फडणवीस पुन्हा इन अॅक्शन
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला लाजीरवाण्या अपयशास सामोर जावे लागले. २०१९ साली २३ जागा जिंकणार्या भाजपाची अवघ्या ९ जागांवर पडझड झाली. या नामुष्कीजनक पराभवाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:हून उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत पुर्णवेळ पक्षासाठी काम करायची इच्छा व्यक्त केली होती. आज दिल्लीत अमित शहा यांच्या बैठकीत फडणवीसांचा राजीनामा अमान्य करीत त्यांना नव्या जोमाने कामास लागण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार केला की भाजपाच्या महाराष्ट्रातील कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. तोपण तोवर न थांबता कामाला लागा अशा सुचना अमित शहा यांनी फडणवीसांना दिल्या आहेत.
महायुतीचे सर्वच नेते निराश झाले असून पुढील विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखण्यासंदर्भात सारेच जण आग्रही आहेत. पण फडणवीसांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर राज्यात एकच गोंधळ उडाला. भाजपच्या नेत्यांनीही फडणवीसांच्या या निर्णयाला विरोध केला होता. आता, दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी याबाबत थेट आदेशच दिला आहे.
तुमचे काम सुरु ठेवा, शपथविधीनंतर सविस्तर बैठक होईस, असे अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री आणि आज दुपारी अशा दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे, कालची अपूर्ण चर्चा आजच्या दुसर्या भेटीत पूर्ण झाल्याचे समजते.
दरम्यान, राजधानी दिल्लीत आज भाजपप्रणित एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वच घटकपक्षांनी मोदींच्या नेतेपदाला पाठिंबा दिला. त्यामुळे, नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचं निश्चित झालं आहे. येथील बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या बंगल्यावर महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील पराभवाच्या अनुषंगाने व पुढील मंत्रीमंडळ विस्ताराच्या विषयावर चर्चा झाल्याचे समजते.
