मुंबई, ता. ११: गर्भधारणेनंतर क्षयरोगाची लागण झालेल्या २५ वर्षीय महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. झायनोव्हा शाल्बी रुग्णालयात या महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली. बाळाचे वजन २.२ किलो इतके असून प्रसूतीनंतर आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे.

सलोनी मुरूडकर असे या महिलेचे नाव असून गर्भधारणेच्या ३४ आठवड्यांनंतर त्यांना श्वास लागणे, तीव्र खोकला आणि थकवा जाणवू लागला होता. वैद्यकीय चाचणीदरम्यान महिलेला क्षयरोगाची लागण झाल्याचे निदान झाले. अशा स्थितीत प्रसूती करणे खूप अवघड असते. क्षयरोग हा पसरणारा आजार असल्याने आईच्या गर्भातील बाळालाही क्षयाची लागण होऊ शकते, मात्र डॉक्टरांच्या यशानंतर बाळाची प्रकृती उत्तम असून त्याला क्षयरोगाचा संसर्ग झालेला नाही.

प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्वेता लालगुडी म्हणाल्या की, गर्भधारणेच्या आठव्या महिन्यात या महिलेला श्वास घेताना त्रास जाणवू लागला होता. छातीचा एक्सरे केल्यानंतर महिलेला क्षयरोग असल्याचे निदान झाले. गरोदर महिलांना क्षयरोग होण्याचे प्रमाण भारतात २१ टक्‍के आहे. क्षयरोगाचे अंदाजे प्रमाण १००० गर्भवती महिलांमध्ये २.३ आहे. गर्भधारणेदरम्यान क्षयरोगामुळे महिलेला अशक्तपणा, वेळेआधीच प्रसूती, प्रसूतीपूर्व रक्तस्राव, प्रसूतीपूर्व मृत्यू होण्याचा धोका असतो. छातीचा एक्स-रे अहवाल आल्यानंतर लगेचच क्षयरोगविरोधी औषधोपचार सुरू करण्यात आले. या महिलेची मुदतपूर्व प्रसूती झाली, असे त्‍यांनी सांगितले.

सिझेरियन पद्धतीने या महिलेची प्रसूती करण्यात आली. शस्त्रक्रिया साधारणतः १८ तास चालली. रुग्णाने २.२ किलो वजनाच्या एका निरोगी बाळाला जन्म दिला. जन्मानंतर बाळाला अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर उच्च-रिझोल्यूशन कंप्युटेड टोमोग्राफी चाचणी केली गेली. या चाचणीत आईमधील क्षयरोगाची लक्षणे नियंत्रणात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *