दृष्टीदान दिन
उर्मिला राजोपाध्ये
हे जग सुंदर आहे. मात्र ते दाखवणारे डोळेच अधू असतील, क्षतीग्रस्त असतील तर बाहेर लख्ख उजेड असूनही व्यक्तीच्या आयुष्यात अंधाराची पोकळीच भरुन उरते. अनेकांच्या आयुष्याला वेढून उरलेला हा अंधार दूर करण्यासाठी दर वर्षी साजऱ्या होणाऱ्या जागतिक दृष्टिदान दिनाकडे सजगतेने आणि संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. आजच्या संगणकमहात्म्याच्या काळात डोळ्यांचे स्वास्थ्य जपण्याची गरजही लक्षात घ्यायला हवी.
प्रत्येक संस्कृतीमध्ये दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. दर दिवशी काही ना काही आणि यथाशक्ती तसेच सत्पात्री दान करण्याची योजना जगातील प्रत्येक धर्मामध्ये सांगितली आहे. पूर्वी कर्मकांडाद्वारे तिचे पालन व्हायचे. हा महत्त्वपूर्ण विचार आधीच्या जीवनसरणीचा एक भाग होता. त्यामुळे गरजूंपर्यंत अनायसे मदत पोहोचायची. मात्र काळ बदलला तशी लोकांची मानसिकता आणि मानवी गरजांमध्येही फरक पडला. अर्थात आजही दानाचे महत्त्व कमी झालेले नाही. पूर्वी चावली-पावलीचे, गुंजभर सोन्याचे दानही महत्त्वाचे मानले जायचे. पण आजच्या दानाची व्याप्ती प्रचंड वाढली आहे. सध्याच्या बदलत्या काळात अवयवदान, रक्तदान अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. अगदी लाखो रुपयांचे धनी असणारेही एखाद्या भणंगाकडून होणाऱ्या या दानाच्या प्रतीक्षेत असल्याचे बघायला मिळते, तेव्हाच खरे तर ही बदलती परिस्थिती अधोरेखित होते. असे असताना दर वर्षी 10 जून रोजी साजरा होणारा जागतिक दृष्टिदान दिवस विशेष महत्त्वपूर्ण ठरतो.
अंधत्व ही फार मोठी समस्या असून जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार बुबुळामुळे येणारे अंधत्व हे अंधत्वाचे चौथे सर्वात मोठे कारण आहे. मोतीबदू, काचबदू आणि वयोमानानुसार होणाऱ्या मॅक्युलाच्या (नेत्रपटलाच्या मध्यभागी असलेला लहानसा भाग) ऱ्हासामुळे येणाऱ्या अंधत्वानंतर सर्वात मोठी संख्या बुबुळातील दोषांमुळे येणाऱ्या अंधत्वाची आहे. विशेष म्हणजे नेत्ररोपण (बुबुळाचे रोपण) करून या अंधत्वावर मात करता येते. बुबूळ हा डोळ्याचा अतिशय संवेदनशील आणि नाजूक भाग आहे. प्रकाशाचे योग्य परावर्तन होऊन समोरचे दृश्य नेत्रपटलावर योग्य रितीने पडण्यासाठी बुबूळ पूर्णपणे पारदर्शक असणे आवश्यक असते. परंतु काही प्रकारच्या संसर्गामुळे कवा अपघातामुळे बुबूळ धूसर कवा अपारदर्शक होऊन व्यक्तीला अंधत्व येऊ शकते. अशा प्रकारच्या अंधत्वावर बुबुळाचे रोपण हा योग्य पर्याय असतो. अंध व्यक्तीचे बुबूळ काढून त्या जागी मृत व्यक्तीने दान केलेल्या बुबुळाचे रोपण केल्यास त्या अंध व्यक्तीला दृष्टी प्राप्त होते.
