नवी मुंबई : महानगरपालिकेमार्फ दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत १५ मार्च, २०२४ पासून प्लॉट क्रमांक २४०, सेक्टर ४, घणसोली येथे बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आलेले आहे.
या बेघर निवारा केंद्राची क्षमता १०३ लाभार्थी इतकी असून याठिकाणी बेघर व्यक्तींसाठी चहा, नाष्टा, दोन वेळचे जेवण, ॲक्वागार्ड मशीनचे पिण्याकरिता पाणी, गादी, उशी, चादर, सामान ठेवण्यासाठी लॉकर तसेच मनोरंजनाकरिता टि.व्ही. संच इत्यादी साहित्य विनामूल्य उपलब्ध् करुन देण्यात आले आहे. या केंद्रामध्ये पुरूष, महिला, दिव्यांग व्यक्ती व वृद्ध यांच्याकरिता राहण्याची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध आहे.
या बेघर निवारा केंद्राची संपूर्ण माहिती पोलीस आयुक्त, नवी मुंबई आणि महानगरपालिकेच्या आठही विभागांचे विभाग अधिकारी यांना देण्यात आलेली आहे.
तरी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोणीही बेघर रस्त्यावर राहू नये यादृष्टीने रस्त्यावर बेघर व्यक्ती, (वृद्ध, महिला, मुले व दिव्यांग व्यक्ती) आढळून आल्यास त्याची माहिती नमुंमपा समाज विकास विभागातील राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाचे व्यवस्थापक श्री. तुषार पवार यांस 9881636168 अथवा आस्था सामाजिक विकास सेवा संस्थेचे व्यवस्थापक श्री. राहुल वाढे यांस 8669393309 या क्रमांकावर संपर्क साधून दयावी असे जाहिर आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
