भाजपा माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांचा इशारा
रोहिणी दिवाण
ठाणे : घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर ही ठाणे महापालिका प्रशासनाचे ठाण्यात ठिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग्ज बाबत कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. शहरात एखादी दुर्घटना घडून निरपराध माणसांचे जीव गमावण्याची हे सुस्त प्रशासन वाट पाहत आहे का असा प्रश्न ठाणेकर नागरिक विचारत आहेत. ठाणेकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि घाटकोपर सारखी दुर्घटना घडू नये यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना त्वरीत शहरांतील अनधिकृत होर्डिंग्ज मोजणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.अन्यथा महापालिकेच्या समोर तीव्र आंदोलन करण्याचा सज्जड इशारा भाजपाच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिला आहे. आज ठामपा समोर. अनधिकृत होर्डिंग्ज वर कारवाई करण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आले.त्या वेळी महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
ठामपा बरखास्त होऊन तीन वर्षे लोटली असून सध्या महापालिकेचा कारभार प्रशासन हाकत आहे. परंतू तत्पूर्वी २०१९ मध्ये तत्कालीन महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत प्रश्नोत्तराच्या तासाला आपण शहरातील अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग्ज संख्या बाबत माहिती विचारली असता अधिकृत होर्डिंग्जची संख्या ५९६ असल्याचे सांगण्यात आले होते.तर अनधिकृत होर्डिंग्ज बाबत कोणतीही मोजणी झाली नसल्याची माहिती दिल्यानंतर माजी महापौरांनी त्वरीत मोजणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. परंतू पाच वर्षांनंतरही सुस्तावलेल्या महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्ज बाबत कोणतीही मोजणी केली नसून कोणाच्या आशिर्वादाने ठाणे शहरात अनधिकृत होर्डिंग्ज लावून शहर विद्रूप केले जात आहे,असा संतप्त सवाल माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केला आहे. तरी घाटकोपर होर्डिंग्ज सारखी दुर्घटना होण्यापूर्वी अनधिकृत होर्डिंग्ज मोजणी करून त्वरीत होर्डिंग्ज काढण्याची कारवाई करण्यात यावी नाही तर महापालिका समोर तीव्र आंदोलन करू असा इशारा महापालिका प्रशासनाला दिला.