एका सर्वेक्षणानुसार देशात सुमारे 15 दशलक्ष व्यक्ती अंध असून त्यापैकी 6.8 दशलक्ष व्यक्तीना बुबूळ अपारदर्शक झाल्याने अंधत्व आले आहे. या व्यक्तीचे अंधत्व घालवणे शक्य आहे. पण त्यासाठी नेत्रदानाचे प्रमाण वाढायला हवे. एखादी व्यक्ती स्वत:च्या हयातीतच नेत्रदानाचा संकल्प करू शकते कवा त्या व्यक्तीच्या निधनानंतर जवळचे नातेवाईक नेत्रदानाचा निर्णय घेऊ शकतात. नेत्रदानाचा निर्णय झाल्यानंतर नेत्रपेढीला त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ठरावीक वेळेत कळवणे आवश्यक असते, कारण मृत्यूनंतर सहा तासांच्या आत डोळे काढावे लागतात. नेत्रपेढीला कळवल्यानंतर प्रशिक्षित कर्मचारी येऊन मृत व्यक्तीचे डोळे काढून घेतात. ते योग्य प्रकारे जतन करून ठेवले जातात. प्रत्येक नेत्रपेढीकडे बुबूळ रोपणाची गरज असणाऱ्यांची यादी तयार असते. यादीतील क्रमांकानुसार त्या व्यक्तीच्या डोळ्यांवर बुबूळ रोपण केले जाते. मृत व्यक्तीचा काढलेला डोळा चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात वापरला जायला हवा, परंतु आता काही कल्चर मिडिया, लिक्विड नायट्रोजन कवा अन्य रासायनिक प्रक्रियांमुळे दोन महिन्यांपर्यंत जतन करून ठेवता येतो. एका व्यक्तीने दान केलेल्या डोळ्यांमुळे दोन अंध व्यक्तीना दृष्टी प्राप्त होते. पण, अंध व्यक्तीच्या संख्येच्या मानाने नेत्रदान करणाऱ्यांची संख्या फारच कमी असल्याने बुबूळरोपणाची प्रतीक्षा यादी वाढत आहे.
नेत्रदान करण्यासाठी लोकांनी पुढे न येण्याची काही कारणे आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे डोळे काढून घेतल्यावर मृत व्यक्तीचा चेहरा विदृप होतो असे अनेकांना वाटते. पण ही भीती निराधार आहे. आता संपूर्ण डोळा न काढता केवळ बुबूळं काढून घेतली जातात. त्यामुळे मृत व्यक्तीच्या चेहऱ्यात कोणताही बदल झालेला दिसत नाही. दुसरे म्हणजे मृत्यूपूर्वी एखाद्याने नेत्रदानाचा संकल्प केला नसल्यास आपण त्या व्यक्तीचे डोळे कसे दान करावेत, असा पश्न नातेवाईकांना पडतो. पण मृत्यू झालेल्या व्यक्तीचे जवळचे नातेवाईक नेत्रदानाचा निर्णय घेऊ शकतात. काहींच्या मते मृत व्यक्तीचे अवयव दान केल्यानंतर त्या व्यक्तीला मुक्ती मिळत नाही. पण या अवयवांनी एकाहून अधिक व्यक्तीचे जीवन सुंदर होणार असेल तर ते देवाला आवडणारच, हा विचार लक्षात घ्यायला हवा. त्यामुळे जागतिक दृष्टिदान दिवसाच्या निमित्ताने तरी अधिकाधिक व्यक्तीनी नेत्रदानाचा संकल्प करायला हवा. एक ते दोन वर्षांच्या मुलांपासून अगदी ऐंशी वर्षांच्या वृद्धांपर्यंत कोणालाही नेत्रदान करता येते. मात्र कावीळ, व्हायरल मॅनेंजायटिस, कर्करोग, एड्स असे विकार असल्यास नेत्रदान करता येत नाही तसेच बुडून मृत्यू येणे, फाशी घेणे, डोळ्यांवर मृत्युपूर्वी काही शस्त्रक्रिया झालेली असणे अशा कारणांमुळेही नेत्रदान करता येत नाही.
संपूर्ण अंधत्व अथवा दृष्टी अंधूक असणे, दृष्टिदोष असणे, डोळ्यासंबंधीच्या गंभीर तक्रारी या बाबी जीवनानंदावर विरजण घालणाऱ्या आहेत. नितांतसुंदर सृष्टी पाहण्यासाठी देवाने दिलेल्या या देणगीला पारखं होण्यासारखे दुसरे दु:ख नाही. मात्र हे माहीत असून सध्याची जीवनशैली डोळ्यांच्या आरोग्यरक्षणाला पूरक अथवा सहाय्यक नाही. डोळ्यांच्या आरोग्याचे जतन आणि संवर्धनासाठी आहारापासून व्यायामापर्यंत विविध प्रकारे काळजी घ्यावी लागते, हा विचार जनमानसात खोलवर रुजलेला नाही. म्हणूनच या अवयवयंत्रणेला गृहीत धरण्याची चूक होते आणि इथेच खरा घात होतो. अगदी लहान वयापासून नजरेसमोर येणारी विविध गॅझेट्स आणि उपकरणांचे प्रकाशमान पडदे, संगणकाधिष्ठित कार्यशैलीत दिवसभर समोर संगणक असल्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण, सर्व प्रकारच्या प्रदूषणाचा डोळ्यांवर होणारा दुष्परिणाम, आहारातून पर्याप्त जीवनसत्त्वांचा पुरवठा न झाल्यामुळे उद्भवणारे दृष्टिदोष या सर्वांप्रती सजग होण्याची आवश्यकता आहे; मात्र ती दिसत नाही. म्हणूनच लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तीना दृष्टिदोषाची समस्या भेडसावताना दिसते. या समस्यांचे वेळीच निराकरण न केल्यास प्रसंगी अंधत्वही येवू शकते. मात्र नेत्रोपचाराच्या क्षेत्रात झपाट्याने होत असणाऱ्या प्रगतीमुळे यातील बऱ्याचशा व्याधींवर नियंत्रण ठेवणे आता शक्य झाले आहे.
डोळ्यांचा वाढता नंबर ही अशीच एक समस्या. यामुळे अगदी अंधत्व येणार नसले तरी रोजच्या सामाजिक आणि व्यावसायीक जीवनात बऱ्याच समस्या येऊ शकतात. चष्मा कवा काँटॅक्ट लेन्स न लावता आपल्या डोळ्यांनी जग स्वच्छ दिसावे, या तीव्र इच्छेतून नंबर कमी करणाऱ्या शस्त्रक्रियांवर अव्याहत संशोधन सुरू आहे. या शस्त्रक्रिया अधिकाधिक अचूक आणि वेदनारहित व्हाव्यात, यासाठी जगभरातील नेत्रतज्ज्ञ अथक प्रयत्न करत आहेत. याच समस्येवर उपाय म्हणून जर्मनीच्या ‘कार्ल झाइस’ या नामांकित आणि अनुभवी कंपनीने ‘रिलेक्स स्माईल’ हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. हे तंत्रज्ञान इतर तंत्रज्ञानांच्या तुलनेत अधिक अचूक, सुरक्षित आणि रुग्णाच्या दृष्टीने आरामदायी आहे. यापूर्वीचे तंत्रज्ञान वापरून केलेल्या शस्त्रक्रियांपेक्षा स्माईल तंत्रज्ञान वापरून केलेली शस्त्रक्रिया अधिक अचूक तर ठरतेच परंतु यात रुग्णाच्या बुबुळाचा फ्लॅप काढावा लागत नाही. त्यामुळे ही जगातील पहिली ‘ब्लेडलेस’ आणि ‘फ्लॅपलेस’ शस्त्रक्रिया ठरते. फ्लॅप काढावा न लागल्यामुळे तो शस्त्रक्रियेदरम्यान, नंतर कवा काही वर्षांनी सरकण्याची शक्यताच उरत नाही. त्यामुळे भविष्यात काही गुंतागुंत होत नाही. पूर्वीच्या शस्त्रक्रियांमध्ये किमान 20 मिलिमीटरचा काप घेऊन फ्लॅप काढावा लागे. मात्र रिलेक्स स्माईल शस्त्रक्रियेत केवळ दोन ते तीन मिलिमीटरचा छेद घ्यावा लागतो. त्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेदरम्यान कवा नंतरही त्रास होत नाही.
पूर्वीच्या तंत्रज्ञानात फ्लॅप काढून मागे दुमडून ठेवावा लागत असल्याने बुबुळाच्या काही पेशींची हानी होत असे. ‘रिलेक्स स्माईल’मध्ये मात्र हे टाळले जाते. यात केवळ दोन ते तीन मिलिमीटरचा छेद घेऊन बुबुळामध्ये अतिशय पातळ थ्रीडी (त्रिमितीय) थर तयार केला जातो. हा थर प्रत्येक रुग्णाच्या डोळ्याच्या नंबरवर अवलंबून असतो. पूर्ण प्रक्रिया लेसर किरणांच्या साह्याने पार पाडली जात असल्याने या क्रियेवर पूर्ण नियंत्रण राखणे शक्य होते. दृष्टिदोष कमी करणारे असे अनेक मार्ग आज उपलब्ध आहेत. तरी जागतिक दृष्टिदान दिनाच्या निमित्ताने आपण याचीही माहिती घ्यायला हवी.
(अद्वैत फीचर्स)