सहा मजली इमारतीला आग;
४१ भारतीय कामगारांचा मृत्यू
नवी दिल्ली : कुवेतमधिल एका निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यात ४१ भारतीय कामगारांचा समावेश आहे. हा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येतेय. कुवेतच्या मंगाफ येथे सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सहा मजली इमारतीला भीषण आग लागली. इमारतीच्या किचनला लागलेल्या आगीमुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.
कुवेतमधील भारतीय दुतावासाने याबाबत माहिती देताना म्हटले की, या दुर्घटनेत 30 पेक्षा जास्त कामगार जखमी झाले आहेत. येथील मंगाफ शहरात सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. ज्या इमारतीला आग लागली ती इमारत कामगारांच्या निवासासाठी वापरण्यात येत होती. या इमारतीमध्ये १६० जण राहत होते. हे सर्वजण एका कंपनीत काम करत होते. त्यांच्या निवासाची सोय या इमारतीमध्ये करण्यात आली होती.
कुवेतमधील भारतीय दुतावासानेही ट्विटरवरुन पोस्ट लिहिली आहे. भारतीय कामगारांशी संबंधित आगीच्या दु:खद घटनेनंतर तत्काळ मदतसेवेसाठी हेल्पलाईन नंबर 96565505246 जारी करण्यात आला आहे. सर्वच भारतीयांनी अपडेट माहितीसाठी या नंबरशी संपर्कात राहावे, सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे आवाहनही दुतावासाकडून करण्यात आले आहे.