बीड: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम हा निश्चितपणे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक संस्कृती आहे. येथे रडीचा डाव खेळलेला चालत नाही. पक्ष फोडले तरी त्यांचे जास्त उमेदवार निवडून आले. या लोकसभेच्या निकालांमुळे समोरच्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. असा धोक्याचा इशारा बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांनी स्वपक्षाला दिला आहे.
त्या बुधवारी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी उमद्या मनाने आपला पराभव स्वीकारला. मात्र, पंकजा मुंडे यांनी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा प्रत्येक गोष्टीवर होत असतो. त्यामुळे जे पक्ष फुटले, तरीही लोकसभेत त्यांचे जास्त खासदार निवडून आले, त्यांचा आत्मविश्वास वाढेल. समोरच्या बाजूला अत्यंत अनुभवी नेते आहेत. शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेता आहे, त्यांना चांगल्या जागा मिळाल्या आहेत. उद्धव ठाकरेजींच्या शिवसेनेलाही जास्त जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आम्ही पक्ष म्हणून आणि महायुती म्हणून जास्त मेहनत केली पाहिजे. जातीवादाचा माझ्या निवडणुकीवर परिणाम होत आहे, हे मी सतत सांगत होते. त्यादृष्टीने आमच्या पक्षाला स्ट्रॅटेजी आखावी लागेल, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
मी फेरमतमोजणीची मागणी केली होती. पण ती मान्य झाली नाही. यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. पण मला माझा पराभव मान्य आहे. पराभवदेखील हा प्रतिष्ठेने स्वीकारला पाहिजे, अशी शिकवण मुंडे साहेबांनी आम्हाला दिली आहे. उलट पराभव झाल्यानंतर चेहरा अधिक प्रसन्न आणि हसरा ठेवून लोकांमध्ये जायला पाहिजे, असे त्यांनी आम्हाला शिकवले. कारण लोक आपल्यासाठी मर मर काम करतात. त्यामुळे लोकांना वाटता कामा नये की आपला नेता डळमळीत झाला आहे. लोकांनी मला अपेक्षित दिली त्यासाठी मी त्यांची ऋणी आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
