वाचा आणि शांत बसा !

स्वाती घोसाळकर

मुंबई : अवघा देश आज लोकसभेच्या मतमोजणीसाठी आकड्यांच्या खेळात दंग असताना इकडे सरकारने हळूच दरवाढीस सुरवात केलीय. मतदान होताच जनतेला पहिला झटका अमुल दूध दरवाढीचा तर दुसरा झटका राष्ट्रीय महामार्गावरील टोल दरवाढीचा बसला आहे. २ जूनच्या मध्यरात्रीपासून देशातील सर्व महामार्गावर अतिरिक्त टोल द्यावा लागणार आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आजपासून टोल दरात पाच टक्क्या पर्यंतची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यातील मतदान पूर्ण होताच गरज सरो आणि वैद्य मरोच्या थाटात ही वाढ करण्यात आली आहे.

गुजरात कॉर्पोरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) अमुल दुधाच्या किंमतीत प्रती लीटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. दुधाच्या वाढलेल्या किंमती आजपासून (सोमवार, ३ जून) लागू झाल्या आहेत. जीसीएमएमएफने केलेल्या घोषणेनुसार अमुल दूध दोन रुपयांनी महागले.

अमुलने जाहीर केलेल्या नव्या किंमतींनुसार ‘अमुल गोल्ड’च्या अर्धा लीटरच्या पाऊचसाठी (पिशवी) आता ३२ ऐवजी ३३ रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच ग्राहकांना अमुल गोल्डच्या एक लीटर पाऊचसाठी आता ६४ ऐवजी ६६ रुपये खर्च करावे लागणार आहेत. ‘अमुल ताजा’साठी (अर्धा लीटर) २६ ऐवजी २८ रुपये, ‘अमुल शक्ती’साठी (अर्धा लीटर) २९ ऐवजी ३० रुपये मोजावे लागणार आहे.

एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, टोल दरात दरवर्षी वाढ करण्यात येत असते. ही दरवाढ आधीच होणार होती, मात्र आचारसंहितेच्या काळात टोल दरात वाढ करू नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. यामुळे टोल दरवाढ निवडणूक काळात रोखण्यात आली होती. आता ३ जून २०२४ पासून टोलच्या दरात ३ ते ५ टक्क्यांपर्यंतची वाढ करण्यात येत आहे. सोमवारपासून देशभरातील १,१०० टोल प्लाझावर टोल दरवाढ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *