बेदम मारहाणीचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाडांकडून पोस्ट

मुंबई : दोन दिवसांपूर्वी पवईयेथील जय भीमनगरमधील झोपडपट्टी मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आली होती. त्यानंतर केवळ बिल्डरांच्या फायद्यासाठी ही झोपडपट्टी पाडण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. दरम्यान, आता या भागातील बेघर रहिवाशांना अमानुषपणे मारहाण होत असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. एक्स या समाज माध्यमावर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी हे आरोप केले.

जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत पोलिसांच्या वेशात नसलेली एक व्यक्ती नागरिकांना अमानुषपणे मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा अमानुष अत्याचार कुणी का सहन करावा? या व्हिडीओतील रुमाल बांधलेला माणूस कोण आहे. झोपडपट्टी खाली करण्यासाठी केवढी धडपड होते आहे, असे ते म्हणाले. तसेच या प्रकरणाची चौकशी होणार का? असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला विचारला. महत्त्वाचे म्हणजे हा व्हिडीओ पवई भीमनगरमधील असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र, अद्याप याची पुष्टी होऊ शकलेली नाही.

तत्पूर्वी शनिवारी (८ जून ) जितेंद्र आव्हाड यांनी या भागातील बेघर रहिवाशांची भेट घेतली होती. यावेळी बोलताना एका बिल्डरच्या अथक परिश्रमामुळे महानगर पालिकेच्या काही निवडक अधिकाऱ्यांनी पोलिसांना फसवत, सगळ्यांनाच गंडवत पुढचा-मागचा विचार न करता ८०० कुटुंबांना रस्त्यावर आणले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती

याशिवाय जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही. तोपर्यंत येथे कोणतेही काम होऊ देणार नाही, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले होते. मात्र, तिथे पुन्हा काम सुरू झाले असल्याचा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. तसेच कायदा आणि सुव्यवस्था ही पोलिसांची जबाबदारी आहे. अशाप्रकारे जर पोलीस आपले काम नाकारत असतील तर गोरगरीबांनी कायदा हातात घेतला, तर कोणाला दोष देऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *