आकाश सावला अजिंक्य
ठाणे : आकाश सावलाने अश्विन माळीचा पराभव करत शतकपूर्ती करणाऱ्या स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित खंडू रांगणेकर स्मृती एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. प्रथम फलंदाजी करताना अश्विन माळीने २ षटकात दोन षटकारांच्या सहाय्याने १२ धावा केल्या होत्या. पण या दरम्यान तो तीनवेळा बाद झाल्याने त्याच्या एकूण धावसंख्येतून ९ धावा वजा करण्यात आल्या. विजयावर शिक्कामोर्तब करताना आकाश सावलाने एकदाही बाद न होता २ षटकात १६ धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन वेळा चेंडू सीमापार पाठवला. याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत आकाशने आर्यन देशमुखचा पराभव केला होता. या लढतीत ८ चेंडूत आकाशाच्या खात्यात १३ धावा जमा झाल्या तर आर्यनला केवळ ९ धावा करता आल्या. अन्य लढतीत अश्विन माळीने सिद्धेश गावंडेंचा पराभव केला. अश्विनने १९ धावा बनवल्या तर सिद्धेशने १६ धावपर्यंत मजल मारली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत आर्यन देशमुख विजेता ठरला . आर्यनने ३९ धावा जमवल्या. या धावसंख्येला उत्तर देताना सिद्धेशने ३१ धावा केल्या. स्पर्धेत एकूण चार झेल आणि एक धावचीत करणाऱ्या रोहित राजभरला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे मोतीराम मोरेकर स्मृती पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
