विशेष
श्याम ठाणेदार
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. गेल्या वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे यावर्षी राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. दिवसेंदिवस दुष्काळाचे हे सावट आणखी गडद होत चालले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शेतीसाठी तर सोडाच पण पिण्यासाठीही पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. संपूर्ण राज्यात दुष्काळाच्या झळा जाणवत आहे. धरणातील पाणी साठा कमी होत चालला आहे. अनेक धरणे कोरडी पडली आहेत. राज्यातील धरणात वीस टक्क्यांपेक्षा कमी पाणी साठा शिल्लक आहे. अनेक गावातील पाण्याची पातळी खालावली आहे. मराठवाड्यातील काही तालुक्यात तर पाण्याची पातळी तीन ते सहा मीटरने खालावली आहे. विहिरी, तलाव, नद्यांनी तर केंव्हाच तळ गाठला आहे. एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना कैक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. राज्य सरकारने राबवलेल्या जलयुक्त शिवाय योजनेमुळे काही गावांना दिलासा मिळाला असला तरी टँकर मुक्त महाराष्ट्र हे राज्यसरकारचे स्वप्न अद्याप साकार झाल्याचे दिसत नाही. अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. एकट्या मराठवाड्यात शेकडो टँकर सुरू आहेत. राज्यातील करोडो नागरिकांवर पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्याची ही अवस्था तर शेतिसाठीच्या पाण्याचे काय ? पाण्याअभावी खरिपाचे पीके वाया गेली आहेत आता रब्बीचे पिकेही धोक्यात आहेत. पोटच्या पोरासारखे सांभाळले पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना चारा छावणीचा आधार घ्यावा लागत आहे. एकूणच या दुष्काळाने शेती उद्योगच धोक्यात आला आहे. पाण्याअभावी ग्रामीण भागातील नागरिक स्थलांतर करू लागले आहेत. पाणी नसल्याने उपवर मुलामुलींचे विवाह लांबले आहेत. एकूणच या दुष्काळाने राज्याची दैनावस्था झाली आहे. हा दुष्काळ १९७२ पेक्षाही भीषण आहे असे काही जाणकार सांगत आहेत. ही परिस्थिती मागील काही वर्षात सातत्याने दिसत आहे. सर्वाधिक जलसिंचन आणि धरणे महाराष्ट्रात असूनही महाराष्ट्राला नेहमीच दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. ही जरी नैसर्गिक आपत्ती असली तरी याला आपणच जबाबदार आहोत. उपलब्ध पाण्याचा कसाही वापर करणे, पाणी वापराचं नियोजन नसणे, पावसाचं पाणी साठवण्यासाठी सहकार्य व नियोजनाचा अभाव, शेतकरी, उद्योगपती, व्यापारी, कामगार व सर्वसामान्य नागरिक यांनी पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीची उपाययोजना न करणे, गरजेपेक्षा अधिक पाणी उपसा, वाळू उपसा, पाणी गळती यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. वृक्षतोड, जंगल तोड यामुळे पर्यावरणाचा दिवसेंदिवस रहास होत चालला आहे त्यामुळे ऋतुचक्रही बदलले आहे. ग्लोबल वॉर्मिगमुळे पृथ्वीचे तापमानही वाढत चालले आहे. यावर्षी आपण त्याचा अनुभव घेतला आहे. जगातील सर्वात उष्ण शहरात देशासह राज्यातील काही शहरांचा समावेश होऊ लागला आहे. यावर्षी आपल्या राज्यातील सर्व शहरांचे सरासरी तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअस इतके होते. दिल्ली राजस्थान येथील तापमानाच्या पाऱ्याने तर पन्नाशी ओलांडली आहे. चुकीच्या पीक पद्धतीमुळे जमिनीचा पोत कमी होऊ लागला आहे. लोकसंख्या जरी वाढत चालली असली तरी पाण्याचे साठे मर्यादित आहेत त्यामुळे पाण्याची टंचाई कायम जाणवत राहणार आहे. पाण्याचा वापर, पाण्याची साठवण आणि जिरवण आणि पुनर्भरण याबाबत आपण आज जर सावध झालो नाही तर आपल्याला भविष्यात खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल एवढं निश्चित. इस्राईल सारखा छोटा देश अत्यल्प पाण्याचे नियोजन करून समृध्द बनू शकतो तर आपण का नाही ? इस्राईल पेक्षा आपल्या देशात खूप जास्त पाऊस पडतो. या पावसाच्या पाण्याचा संचय हा दुष्काळावर उपाय ठरू शकतो. त्यासाठी जलसंधारण योजना आखणे व ती पूर्णत्वास जाणे गरजेचे आहे. पावसाच्या पाण्याचा एक थेंबही वाया न जाऊ देता ते पाणी वाचवायला हवे. त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करायला हवा. केवळ मोठ्या इमारतीतच नव्हे तर लहान घरातही विशिष्ट तंत्र वापरून पाणी साठवता येऊ शकते. सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, अस्थापने, दुकाने, बँका, सहकारी गृहनिर्माण सोसायट्या यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करायला हवे. वाढती वृक्षतोड थांबवून जास्तीतजास्त वृक्षलागवड करायला हवी. लावलेली वृक्ष जगवायाला हवे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना एक वृक्ष लावायला देऊन त्याची वाढ करायला सांगावी. हवे तर यासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात यावे. चुकीच्या पीक पद्धती बदलायला हव्यात. ऊस, केळी यासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांना ठिबक सिंचन सक्तीचे करायला हवे. श्रमदानातून जलसंधारणाची कामे करून जनतेचे प्रबोधन करायला हवे. वाढत्या लोकसंख्येला आळा घालायला हवा. दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीला आपणच जबाबदार असल्याने तिच्यावर मात करण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करायला हवे. दुष्काळ निवारण ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ती आपल्या सर्वांचीच आहे. दुष्काळ निवारण्याच्या सरकारच्या प्रयत्नास आपण सर्वांनी साथ दिल्यास या भीषण आपत्तीवर मात करता येऊ शकेल.