विधानपरिषदेसाठी उमेदवार ठरले;

मुंबई : शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी उमेदवार आज फायनल झाले. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिमदिवशी मुंबई शिक्षक मतदार संघ वगळता उर्वरीत तीन जागांवर भाजपाप्रणित महायुती विरुध्द महाविकास आघाडी असा मुकाबला रंगणार असल्याचे स्पष्ट झाले. महाविकास आघाडीतील ठाकरे सेना आणि काँग्रेस यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपल्यातील वाद मिटविल्यामुळे ही लढत दुरंगी झाली आहे.

मुंबई शिक्षक मतदार संघात कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीचे सुभाष मोरे रिंगणात असल्याने लढत तिरंगी होईल.

 कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात मविआमधील ठाकरे गट आणि काँग्रेसनेही उमेदवार उभे केले होते. परंतु आज कोकण पदवीधरमधून ठाकरे गटाच्या किशोर जैन यांनी माघार घेतली आहे.  तर नाशिकमध्ये काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता कोकणातील जागेवर ठाकरे गटानं उमेदवार मागे घेतल्यानंतर भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर यांचा थेट सामना होणार आहे. तर नाना पटोलेंनी मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश सोनावणे यांना फोन करून उमेदवारी अर्जृ मागे घेण्यास सांगितलं आहे. त्यामुळे मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आता भाजपचे शिवनाथ दराडे, ठाकरे गटाचे ज.मो.अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. मुंबई पदवीधर मतदार संघात सलग पाच वेळा शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. यंदा येथून ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब उभे आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाने मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांनी उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे . मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ , तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे . मतदानाची तारीख २६ जून आहे. १ जुलैला मतमोजणी होईल.

मी मुंबई पदवीधरचा मतदार, माझं सर्टिफिकेट खरं- ठाकरे

मुंबई : मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी शिवसेनेने अनिल परब यांना उमेदवारी दिली आहे. ते वकिल आहेत. निवडून आल्यानंतर कोणती कामे करायचे याचे संकल्पपत्र आम्ही जाहीर केलेलं आहे. या मतदारसंघाचे वैशिष्ट्य असे की इथे जनता सुशिक्षित आहेत. मी अनिल परब यांना धन्यवाद देतो, त्यांनी माझा मतदार म्हणून उल्लेख केला. कारण माझं सर्टिफिकेट खरं आहे. बाकी काही मला म्हणायचं नाही”, असा टोला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई पदवीधरच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी अनिल परब यांना उमेदवारी दिली आहे. अनिल परब यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संकल्पनामा जाहीर केला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

गेल्या ५ टर्म तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून दिले. मी मुंबई पदवीधर मतदारसंघातील मतदारांना हात जोडून विनंती करतो, गेल्या ५ टर्म तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून दिले. त्या नात्याला आम्ही अधिक दृढ करु. आपल्या समस्या प्रामाणिकपणाने सोडवण्याचा प्रयत्न करु. पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेला आशीर्वाद द्याल, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *