ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे पक्षाचे डाॅ. श्रीकांत शिंदे हे निवडणूक जिंकले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचे मताधिक्य घटलेले आढळून आले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार व मुक्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डाॅ श्रीकांत शिंदे हे ५ लाख ८७ हजार ९२१ मते मिळवून विजयी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली राणे-दरेकर यांना ३ लाख ७९ हजार २३६ मते मिळाली. म्हणजेच श्रीकांत शिंदे यांना दरेकर यांच्यापेक्षा २ लाख ८ हजार ६८५ मते अधिक मिळून ते निवडून आले. पण आमदार जितेंद्र आव्हाड प्रतिनिधीत्व करत असलेल्या कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात मात्र वैशाली दरेकर यांना १ लाख ३५ हजार ४९६ मते मिळाली तर श्रीकांत शिंदे यांना अवघी ६९ हजार ९८८ मते मिळाली. म्हणजे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा मतदारसंघात वैशाली दरेकर यांना श्रीकांत शिंदे यांच्यापेक्षा ६५ हजार ५११ चे मताधिक्य मिळवून दिली. अंबरनाथमध्ये ३५ हजार ६४२, उल्हासनगरमध्ये ५४ हजार ७५७, कल्याण पूर्व ३२ हजार ५९६, डोंबिवली ६५ हजार २०३, कल्याण ग्रामीण ८६ हजार २९५ या विधानसभा मतदारसंघातील मताधिक्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. कळवा मुंब्र्यात राहूल गांधी यांची झालेली दुसरी भारत यात्रा, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा रोड शो, शरद पवार यांनी घेतलेली सभा महत्वाचे म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मतदारसंघात घेतलेली मेहनत या सर्वांचा परिणाम  वैशाली दरेकर यांचे मताधिक्य वाढण्यात तर श्रीकांत शिंदे यांचे मताधिक्य घटण्यात झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *