मनोर : महावितरण कंपनीकडून मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या ग्रामीण भागासह मनोर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. यामुळे पंखे वेगाने फिरत नसल्याने ग्रामस्थांना घामाघूम होण्याची वेळ आली आहे. सावरखंड उपकेंद्राच्या ढेकाळे फिडरवरील २० ते २५ गावांसह मनोरलगतच्या गावांना कमी दाबाने वीजपुरवठा केला जात आहे. दरम्यान, विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मुख्य वीजवाहिनीतूनच कमी दाबाने विजेचा पुरवठा होत असल्याने विजेचा दाब कमी येत असल्याची माहिती महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी दिली.
महावितरणच्या सवरखंड उपकेंद्रांतून ढेकाळे फिडरद्वारे महामार्गालगतच्या गावांना वीजपुरवठा केला जातो. ढेकाळे फिडरवर सुमारे २२ गावे आणि सुमारे शंभरपेक्षा अधिक पाड्यांना वीजपुरवठा पोहोचवला जात आहे. फिडरपासून ५० ते ६० किलोमीटर अंतराच्या वीजवाहिन्या आणि आठ ते दहा टॅबलाईन मार्फत गाव-पाड्यांना वीजपुरवठा सुरू आहे. मनोर फिडरवरून अनेक गावांना वीजपुरवठा केला जात आहे.
पालघरवरून सवरखंड उपकेंद्रांवर येणाऱ्या ३३ केव्ही दाबाच्या मुख्य वीजवाहिनीमधून उपकेंद्राला कमी दाबाने वीजपुरवठा होतो. परिणामी फिडर होणारा वीजपुरवठा कमी दाबाने होतो. साधारणपणे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून उकाडा वाढल्यानंतर विजेच्या मागणीत वाढ झाली होती. एप्रिलपासून ढेकाळे फिडरवरील शेवटच्या टोकाला असलेल्या गुंदावे, दहिसर तर्फे मनोर आणि साखरे आदी गावांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. दीडशे व्हॉल्टपेक्षा कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने घरगुती वापरातील विजेवर चालणारी उपकरणे काम करेनाशी झाली आहेत. कमी दाबामुळे एसी आणि कुलर चालत नसल्याने गर्मीच्या हंगामामध्ये थंड हवेचा आनंद घेण्यासाठी एसी कुलर खरेदीला केलेला खर्च पाण्यात गेल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांचे हाल
कमी दाबामुळे पाण्याचे पंप चालत नसल्याने भाजीपाला लागवडीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. घरगुती वापराची उपकरणे व्यवस्थित काम करत नसल्याने गृहिणींनी संताप व्यक्त केला आहे. भाजीपाला आणि दुग्धजन्य पदार्थ नसण्याचे प्रमाण वाढल्याने गृहिणींना गैरसोय होत आहे. विजेच्या कमी दाबामुळे रात्रीच्या वेळी पंखे वेगाने फिरत नसल्याने घामाघूम होत रात्र काढावी लागत आहे.
बजेट कोलमडले
महामार्गावरील हॉटेल आणि अन्य व्यावसायिक, आस्थापना मालकांची गैरसोय होत आहे. कमी दाब आणि वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने हॉटेलमध्ये वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी जनरेटर चालवावे लागत असल्याने डिझेल खर्चात वाढ झाली. खर्च वाढल्याने हॉटेलचालकांचे आर्थिक बजेट कोलमडून पडले आहे.
