आज ४ जून २०१४, आज लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आज समारोपाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या निमित्ताने देशात आज नव्या पर्वाचा प्रारंभ होत आहे.
आज काय होणार याकडे आज फक्त आमच्या वाचकांचेच नाही तर समस्त देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
या देशाने या संसदीय लोकशाही व्यवस्थेचे सात दशकांची वाटचाल पूर्ण केली आहे. या सात दशकात १७ लोकसभा निवडणुका झाल्या असून ही १८ वी लोकसभा निवडणूक आता समापनाच्या टप्प्यावर आलेली आहे. त्यामुळेच आज काय होणार याकडे याबाबत प्रत्येक जण उत्सुक आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनणार की दुसरा कोणी विरोधी बाकावरील कार्यक्षम व्यक्ती पंतप्रधान म्हणून शपथ घेणार याचा फैसला आज होणार आहे. आज जे काही होईल ते या देशाच्या हिताचेच असणार आहे, याबाबत कोणाच्याही मनात कोणतीही शंका नाही.
गेल्या सात दशकात देशाने पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह, राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, पी व्ही नरसिंहराव, एच डी देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, आणि डॉक्टर मनमोहन सिंह असे दिग्गज पंतप्रधानपदी विराजमान झालेले पाहिले. या काळात १९९८ ते २००४ हा कालखंड वगळता उर्वरित काळ या देशाने काँग्रेस विचारसरणीची राजवट अनुभवली. खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाची आणि पूर्णतः गैर काँग्रेसी राजवट २०१४ पासून या देशात सुरू झाली. ही राजवट दीर्घकाळ टिकणार नाही, २०१९ मध्ये सत्तापालट होईल, असा अंदाज असतानाच हा अंदाज खोटा ठरवत मतदारांनी पुन्हा एकदा भाजप विचारसरणीलाच कौल दिला. सलग दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवले. नरेंद्र मोदींनी दहा वर्षाचा कालखंड पूर्ण केला आहे. जर आज जनतेने कौल दिला तर नरेंद्र मोदी तिसऱ्या फेरीसाठी सज्ज होतील हे नक्की.
गेले सुमारे दोन महिने निवडणूक प्रचाराने संपूर्ण देशातील वातावरण तापले होते. नरेंद्र मोदी समर्थकांना मोदीच पुन्हा पंतप्रधानपदी हवे होते, तर मोदी विरोधकांना आता कोणत्याही परिस्थितीत मोदी नको होते .इथे दुसरा कोणीतरी हवा अशी त्यांची आग्रही मागणी होती. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्नही चालू होते. त्यामुळे निवडणूक काळात प्रचंड आरोप प्रत्यारोप झाले. काही वेळा पातळी सोडूनही टीका केली गेली. परिणामी वातावरण चांगलेच गढूळ झाले होते १ जून रोजी शेवटले मतदान पार पडले. त्याआधी ३० मे रोजी प्रचार थांबला आणि आरोप प्रत्यारोप थांबल्यागत वाटत होते. मात्र १जून रोजी संध्याकाळी सर्वच वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलचे अंदाज द्यायला सुरुवात केली आणि पुन्हा वादाला सुरुवात झाली. अजूनही वाद सुरूच आहे. आज निकाल जाहीर झाल्यावर देशाचे नेतृत्व कोण करणार आणि विरोधी बाकावर बसून सत्ताधाऱ्यांवर अंकुश कोण ठेवणार ते ठरेल, आणि मग हे टीकाटिपणीचे कवित्व थांबेल अशी आशा करू या.
एक्झिट पोलचे जे अंदाज आले आहेत, त्या बहुतेक सर्व विश्लेषकांनी यावेळी सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि त्यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी हीच बहुमतात राहील आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असे अंदाज व्यक्त केले आहेत. मात्र या अंदाजाला विरोधातील इंडिया आघाडीच्या नेत्यांनी विरोध केला आहे. त्यांच्या मते इंडिया आघाडी २९५ प्लस इतक्या जागा घेऊन सत्तेत येणार आहे. नेमके खरे कोणाचे होते आणि चुकीचा अंदाज कोणाचा ठरतो हे आज संध्याकाळपर्यंत निश्चित झालेले असेल.
नरेंद्र मोदी यांना जर पुन्हा संधी मिळाली तर तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणारे ते देशातील तिसरे पंतप्रधान ठरते ठरतील. याआधी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५२, १९५७ आणि १९६२ अशी तीनदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांचीच कन्या इंदिरा गांधी यांनीही १९६६, १९६७, आणि १९७२ अशी सलग तीनदा शपथ घेतली होती. नंतर १९७७ मध्ये पराभूत झाल्यावर १९८०मध्ये पुन्हा शपथ घेण्याचा योग त्यांच्या आयुष्यात आला होता.
पंतप्रधानपदाची तीनदा शपथ घेणारे आणखी एक भाग्यवान व्यक्ती म्हणजे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे होते. त्यांनी सर्वप्रथम १९९६ मध्ये पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मात्र त्यांचे सरकार जेमतेम १३ दिवस टिकले. त्यानंतर त्यांनी १९९८ आणि १९९९ मध्ये शपथ घेतली होती. मात्र दुर्दैवाने एकदाही पाच वर्षाचा सलग कालखंड ते पूर्ण करू शकले नाहीत.
त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा कालखंड लक्षणीय ठरतो, त्यांनी २०१४ मध्ये प्रथमच शपथ घेतली. त्यानंतर पाच वर्षाचा कालखंड पूर्ण केला होता. २०१९ मध्ये दुसऱ्यांदा शपथ घेतली. तेव्हाही पाच वर्षाचा कालखंड पूर्ण केला. विशेष म्हणजे १९८४ नंतर २००९ पर्यंत देशात लोकसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. २०१४ मध्ये मोदींच्या नेतृत्वात प्रथमच भारतीय जनता पक्षाला २८२ जागा मिळाल्या आणि स्पष्ट बहुमत मिळवणारा पक्ष म्हणून त्यांची नोंद झाली. २०१९ मध्ये हा आकडा वाढून ३०३ वर गेला होता.
यावेळी एक्झिट पोल मध्ये भाजपाचा हा स्पष्ट बहुमताचा आकडाही वाढणार असल्याचे कल त्यांनी जाहीर केले आहेत. यातले काय खरे होते आणि काय खोटे निघते हे आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट झालेले असेलच. या देशाचा पंतप्रधान कोण होणार हे चित्र पुढल्या दोन-तीन दिवसात स्पष्ट झालेले असेल, आणि नव्या जोमाने देश उभारणीसाठी जे कोणी सत्तेत येतील ते सज्ज झालेले असतील.
भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर अणुशास्त्रज्ञ डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी देशाला जागतिक महासत्ता बनवण्याचे स्वप्न बघितले होते. ते स्वप्न साकार करण्यासाठी या देशाचे नेतृत्व सक्षम अशा हातातच जायला हवे. आज मतदार हे नेतृत्व कोणाच्या हातात देणार हे निश्चित होणार आहे. या निमित्ताने जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या राष्ट्रात एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे.येणाऱ्या नव्या पर्वाला आणि नव्या नेतृत्वाला दैनिक बित्तम बातमीच्या खूप खूप शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *