महविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी लावली हजेरी
नेते सुभाष देसाई यांची उपस्थिती
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी मंत्री ॲड. अनिल परब यांनी आज सोमवारी दि. ३ जून रोजी नवी मुंबईतील कोकण भवन येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. हि निवडणूक प्रचंड मताधिक्यांनी जिंकण्याचा विश्वास यावेळी ॲड. अनिल परब यांनी व्यक्त केला.
गेली १८ वर्षे विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार असलेले ॲड. अनिल परब यावेळी मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ॲड. परब सकाळी ११ वाजता वांद्रे येथील निवासस्थानातून बाहेर पडले. एमआयजी क्लब येथेून हजारो शिवसैनिकांसह ते नवी मुंबईत आले. यावेळी ॲड. परब यांच्याबरोबर मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, पदवीधर मतदार यांच्यासह हजारो कार्यकर्ते सोबत होते. यावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी बेलापूरचा परिसर दुमदुमून गेला होता.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ॲड.परब म्हणाले, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादाने मी मुंबई पदवीधर मतदारसंघात आज उमेदवारी दाखल केली. मी शिवसैनिकांच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला विजय मिळवून देईन. महामुंबईमध्ये शिवसैनिकांनी ज्याप्रमाणे मतदार नोंदणी केली त्याच्या जोरावर प्रचंड मताधिक्यानी विजयी होण्याचा मला विश्वास आहे, असा विश्वास ॲड. परब यांनी व्यक्त केला.
त्यापुढे बोलताना ॲड परब म्हणाले कि, समोर प्रतिस्पर्धी कोणीही असला तरी त्यांचा टिकाव लागणार नसल्याचा दावा केला. मी प्रत्यके लढाईत पूर्ण ताकतीनिशी उतरतो. प्रत्येक लढाई हि माझ्या, पक्षाच्या, शिवैनिकांच्या ताकतीवर आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादावर लढत असतो. त्यामुळे समोर प्रतिस्पर्धी कोण, तो किती तुल्यबळ आहे, याची तमा न बाळगता शिवसैनिक ताकतीने लढत असतो. शिंदे गट किंवा भाजप कोणीही माझ्यासमोर येऊ देत. बाळासाहेबांच्या आशीर्वादासमोर आणि शिवसैनिकांच्या ताकतीसमोर कोणीही टिकणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे, असे ॲड परब म्हणाले.
यावेळी खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, शेकापचे आमदार जयंत पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, आमदार सुनील प्रभू, आमदार अजय चौधरी, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख, उपनेते अमोल कीर्तिकर, आमदार विलास पोतनीस, आमदार रमेश कोरगावकर, आमदार प्रकाश फातर्फेकर इत्यादी उपस्थित होते.
शिवसेनेचे विलास पोतनिस यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ ७ जुलै रोजी संपत आहे. त्या जागी ॲड. परब यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उमेदवारी दिली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात यावेळी १ लाख १६ हजार ९२३ मतदार आहेत. ७ जून उमेदवारी दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ असे मतदान आहे. १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
