरती टीका केली नाही. त्यांचेच काही नेते मराठा समाजाचा द्वेष करतात. तिसऱ्यांदा सत्ता येऊ लागली म्हणून भीती दाखवत आहात का? परिसरात मोदी साहेबांना इथेच राहण्याची वेळ आली होती. भाजपच्या चार दोन लोकांमुळे ही वेळ आली, जे सत्य ते मी सांगितलं. राज्यात सर्वच जातींचे हाल झाले आहेत. इथून पुढे त्या जातीचा स्वाभिमान जागा होणार आहे. यांनी काही जातीचे नेते संपवले आहेत. काही जात संपवल्या आहेत. त्यांचे काही नेते आपला द्वेष करणे सोडत नाही, काड्या करणे, आंदोलन फोडणे, खोट्या केसेस करणे, हल्ले करणे सत्तेचा पदाचा दुरुपयोग करणे हे त्यांचे सुरूच असते, असा निशाणा त्यांनी यावेळी सरकारवर साधला आहे.
ते पुढे म्हणाले की, सर्व जातींना यांनी फसवलं आहे. धनगर, बंजारा, लिंगायत सर्वांची परिस्थितीच आहे. शेवटी नेते हरवायला लावते. अन्यायाला वाचा फोडायला जनतेला लोकशाही रूपी हत्यार हातात घ्यावे लागले. सत्ता गोड बोलून घ्यायची आणि त्या जनतेवर पुन्हा अन्याय करायचा. चार-पाच दिवसापासून आंदोलन मोडण्यासाठी सरकारकडून खोड्या सुरू आहेत. आम्हाला कोणाच्या गुलालाचा आनंद नाही. कोणी निवडून आला काय आणि कोणी पडला काय? आम्हाला फक्त आरक्षणाच्या गुलालात आनंद आहे.
कोणी निवडून आला आणि पडला तरी आनंद आहे. राग व्यक्त करू नका आणि कोणी सोशल मीडियावर पोस्टही करू नका. गाव पातळीवर एकही ओबीसी बांधव मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलन मोडण्यासाठी खोड्या करूच नये. गोडी गुलाबीने आंदोलन हाताळा. सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा, आम्हाला राजकारणात यायचं नाही. नाहीतर २८८ विधानसभा मतदारसंघात आम्ही वेगवेगळ्या जाती धर्माचे उमेदवार उभे करणार मग मात्र खूप फजिती होईल. ४ तारखेला मोठ्या संख्येने आंदोलक येणार आहेत. मी आंदोलनावर ठाम आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.