प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा नगरपासून सुरू होणार.
मुंबई दि. १२ जून – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या थोडक्या अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता कंबर कसली असून विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे घोषवाक्य घेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिनांक १९, २०, २१ जून रोजी अहमदनगर इथून राज्यव्यापी दौऱ्याची आज पत्रकार परिषदेत घोषणा केली.सलग तीन दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान वेगवेगळ्या राजकीय लोकांचे पक्षप्रवेशही होणार आहेत. शिवाय नगर जिल्ह्यातील नगर शहर, कोपरगाव, अकोले या विधानसभा मतदारसंघात, शिवाय लोकसभा दक्षिणनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावाही सुनिल तटकरे घेणार आहेत.
लोकसभेच्या अधिवेशनात सुरुवातीचा लोकसभा सदस्य म्हणून जी शपथ घ्यावी लागेल तो कालावधी सोडता उर्वरित कालावधी महाराष्ट्रामध्ये संघटनेची पुनर्बांधणी विशेष करुन ज्या – ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सदस्य आहेत त्या मतदारसंघाचा संघटनेचा व्यापक दौरा करण्याचे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार या दौऱ्याची घोषणा आज सुनिल तटकरे यांनी केली.
४० वर्षात लोकसभा निवडणुका जवळून पाहिल्या आणि लढल्या आहेत. पाचवेळा विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलो आहे असे सांगतानाच प्रत्येक निवडणूक एक वेगळे परिमाण घेऊन येत असते. २००४, २००९, २०१४,२०२४ ची निवडणूक असेल या निवडणुकीची वेगळी समीकरणे राहिली आहेत. तर विधानसभेलाही वेगळी समीकरणे पहायला मिळाली असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात आलेले जे कौल बघितले तर महायुतीला जे अपेक्षित यश अभिप्रेत होते. ते आम्ही मिळवू शकलो नाही. हे निर्विवाद सत्य आहे. जनतेने दिलेला कौल स्वीकारला आहे. अल्पसंख्याक व मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज या निवडणुकीत आमच्यापासून दूर गेलेला दिसला. या सर्वच घटकांशी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप मतदानासाठी नव्हे तर विचाराच्या माध्यमातून राज्याच्या वेगवेगळ्या भागात त्या त्या पक्षाशी जोडले गेले होते. मात्र शेतकऱ्यांच्या मनात कांदा, सोयाबीन, कापूस हे सर्व प्रश्न एकाचवेळी निर्माण झाले आणि त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवू शकलो नाही. याही गोष्टींची जाणीव असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे मतदान होत असते आणि विधानसभेला वेगळे होत असते. या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही अनुभवायला मिळाले त्यावरून सखोल विचार आम्ही करणार आहोत. राज्यात झालेल्या लोकसभा निवडणूक निकालाचे सूक्ष्मपणाने अवलोकन केले आहे. बारकावेही समजून घेतले आहेत. प्रादेशिक विभागात घडलेल्या निकालाचा विचारही केला. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत प्रकर्षाने काम करणार आहोत असे सुतोवाचही सुनिल तटकरे यांनी केले.
गेले सात – आठ दिवस जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्याबाबतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत एक नकारात्मक भावना निर्माण करण्यात आली. काही ठिकाणी सहानुभूती बोलण्यात आली. ती असू शकते ते नाकारत नाही ती निवडणूकीपूरती सिमीत असते असेही सांगताना सन १९८४, १९८९,१९९०, १९९१, १९९५, १९९६, १९९८, अशा कालावधीत कसे चित्र बदललेले दिसले हा अनुभवही सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितला.
आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह आहे, आत्मविश्वास आहे. निवडणूकीत आलेल्या अपयशामुळे फार कुणी आत्मविश्वास गमावलेला नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा राज्यव्यापी संघटनेचा दौरा करत असल्याचे सुनिल तटकरे म्हणाले.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर अजितदादा पवार यांच्या राज्यव्यापी दौर्याचे नियोजन करत आहोत असेही सुनिल तटकरे यांनी जाहीर केले.
या निवडणुकीत एक बाब प्रकर्षाने जाणवली की, निवडणूकांची तारीख जशी जवळ आली तसा अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी एक विशेष मोहीम जाणीवपूर्वक राबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात यश आले असेल मी नाकारत नाही किंवा ती बाजू समजावण्यात आम्ही कमी पडलो असे स्पष्ट करतानाच या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आता काम करत आहोत हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.
नगरला जो काहींचा वर्धापन दिन साजरा झाला त्यात डॉक्टर, वकील जितेंद्र आव्हाड यांचे भाषण ऐकले, त्यांनी चारवेळा पवारसाहेबांनी अजितदादांना वेडं बनवले असे वक्तव्य केले. जे आम्ही सांगत आलो तेच म्हणजे २०१४, २०१६, २०२२ मध्ये भाजपसोबत जायचे हे ठरले होते त्यावर शिक्कामोर्तब डॉक्टरांनी केले त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे उपरोधिकपणे आभार मानले.
जयंत पाटील हे गेली सहा वर्षे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना व्यासपीठावरुन मी फक्त चार महिने आहे हे सांगावे लागले. तुम्ही चार महिने सोशल मीडियावर बोलू नका हेही सांगावे लागले. चार महिन्यानंतर अध्यक्ष पद सोडणार आहे. निवडणूकीच्या यशानंतर एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला या पध्दतीच्या भावना राष्ट्रीय नेतृत्वासमोर बोलाव्या लागतात हे कशाचे द्योतक आहे.म्हणून काचेच्या घरात राहणार्यांनी दुसर्याच्या घरावर दगड मारु नये असा खरमरीत टोला सुनिल तटकरे यांनी लगावला.
आता महाराष्ट्रात गेली २५ वर्षे अविरत २४ तास राबणाऱ्या अजितदादांच्या पाठीशी सहानुभूती तयार होईल आणि महायुती म्हणून आम्ही निवडणूकीला सामोरे जाऊ असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, संजय तटकरे उपस्थित होते.
0000
Photo-6
मुख्यमंत्र्यांच्या मंजूर निधीतील कामांचा प्रताप सरनाईक लावणार धडाका !
अनिल ठाणेकर
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या राज्य शासनाच्या निधीतील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांचा, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक हे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मदतीने धडाका लावणार आहेत.
विधानसभेच्या आचारसंहितेनंतर २६ जून २०२४ पर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता चालू असल्यामुळे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील अनेक कामे प्रलंबीत आहेत. त्याचबरोबर पावसाळ्यापुर्वीची काही कामे थांबलेली असल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले असल्याने मतदारसंघातील नागरिकांनी केलेल्या विविध तक्रारींवरून सोमवारी, १० जून, २०२४ रोजी आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन २६ जून रोजी आचारसंहिता संपल्याबरोबर व ऑक्टोबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मतदारसंघातील प्रलंबीत विकास कामे पुर्ण करण्यासंदर्भात चर्चा केली असता आयुक्तांही संबंधित सर्व अधिकार्यांना प्रशासकीय स्तरावर असलेल्या सर्व मंजूर्या तात्काळ मंजूर करण्याच्या सुचना केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या राज्य शासनाच्या निधीतील खालील कामांविषयी चर्चा झाली.
१)ठाणे महानगरपालिका हद्दीतील ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील माजिवडा, मोघरपाडा, वाघबीळ, येऊर, रामबाग येथील स्मशानभुमीचे अद्ययावत पध्दतीने नुतनीकरण / सुशोभिकरण करणे.
२) ठाणे महानगरपालिका हद्दीतील उपवन परिसरामध्ये महापौर निवासाशेजारील महापालिकेच्या मोकळ्या भुखंडावर उपवन जिमखाना बांधण्यासाठी.३) पोखरण रोड नं. २ वरील कॉसमॉस होरायझन लगत ठा.म.पा. सुविधा भुखंडावर ऑलम्पिक साईज तरण तलाव व जिमन्याशियम बांधणे.४) आनंदनगर येथील महानगरपालिकेच्या हॉस्पिटल शेजारील उद्यानाच्या आरक्षित जागेच्या १५ टक्के जागेवर तरण तलाव व जिमन्याशियम बांधणे. ५) वाघबीळ गावाशेजारील उद्यानासाठी आरक्षित असलेल्या व महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या जागेवर तरण तलाव व जिमन्याशियम बांधणे. ६) माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील विहंग हिल्स येथील ठाणे महानगरपालिकेच्या आरक्षित मैदानाच्या जागेवर ऑलम्पिक साईज तरण तलाव व जिमन्याशियम बांधणे.७) मानपाडा येथील कॉसमॉस लॉन्ज सुविधा भुखंडावर ज्येष्ठ साहित्यकार बाबुराव सरनाईक ज्येष्ठ नागरिक भवन उभारणे.८) मानपाडा येथील कॉसमॉस लॉन्ज सुविधा भुखंडावर कै. इंदिराबाई बाबुराव सरनाईक महिला बचत गट भवन उभारणे. ९) ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर रोड येथील कासारवडवली पोलीस स्टेशन जवळील विकास प्रस्ताव क्र. ८९/१२९ या सुविधा भुखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व विपश्यना केंद्र बांधकाम करणे. १०) ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील नळपाडा येथील इमारतीमध्ये स्व. इंदिराबाई बाबुराव सरनाईक हॉस्पिटलसाठी विविध स्थापत्य व इतर आवश्यक कामे करणे. ११) ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील प्र.क्र. ७ मध्ये इंडिया बुल्स येथील आरक्षित भुखंडावर लेवा पाटील भवन उभारणे.
१२) ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील प्र.क्र. ५ मध्ये गणेशनगर येथील समाज मंदिराची पुर्न:बांधणी करणे. १३) ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील कासारवडवली येथील पुराणिक बिल्डर्सच्या सुविधा भुखंडावर विविध समाज भवन उभारणे.१४) ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील कासारवडवली मार्केटची पुर्न:बांधणी करणे. १५) ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील शिवाईनगर येथील बंद सेप्टीक टँकच्या जागेवर समाज मंदिर उभारणे. या बैठकीमध्ये शहर अभियंता श्री. सोनाग्रा, कार्यकारी अभियंता श्री. संजय कदम, श्री. अतुल कुलकर्णी, उपनगर अभियंता श्री. शैलेंद्र बंडाळे, कार्यकारी अभियंता श्री. सुनिल पाटील, सहाय्यक संचालक नगररचनाकार श्री. संग्राम वाठाडे, उपनगर अभियंता श्री. विनोद पवार, प्ल्यटीनम हॉस्पिटलचे डॉ. संजित पॉल, श्रीमती. राणी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
