राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी काल नागपुरात कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाच्या समारोप समारोहात जे काही विचार व्यक्त केले ते या देशातील सर्वच सुजाण नागरिकांना विचार करायला लावणारे आहेत. देशात सर्वप्रथम सहमतीचे राजकारण व्हायला हवे आणि त्यासाठी सर्वच संबंधित घटकांनी अहंकार सोडायला हवा असा महत्वपूर्ण विचार त्यांनी यावेळी मांडलेला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची पातळी सोडली होती, आणि एकमेकांवर पातळी सोडून टीका केली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. या सर्व प्रकारात गरज नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही ओढले याबाबतही त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
निवडणुकीच्या प्रचारात जो अतिरेक झाला तो आता बाजूला ठेवत भविष्यात या देशासमोर आणि आपल्या समाजासमोर जी आव्हाने आहेत त्यावर चर्चा व्हायला हवी असेही त्यांनी यावेळी सुचवले आहे. प्रत्येक नात्याला दोन बाजू असतात तशाच प्रत्येक मुद्द्यांची दुसरी बाजू असते, ती समजून घ्या असे त्यांनी सांगितले आहे.यावेळी राजकीय नेत्यांनी परस्परांविरुद्ध पातळी सोडून वक्तव्य केली, ती करत असताना आपल्या या वक्तव्यांनी समाजात दुही निर्माण होऊ शकते याचेही भान कोणत्याही नेत्याने ठेवले नाही याबाबत डॉ. भागवत यांनी खंत व्यक्त केली आहे. एकूणच कालच्या आपल्या समारोपीय उद्बोधनात डॉ. भागवत यांनी भारतीय जनता पक्षासहित सर्वच राजकीय पक्षांना चांगल्याच कानपिचक्या दिलेल्या दिसून आल्या आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सुरुवातीपासूनच पूर्णतः गैरराजकीय संघटना म्हणूनच कार्यरत राहिलेली आहे. देशातील हिंदूंचे संघटन व्हावे आणि हिंदू बलशाली व्हावा या संकल्पनेतून या संघटनेची १९२५ साली स्थापना झाली. या देशात हिंदू म्हणजे जो भारतभूमीवर राहतो आणि इथल्या जीवनशैलीनुसार वागतो तो हिंदू ,अशी सरळ सोपी व्याख्या करून संघ परिवार काम करतो आहे. संघाला हा देश बलशाली करायचा आहे आणि जागतिक महासत्ता म्हणून उभा करायचा आहे. या संकल्पनेतूनच संघ परिवार वाटचाल करीत आहे.
त्यामुळेच डॉ. भागवतांच्या या विवेचनाला विशेष महत्त्व प्राप्त होते आहे. आपल्या या देशात संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवर आधारित कामकाज चालते. मात्र आज आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाली तरी या देशातील नागरिक या लोकशाहीला स्वीकारण्याइतपत प्रगल्भ झालेला आहे का याबाबत अनेकदा मनात शंका निर्माण होते. विशेषतः देशाची देशात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कितीही मतभेद असले तरी जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा सांभाळतांना आम्ही एक व्हायला हवे ही संकल्पना आज तरी विरोधक विसरलेले दिसतात.
इथे एक प्रसंग वाचकांना सांगावासा वाटतो. १९७१ साली पाकिस्तान मध्ये गृहयुद्ध सुरू झाले. पूर्व पाकिस्तान म्हणजेच आजचा बांगलादेश हा स्वतंत्र व्हावा म्हणून बांगलादेशींनी संघर्ष सुरू केला. जवळजवळ सात-आठ महिने हा संघर्ष सुरू होता. सुरुवातीला भारताने तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र डिसेंबर १९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानशी युद्ध पुकारण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान आणि आजच्या बांगलादेशवर त्यांनी हल्लाबोल केला आणि युद्ध सुरू केले. सर्वप्रथम त्यांनी बांगलादेशला भारत सरकारकडून स्वतंत्र देश म्हणून मान्यता जाहीर केली. त्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू होते. या अधिवेशनात बांगलादेशला मान्यता देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केल्यावर त्यांचे अभिनंदन करताना तत्कालीन जनसंघाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी एक मुद्दा मांडला होता. वाजपेयी त्यावेळी बोलताना म्हणाले होते की, आता आम्ही पक्षीय मतभेद विसरलो आहोत. आता संपूर्ण देश हा एक पक्ष आहे आणि आमच्या पक्षनेत्या इंदिरा गांधी याच आहेत. आम्ही एकदिलाने तुमच्या पाठीशी उभे आहोत आणि तुमच्या प्रत्येक कृतीला आमचा पूर्ण पाठिंबा राहील. अटलजींच्या या भाषणाला सभागृहातील सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला होता.
हीच भावना आजही सरसंघचालकांना देशात हवी आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्या काही पद्धतीने प्रचार झाला तो चिंताजनकच होता असे म्हणावे लागेल. सत्तेसाठी सर्वकाही असे म्हणत सर्वच पक्षांनी पातळी सोडली होती. त्यात एकाला झाकावे आणि दुसऱ्याला उघडावे असे काहीही नव्हते. “हमाममे सब नंगे होते है” या म्हणीचा खराखुरा प्रत्यय यावेळी या देशातील जनसामान्यांना येत होता.
त्यामुळेच देशात भविष्यात अशांतता तर निर्माण होणार नाही ना अशी भीती सरसंघचालकांना भेडसावत असावी म्हणूनच त्यांनी हा विचार व्यक्त केला असावा. आज देशासमोर अनेक समस्या आहेत या समस्यांना तोंड द्यायचे असेल तर भागवत म्हणतात त्याप्रमाणे सर्वांनीच एकत्र यायला हवे ही आजची गरज आहे. तिथे आमचेच बरोबर ही भावना चालणार नाही, असे डॉ. भागवतांनी काल बोलताना सुचवले आहे. हा आजच्या भाजपासह सर्व हेकेखोर राजकारण्यांना त्यांनी टोला हाणला आहे.समोरच्या व्यक्तीचेही काही मुद्दे असू शकतात. ते ऐकून घेत सहमतीने राजकारण करायला हवे असे त्यांचे प्रतिपादन आहे.
त्यासाठी संघ स्वयंसेवकांनी कटिबद्ध व्हावे असे डॉ. भागवतांनी यावेळी सुचवले आहे. हे सांगताना त्यांनी व्यक्तिगत चारित्र्यावरही भर दिला आहे. भरदिवसा सुसंस्कृत कुटुंबातील महिला मद्यपान करून वाहन चालवतात आणि त्यांच्या वाहनात वाहनाखाली निरपराध व्यक्तींचा जीव जातो याबद्दलही खंत व्यक्त करताना रस्त्याने वाहन चालवताना सिग्नलवर का थांबू नये असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सर्वांनी नियम पाळून वागावे हे सुचवताना देश चालवण्यासाठी कर भरावाच लागतो, तो भरणेही गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
एकूणच डॉ. भागवतांनी देशातील सध्याची परिस्थिती बघून सर्वच घटकांना कानपिचक्या देण्याचा प्रयत्न काल केला आहे. देशातील सामान्य जनतेपासून तर वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनीच याचा विचार करावा आणि देशाला संघाच्या संकल्पनेतील परम वैभवाकडे नेण्याचा यशस्वी प्रयत्न करावा इतकीच त्यांची अपेक्षा आहे. ही अपेक्षा या देशातील जनसामान्य पूर्ण करतील?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *