९ जूनचा मुहुर्त ठरला !
नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा मुहुर्त अखेर ठरला. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना येत्या रविवारी ९ जून रोजी शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी औपचारिक आमंत्रण दिलं.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. इंडिया आघाडीही थोड्याफार फरकाने मागे होती. त्यामुळे इंडिया आघाडीकडूनही सत्ता स्थापनेचा दावा केला जात होता. तत्पूर्वी एनडीए नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना आमंत्रण देऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची नियुक्ती केली असून ९ जून रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांना निमंत्रण दिलं.
आज सकाळी एनडीएच्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. एनडीएच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि नरेंद्र मोदी यांची भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्याचे पत्र राष्ट्रपतींना सुपूर्द करण्यात आले. एनडीएच्या घटक पक्षांची पाठिंब्याची पत्रेही राष्ट्रपतींना देण्यात आली.
एनडीएचे पत्र मिळाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना बोलावून त्यांना पंतप्रधान पदी नियुक्ती केल्याचे पत्र दिले. तसंच, केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले असून शपथविधी सोहळ्याबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
४८ मिनिटांच्या भाषणात मोदींकडून ३९ वेळा ‘एनडीए-गठबंधन’ उल्लेख!
मोदींच्या एनडीएच्या प्रमुखपदी निवड करण्याकरीता दिल्लीत एनडीएच्या घटक पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री एकनाथ यांच्यासह इतर अनेक पक्षाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा संसदीय पक्षाचे नेते म्हणून घोषित करण्यात आलं. यावेळी संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारने गेल्या १० वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचला, तसेच काँग्रेस पक्षावर जोरदार टीकाही केली. महत्त्वाचे म्हणजे नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ४८ मिनिटांच्या भाषणात जवळपास ३९ वेळा एनडीए/ गठबंधन/ युती या शब्दांचा प्रयोग केला. खरं तर २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. त्यासाठी त्यांना एनडीएतील घटक पक्षांची गरज भासली नव्हती. यंदाची निवडणूकही ‘मोदी की गॅरंटी’ आणि ‘मोदी सरकार’ या घोषणांवर चालवली होती.
दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. यंदा भाजपाला स्वबळावर पूर्ण बहुमत न मिळाल्याने एनडीएतील घटकपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे मोदींनी एनडीए शब्दावर भर दिल्याचं बोललं जात आहे.
