अखेर नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे. हा मान यापूर्वी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि तिसऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मिळाला होता. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे मोदी हे तिसरे पंतप्रधान आहेत. एकूणच मोदींच्या तिसऱ्या इनिंगची सुरुवात झाली आहे.ही सुरुवात अगदी धुमधडाक्यात झाली आहे. काल संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात जवळजवळ ८००० मान्यवरांच्या उपस्थितीत हा शपथविधी संपन्न झाला आहे.
मोदींसोबत त्यांचे ७१ सदस्यीय मंत्रिमंडळही शपथ घेते झाले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट मंत्री, ५ स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे राज्यमंत्री, आणि ३६ राज्यमंत्री असा एकूण लवाजमा आहे. आता हे मंत्रिमंडळ पुढील पाच वर्ष देशाचा कार्यभार सांभाळणार आहे.
या मंत्रिमंडळात मोदींनी नवे आणि जुने असा सुरेख संगम साधण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला दिसतो आहे. त्यांचे जुने सहकारी राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा अशा गत दोन मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या जवळ जवळ ३५ जुन्या सहकाऱ्यांना त्यांनी स्थान दिले आहे. त्याचवेळी पहिल्यांदाच निवडून आलेल्या ३३ नव्या चेहऱ्यांना देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले आहे एकूणच सर्वांना समान न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
यावेळी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात प्रथमच भारतीय जनता पक्षाला लोकसभेत पूर्ण बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे मित्रपक्षांच्या मदतीने त्यांनी हे सरकार गठीत केले आहे. हे बघता यावेळी मित्रपक्ष मोदींवर दबाव आणणार आणि जास्तीत जास्त मंत्रिपदे आपल्या पदरात पाडून घेणार असे चित्र दिसत होते. किंबहुना मोदींचे विरोधक तसेच चित्र वारंवार निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकारात भाजपच्या मंत्र्यांच्या वाट्याला काहीही येणार नाही अशी खोचक टीका करत भाजपच्या खासदारांना मोदी हाय कमिशनर म्हणून परदेशात पाठवतील असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी हाणला होता. मात्र राऊत किंवा सर्वच विरोधक म्हणत होते तशी परिस्थिती आज तरी दिसत नाही. ७२ सदस्यांच्या मंत्रिमंडळात ६१ जागा भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहेत, तर ११ जागा इतर मित्र पक्षांना देण्यात आलेल्या आहेत. त्यातही जागा वाटपात जे नेते नरेंद्र मोदींना जास्तीत जास्त अडवून धरतील असे बोलले जात होते त्या चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पार्टी आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड या पक्षांना प्रत्येकी फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. इतर सात पक्षांना प्रत्येकी एक एक जागा मिळाली आहे. हे बघता या मंडळींनी एकतर मोदींवर फारसा दबाव आणला नसावा, किंवा त्यांनी दबाव आणला असेलही तरी मोदी या दबावाला फारसे बळी पडले नसावेत, असे चित्र दिसते आहे.
या मंत्रिमंडळात महाराष्ट्रात सहा खासदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. त्यात नितीन गडकरी आणि पियूष गोयल हे मोदींचे भाजपतील जुनेच सहकारी आहेत. याशिवाय शिंदे शिवसेनेचे प्रतापराव जाधव, भाजपच्याच रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ आणि रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांचा समावेश आहे. यापैकी गडकरी, गोयल आणि रामदास आठवले हे तिघेही जुनेच खेळाडू आहेत.
शिंदे शिवसेनेने महाराष्ट्रातून सात खासदार पाठवले आहेत. तरीही त्यांना फक्त एक राज्यमंत्रीपद मिळाले म्हणून शिवसेना गोटात काहीशी नाराजी असल्याचे चित्र आज दिसते आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातही नाराजीचे वातावरण असल्याचे चित्र आहे. कारण त्यांच्या पक्षाला काल एकही जागा मिळू शकलेली नाही. या संदर्भात असे सांगण्यात आले की त्यांच्या पक्षाने फक्त एकच खासदार लोकसभेत पाठवला आहे. त्यामुळे अशा पक्षांना राज्यमंत्रीपद देण्याचे ठरले होते. तसे राज्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला ऑफरही केले गेले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेल यांचे नाव मंत्रीपदासाठी निश्चित केले होते. आणि प्रफुल्ल पटेल आधी डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री राहिलेले होते. त्यामुळे त्यांना खालचे पद मिळावे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मान्य नव्हते. आणि पटेलांव्यतिरिक्त दुसरे कोणतेही नाव देण्यास ते राजी नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही प्रतिनिधी या मंत्रिमंडळात नाही. मात्र पुढील विस्तारात त्यांना योग्य तो न्याय दिला जाईल असा खुलासा भाजपाचे राज्यातील नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर आम्ही विस्तारापर्यंत वाट बघण्यास तयार आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.
तरीही राज्यातील विरोधकांना ही टीका करण्यासाठी आयती संधी मिळाली आहे. भारतीय जनता पक्ष मित्रपक्षांना वापरून घेतो आणि गरज संपल्यावर दूर करतो असा आरोप काँग्रेसने केला आहे, तर शिंदेंचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष हे दिल्लीत भाजपाचे आश्रित असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे संजय राऊत यांनी केले आहे. आता यावरून वातावरण तापणार का हे बघायचे आहे.
आधीच्या अग्रलेखांमध्ये आम्ही नमूद केल्याप्रमाणे असे अल्पमतातले सरकार चालवणे हे नरेंद्र मोदींसमोर एक आव्हान आहे. मात्र इथे पहिल्या फेरीत तरी नरेंद्र मोदी हे हिमतीने आणि विश्वासाने पुढे सरकताना दिसत आहेत. त्यांनी मित्रपक्षांना सोबत जरूर घेतले आहे. मात्र कोणाला किती झुकते माप द्यायचे याचा निर्णय तेच करणार असे चित्र यावेळी तरी स्पष्ट दिसते आहे.
आपल्या या आधीच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत नरेंद्र मोदींनी बरेच धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. यावेळी देखील ते तसेच निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. शपथविधीपूर्वी त्यांनी सर्व संभाव्य मंत्र्यांना बोलावून याबाबत माहिती दिली असल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. सत्तेत आल्यावर पुढल्या शंभर दिवसाचा ॲक्शन प्लॅनही त्यांनी तयार केला आहे. तो आता कसा राबवला जाणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आघाडीचे सरकार म्हटले की सरकार मधली मलईदार खाती प्रत्येक पक्षाला हवी असतात. इथे मोदींनी हा लेख लिहेपर्यंत तरी आपल्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केलेले नाही. खातेवाटप जाहीर झाल्यावर कोणाकडे कोणते खाते गेले हे कळेलच. सध्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व प्रमुख खाती भाजप आपल्याच कडे ठेवणार असल्याचे सांगितले जाते आहे. तसे झाले तर नरेंद्र मोदींना त्यांच्या मताप्रमाणे कारभार चालवणे सोयीचे होणार आहे.
लोकसभा निवडणुकांपाठोपाठ काही राज्यांमध्ये विधानसभेच्याही निवडणूका आहेत. त्यामुळे अशा राज्यांना झुकते माप देण्याचा प्रयत्न मोदींनी केला आहे. त्यामुळेच बहुदा महाराष्ट्रात जरी महायुतीच्या जागा कमी झाल्या असल्या तरी सहा जागा देऊन मोदींनी भरपाई केली आहे. महाराष्ट्रात अवघ्या चार महिन्यात असलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता हे झुकते माप आहे हे स्पष्ट दिसते आहे. मात्र या मंत्र्यांनी विधानसभेत देखील चांगले यश मिळवून द्यावे ही मोदींची अपेक्षा राहणार यात वावगे काहीही नाही.
एकूणच सर्वसमावेशक असे हे मंत्रिमंडळ आहे. यात जास्तीत जास्त राज्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न झालेला आहे. सर्व मित्र पक्षांनाही सहभागी करून घेण्याचा मोदींचा मनोदय स्पष्ट दिसतो आहे. अजूनही विस्ताराला वाव आहे. नजीकच्या भविष्यात अजून काही नवीन मंत्री घेतले जाऊ शकतात. तोपर्यंत तरी या मंत्रिमंडळाला आपण शुभेच्छा देऊया…