भाईंदर  : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मिरा भाईंदर शहरातील धोकादायक वाटणारी सुमारे २०० झाडे महापालिकेकडून तोडण्यात आली आहेत, मात्र त्यात काही चांगल्या झाडांवरदेखील महापालिकेकडून कुऱ्हाड चालविण्यात आल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. हा प्रकार पर्यावरण दिनीही सुरू असल्याने वृक्षीप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पावसाळ्यादरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कमकुवत झालेले अनेक वृक्ष कोसळून पडण्याच्या घटना घडतात. यात काहीवेळा वित्तहानी किंवा जीवितहानीही होत असते. यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेच्या वन विभागाकडून अलीकडेच शहरातील सुमारे दोन हजार झाडांची छाटणी करण्यात आली, तर धोकादायक वाटणारी सुमारे २०० झाडे कापण्यात आली आहेत, मात्र या कार्यवाहीत अनेक चांगल्या वृक्षांचाही बळी गेला आहे, असे शहरातील वृक्षीप्रेमींचे म्हणणे आहे.

पावसाळ्याच्या आधी झाडांचे शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण करणे आवश्यक असते. त्यात झाडाला कीड लागली आहे का, ते आतून पोखरले गेले आहे का, याची पाहणी महत्त्वाची असते. त्यानंतर झाड धोकादायक आहे की नाही, हे ठरवून शहरातील धोकादायक वृक्षांची यादी तयार करणे व या यादीला वरिष्ठांची मान्यता घेऊन तज्ज्ञांकडून पुन्हा त्याची पडताळणी केली जाते व त्यानंतर ती कापण्याची कार्यवाही होणे अपेक्षित असते, परंतु झाडांची शास्त्रीय तपासणी न होता महापालिका कर्मचाऱ्यांकडून झाडांचे केवळ वरवर सर्वेक्षण करण्यात आले. या कर्मचाऱ्यांना प्रथमदर्शनी जी झाडे धोकादायक वाटली, ती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली.

काही झाडे केवळ एका बाजूला झुकली असल्याने तोडण्यात आली आहेत. अशा झाडांच्या ती ज्या बाजूला झुकली आहेत, त्या बाजूच्या फांद्यांची छाटणी करून झाडाचा भार हलका करायचा असतो, असे वृक्षप्रेमींचे म्हणणे आहे, परंतु महापालिकेकडून सरसकट चांगली झाडेही कापण्यात आल्याने वृक्षीप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पर्यावरण दिनाची ‘भेट’

पर्यावरण दिनीही ही वृक्षतोड सुरू असल्याने या संतापात आणखी भर पडली आहे. आधीच जागतिक तापमानात दिवसेंदिवस भर पडत आहे. त्याला मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. असे असताना महापालिकेकडून चांगल्या व जुन्या झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याने वृक्षप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *