डहाणू, : तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील गावात सोमवारी (ता. १०) मध्यरात्रीच्या वेळी विजांच्या कडकडाटात मॉन्सूनच्या पहिल्या पावसाचे आगमन झाले. त्यानंतर मंगळवार (ता. ११)पर्यंत पावसाने विश्रांती घेतली, मात्र शेतकऱ्यांनी पावसाच्या पहिल्या दिवसापासून भातबियाणे पेरणीला सुरुवात केली आहे.
डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील चिंचणी, वाणगाव, वरोर, वाढवण, आसनगाव, चंडीगाव, तडीयाळे, पोखरण या गावातील शेतकरी हे प्रामुख्याने खरीप हंगामात भातपिकाची लागवड करतात. गेल्या दोन-तीन वर्षांपासून संकरित भातबियाणे, खते, औषधे, पेंड यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच नांगरणीसाठी ट्रॅक्टरला दर ताशी ८०० ते ९०० रुपये मोजावे लागत आहेत, तसेच भात पुनर्लागवड (आवणी) करण्यासाठी मजुरांचा अत्यंत तुटवडा असून दिवसाला ४०० ते ५०० रुपये मोजूनही मजूर मिळत नाहीत. त्यातच भर म्हणजे औषधाच्या देखील वाढलेल्या भरमसाठ किमती, अनियमित पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे वारंवार नुकसानच होते. त्यामुळे शेतकरी वर्गाला भातशेती परवडेनाशी झाली आहे. त्याचा परिणाम म्हणजे या भागातील ७५ टक्के शेतकऱ्यांनी भातपीकच घेण्याचे सोडले आहे. त्यांची शेती ओस पडत आहे. त्यामुळे भातपिकाचे क्षेत्र हे केवळ ३० ते ४० टक्क्यांवर आले आहे.
बी-बियाणे, खते, औषधे, मजुरी, ट्रॅक्टर भाड्याच्या भरमसाट वाढलेल्या किमती, मजुरांच्या तुटवड्यामुळे भातशेती परवडेनाशी झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातशेती करण्याचे सोडून दिले आहे.
