मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या नेतृत्त्वाला महाराष्ट्रात ४५ पारचा आकडा दिला होता, तो आकडा गृहित धरुन तिथं मोदींनी चारशे पारची घोषणा केली आणि मोदी तोंडघशी पडले. अशी टीका करतानाच महाराष्ट्रात भाजपचा जो दारुण पराभव झाला होता त्याची जबाबदारी कुणीतरी घेणं आवश्यक होतं. ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

 विधानसभा निवडणुकीला जायचं असेल तर काही तरी करेक्शन करावं लागेल. त्यांना निवृत्त करतात की नाही, त्यांचा राजीनामा स्वीकारला जातो की नाही हा त्यांचा अंतर्गत भाग आहे असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत भाजपला जे अपयश आलेलं होतं त्याची जबाबदारी स्वीकारुन राज्य सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती पक्षनेतृत्त्वाला केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर चव्हाण यांनी प्रतिक्रीया दिली.

सकृतदर्शनी तरी दिल्लीच्या नेतृत्त्वाची दिशाभूल केली हे दिसून येतेय, खूप आशादायक चित्र निर्माण केलं त्याची जबाबदारी त्यांना स्वीकारावी लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.  त्यामुळं मला वाटतं कुठतरी भाजपचा ग्राऊंड रिअलिटीचा टच संपलेला आहे. त्यांनी जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं, त्याला नरेंद्र मोंदींचा थेट आशीर्वाद मिळवला, त्याची जबाबदारी घ्यावी लागेल, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

आता मात्र सरकारपुढं दुष्काळ हाताळणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे.  आचारसंहिता संपलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या दु:खाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

आता असं आहे की निवडणुका दोन महिन्यात  जाहीर होतील. त्यामुळं सरकारमध्ये फार दम राहिलेला नाही. परंतु, कुणाच्या नेतृत्त्वाखाली जायचं हा मोठा प्रश्न आहे, भाजपला त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. मंत्रिमंडळातून देवेंद्रजी बाहेर पडले तर तिथं पर्याय कोण येणार, त्याला उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल की त्याला मुख्यमंत्रिपद दिलं जाईल हे पाहावं लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

एकनाथ शिंदेंना विधानसभेला सामोरं जाण्याची जबाबदारी टाकली जाईल, कारण हे एकनाथ शिंदे यांचं देखील अपयश आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे,  असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *