कासा : गेल्या काही दिवसांपासून कासा, चारोटी परिसरातील वीजपुरवठा नेहमी खंडित होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने परिसरात ऑनलाईन सेवा-सुविधा केंद्राचे काम खोळंबत आहे.

खरीप हंगामाकरिता शेतकरी पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ऑनलाईन सेवा केंद्रावर गर्दी होत आहे. आताच दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लागल्याने पुढील प्रवेशासाठी झेरॉक्स काढणे, त्याचबरोबर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी गर्दी होत आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसाने ग्रामीण भागात शेकडो शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. पंचनामा, तलाठी कार्यालयात लागणाऱ्या कागदपत्रांची झेरॉक्स काढण्याकामी नागरिकांना अडचण होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या घरातही उकाड्याने मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने पिण्याचे पाणीसुद्धा नागरिकांना मिळत नाही.

सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थी, तसेच शेतकरी यांना अनेक कागदपत्रांच्या झेरॉक्स काढताना हाल होत आहेत. त्यासाठी महावितरणने विजेच्या समस्येकडे लक्ष देऊन ती सोडवावी. सध्या अनेक वेळा ३३ केव्ही क्षमतेची वाहिनी बंद असते. विजेची मागणी वाढल्याने अनेक वेळा पुरवठ्यात कपात केली जाते. त्यामुळे वीजपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो. विजेचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *