उल्हासनगर : दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर उल्हासनगर महानगरपालिकेत कामावर रुजू झालेल्या 900 पैकी 751 कर्मचाऱ्यांना आयुक्त अजीज शेख यांनी गिफ्ट दिली असून त्यांना पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर(प्राण)किटचे वितरण करण्यात आले आहे.
शासनाने कर्मचाऱ्यांसाठी अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू केली होती.शासनाच्या धर्तीवर उल्हासनगर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करुन अशा कर्मचाऱ्यांसाठी शेअर बाजाराशी संबंधित शासन मान्यताप्राप्त एनएसडीएल प्रोटीन या कंपनी सोबत करार करण्यात आला.आणि कंपनीकडून पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर(प्राण)किट प्राप्त करून घेण्यात आले.त्यासाठी आयुक्त अजीज शेख यांच्या निर्देशानुसार मुख्यलेखाअधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखा परिक्षक शरद देशमुख,लेखा अधिकारी विजय खेडकर यांनी परिश्रम घेतले.
आता या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतनातून कपात होणाऱ्या कर्मचारी अंशदान व मनपा अंशदानाच्या रक्कमा थेट शेअर बाजारामध्ये गुंतवल्या जाणार आहेत.यातून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या व्याजाचा परतावा हा भविष्य निर्वाह निधीपेक्षा जास्त असणार आहे.कर्मचाऱ्यांना याचा फायदा हा लॉंग टर्मसाठी होणार आहे.जे पैसे कपात होतात ते ऍपद्वारे कर्मचारी बघू शकणार असल्याचे आयुक्त अजिज शेख यांनी सांगितले.751 कर्मचाऱ्यांना पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर(प्राण)किटचे वितरण करण्यात आले आहे.उर्वरित 149 कर्मचाऱ्यांचे काम प्रगती पथावर असल्याची माहिती मुख्यलेखाअधिकारी किरण भिलारे यांनी दिली.
कर्मचाऱ्यांना पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर(प्राण किटचे)वितरण करतेवेळी आयुक्त अजीज शेख,सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे,उपायुक्त डॉ.सुभाष जाधव,मुख्यलेखाअधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखा परिक्षक शरद देशमुख,जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे उपस्थित होते.