मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी मंत्री, आमदार ॲड अनिल परब हे सोमवारी, ३ जून रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह मुंबईतील शिवसेनेचे लोकसभा उमेदवार अरविंद सावंत, अनिल देसाई, अमोल कीर्तिकर, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, काँग्रेस लोकसभा उमेदवार भूषण पाटील तसेच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १२ वाजता अनिल परब हे कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे उमेदवारी दाखल करतील. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा विधान परिषदेच्या चार जागांसाठी ८ मे रोजी निवडणूक आयोगाने निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदार संघासाठी अनिल परब यांच्या नावाची घोषणा मागच्या आठवड्यात केली. महायुतीचा उमेदवार अजूनही घोषित झालेला नाही.
यासंदर्भात बोलताना अनिल परब म्हणाले की, ‘गेली तीस वर्ष मुंबई पदवीधर मतदारसंघ शिवसेनेकडे राहिलेला आहे. मतदार नोंदणी आणि प्रचार यामध्ये शिवसेनेने आघाडी घेतली आहे. यावेळीसुद्धा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवार म्हणून माझा विजय विक्रमी मताधिक्यांनी निश्चित आहे.’
२००४ तसेच २०१२ आणि २०१८ असे तीन वेळा अनिल परब हे विधानपरिषदेचे शिवसेना आमदार राहिलेले आहेत. यावेळी प्रथमच ते मुंबई पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढत आहेत. या मतदार संघात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात यावेळी १ लाख १६ हजार ९२३ मतदार आहेत.
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ असे मतदान आहे. १ जुलै रोजी मतमोजणी आणि निकाल घोषित होणार आहे. ज्या ४ जागांसाठी निवडणूक होत आहे, त्या मतदारसंघातील चार विधान परिषद आमदारांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपुष्टात येत आहे.