अनिल ठाणेकर

ठाणे : अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कार्यरत झाली आहे.‌ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अतिसार नियंत्रण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना जिल्ह्यातील अर्भक व बालमृत्युदर दर कमी करणार असल्याचे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी व्यक्त केले.

आरोग्य विभागामार्फत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा आज, ६ जून ते २१ जून या कालावधी दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असून अर्भक व बालमृत्युदर दर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. देशात पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून, ५ ते ७ टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. या बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे.‌ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.अतिसाराच्या उपचारासाठी सर्व आरोग्य संस्थांमध्ये बाह्य रुग्ण विभागात व आंतररुग्ण विभागात ओआरएस व झिंक कॉर्नर स्थापन करण्यात येणार असून या कॉर्नरमध्ये ओआरएस पाकिटे व झिंक गोळ्या उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. कार्यक्रम जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली पार पाडणार असून जिल्हास्तरीय पर्यवेक्षण देखील त्यांच्याकडून केले जाणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. दरवर्षी शासनातर्फे एकाचवेळी हा कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उन्हाळा व पावसाळा या हंगामामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणाऱ्या अतिसाराच्या संभाव्य घटना टाळल्या जातात. या पंधरावड्या मध्ये आशा स्वयंसेविका कार्यक्षेत्रातील सर्व घरांना भेटी देणार असून ५ वर्षांखालील सर्व मुलांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. अतिसार लागण झालेल्या सर्व मुलांना ओआरएस पाकीट व झिंक गोळ्यांचे वाटप आरोग्य विभागाकडून करण्यात येणार असून पाच वर्षांखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध व व्यवस्थापनासाठी क्षेत्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण व समुपदेशन केले जाणार आहे. हा कार्यक्रम राबवताना अति जोखमीचे क्षेत्र व दुर्बल घटकांवर आरोग्य विभाग विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. विशेष झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग, आरोग्य सेविका कार्यरत नसलेली उपकेंद्रे, भटक्या जमाती, विटभट्टी कामगार, स्थलांतरित मंजूर, बेघर मुले आशा ठिकाणी विशेष लक्ष दिले जाणार असून मागील २ वर्षात अतिसाराची साथ असलेले क्षेत्र व दूषित पाणीपुरवठा क्षेत्र याकडेही प्राधान्याने लक्ष केंद्रित केले जाणार आहे.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आरोग्य सेविकेमार्फत ग्राम आरोग्य पोषण दिवशी ५ वर्षांखालील बालकांच्या माताना अतिसाराचा प्रतिबंध कसा करावा तसेच ओआरएस व झिंकचे महत्व, स्तनपान चालू ठेवणे बाबत, स्वच्छतेविषयी माहिती, शौचालयांचा वापर इत्यादिबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक देखील दाखवले जाणार आहे.

चौकट

जिल्हयात एकूण ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, २ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र तर १९० उपकेंद्रांमध्ये ० ते ५ वयोगटातील लोकसंख्या सुमारे ५२ हजार १७३ असून एकूण १ हजार ३०५ आशा स्वयंसेविकेंच्या माध्यमातून घरोघरी जावून सर्वेक्षण करून सेवा दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *