ठाणे : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना विविध संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत असून, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघानेही आमदार डावखरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. संघाचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंह, सरचिटणीस माधव राऊळ यांनी आमदार डावखरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

कोकणातील महाविद्यालयांमधील हजारो कर्मचारी अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचे सदस्य आहेत. कोकणातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार डावखरे यांनी सातत्याने पुढाकार घेतला. अशासकीय शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात बैठका आयोजित करण्यासाठी प्रयत्न करून, अनेक प्रश्नांवर तोडगाही काढला. त्याचे कोणतेही श्रेय न घेता प्रामाणिकपणे शिक्षकेतर संघाला मदत केली. त्यामुळे संघाने सलग दुसऱ्या निवडणुकीत आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिला, असे संघाचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंह यांनी सांगितले. कोकणातील पदवीधर मतदारांपर्यंत शिक्षकेतर कर्मचारी पोचून डावखरेंचा मोठ्या मताधिक्याने विजय घडवून आणतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, यापूर्वी कोकणातील शिक्षकांची अग्रगण्य संघटना दिवंगत माजी आमदार स्व. रामनाथ मोते यांच्या विचाराने कार्य करणारी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना, आमदार किसन कथोरे यांचा महाराष्ट्र राज्य स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाने आमदार डावखरे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पदवीधर मतदारांबरोबर संपर्क साधला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *