मुंबई : मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. धरणांमध्ये मंगळवारी ५.६४ टक्के पाणीसाठा होता. मुंबईत गेले दोन – तीन दिवस संध्याकाळी पाऊस पडत असला तरी धरणक्षेत्रात मात्र अद्याप पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपूनच वापरावे लागणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असून धरणांमध्ये मंगळवारी ५.६४ टक्के पाणीसाठा होता. राज्य सरकारने भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास परवानगी दिली आहे. या दोन धरणांतील राखीव साठा वापरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी राखीव साठ्यावरच भिस्त आहे.
मुंबईत रविवारी पावसाने हजेरी लावली. गेले दोन – तीन दिवस मुंबईत रात्री चांगलाच पाऊस पडला. त्यामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणीही साचले. मुंबईत पावसाचे आगमन झाल्यानंतर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली का याबाबत मुंबईकरांमध्ये उत्सुकता होती. मात्र धरणक्षेत्रात अगदीच तुरळक पाऊस पडल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. तर पाणीसाठा खालावतच आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणांतील पाणीसाठा सध्या केवळ ५.६४ टक्के आहे. हा पाणीसाठा गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत एकूण ८१ हजार ६२३ दशलक्ष लिटर म्हणजेच ५.६४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी २०२३ मध्ये ११ जून रोजी १०.०२ टक्के पाणीसाठा होता, तर त्याआधीच्यावर्षी पाणीसाठा १३.७२ टक्के होता.
मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेला राखीव साठा वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार भातसा धरणातून एक लाख ३७ हजार दशलक्ष लिटर, तर उर्ध्व वैतरणा धरणातून ९१ हजार १३० दशलक्ष लिटर राखीव साठ्यातील पाणी उपलब्ध झाले आहे. हे पाणी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पुरवावे लागणार आहे.
तोपर्यंत पाणीकपात सुरूच
धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने राखीव साठ्यातील उपलब्ध पाणी अधिकाधिक काळ वापरता यावे यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.