नवी मुंबई : सानपाडा येथील मिलेनियम टॉवरमध्ये राहणाऱ्या व महिला मंडळ बाल विकास केंद्र प्राथमिक शाळा, कुर्ला ( प.) येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व कवयित्री सौ. अनिता मेस्त्री यांच्या ‘आनंदयात्री मी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मॉरिशस येथे नुकतेच पार पडले.
महात्मा गांधी इन्स्टिट्यूट स्कूल ऑफ इंडियन स्टडीज, डिपार्टमेंट ऑफ मराठी स्टडीजच्या सहकार्याने स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्र, अक्षर विश्व मराठी साहित्य संमेलन ३१ मे २०२४ रोजी सब्रमणिय भारती लेक्चर थिएटर, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मोका, मॉरिशस येथे पार पडले. या संमेलनात मराठी गझल कार्यक्रम, काव्यगायन सादरीकरण झाले. संमेलनात प्रमुख मान्यवर डॉ.श्रीम.मधुमती कुंजुल (मराठी अभ्यास विभाग प्रमुख, मॉरिशस), श्री. रामपरताब (सी.एस.के. महासंचालक, एम्.जी. आय. अँड आर.टी.आय. मॉरिशस ) श्री.नितीन बापू (राजकीय नेते मॉरिशस), श्री.एम. के. गोंधळी (माजी शिक्षण सहसंचालक,कोल्हापूर ) डॉ. दिलीप पांढरपट्टे व श्रीम.कल्पना गवरे (अध्यक्ष, स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी ) तसेच अजमेर लेखिका मंच अवाम सामाजिक सेवा संस्था या सर्वांच्या उपस्थितीत भारताच्या मुंबईतील कवयित्री सौ.अनिता मेस्त्री यांच्या ‘आनंदयात्री ’मी या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पार पडले. याच काव्यसंग्रहातील हेचि दान या कवितेचे सादरीकरणही त्यांनी केले. श्री.रामचंद्र मेस्त्री व सौ. अनिता मेस्त्री यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आपला पहिला काव्यसंग्रह ‘आनंदयात्री मी’ मॉरिशस येथे प्रकाशित झाला याचा आनंद निश्चितच अवर्णनीय आहे; असे मनोगत उभयतांनी व्यक्त केले.
