अनिल ठाणेकर
ठाणे : शासन पातळीवर होत असलेल्या दुर्लक्ष्याच्या निषेधार्थ शालेय शिक्षण व्यवस्थेला पूरक अशी शैक्षणिक संस्था असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनेचे प्रतिनिधी म्हणून संगणक इंजिनियर अमोल गौतम जगताप हे कोकण पदवीधर निवडणूक लढविणार असल्याची माहिती कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष सतिश देशमुख यांनी दिली आहे.
गेल्या सहा महिन्यापूर्वी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने कोकण पदवीधर निवडणूक लढण्याचे जाहीर केले होते, त्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीनंतर कोकण पदवीधर निवडणूक जाहीर केली असल्याने संघटनेने ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. आजपर्यंत ७५०० तरुण पदवीधर यांचे फॉर्म संघटनेच्या वतीने भरण्यात आले असून हजारो माजी विद्यार्थी यांना संपर्क साधण्यात आलेला आहे. शासन पातळीवर होत असलेल्या दुर्लक्ष्याच्या निषेधार्थ शालेय शिक्षण व्यवस्थेला पूरक अशी शैक्षणिक संस्था असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने आता कोकण पदवीधर निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. महाराष्ट्रातील क्लासेस संचालक म्हणजेच खाजगी शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करत आहे. शालेय शिक्षण व्यवस्था कमकुवत पडत असताना शिक्षकांसह विद्यार्थ्याच्या हितासाठीही संघटना कार्यरत असुन अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर घडवण्यात याच क्लासेसचा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्राच्या विकासासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नसल्याने कोचिंग क्लासेस संघटना संतप्त झाल्या आहेत. या राज्यात केवळ सुशिक्षित पदवीधर निर्माण होत आहेत परंतु त्यांच्या रोजगाराबाबत कोणीही बोलत नाही. पदवीधरांच्या समस्यांबाबतही कोणताही विचार केला जात नाही. पदवीधरांना केवळ गृहीत धरण्यात येते. यामुळे आता मतदार नोंदणी यशस्वी झाल्यानंतर संघटनेच्या वतीने तरुण उमेदवार म्हणून संगणक इंजिनियर अमोल गौतम जगताप हे कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनेचे प्रतिनिधी म्हणून कोकण पदवीधर निवडणूक लढविणार असल्याचे सतिश देशमुख यांनी जाहीर केले आहे.
