देवेंद्र फडणवीसांचा एल्गार
मुंबई : महाराष्ट्रात आपण डाऊन झालोय, आऊट नाही… येणारी विधानसभेची निवडणूक नव्या जोमाने लढविणार आणि दणक्यात जिंकणार अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांविरोधात एल्गाल पुकारला. दादर येथील वसंत स्मृती येथे भाजपा प्रदेश बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. राज्यातील पक्षाच्या पराभवानंतर आज प्रदेश बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याला राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंसह भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, नवनिर्वाचि आमदार, खासदार मंत्री उपस्थित होते.या बैठकीत राज्यातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला.
“महाराष्ट्रातही पॉलिटिकल अर्थमॅटिक आपल्या विरोधात गेलं हे खरं आहे. पण मतांमध्ये कुठेही कमतरता पडली नाही. आपल्या ४३.६ टक्के इतके मतदान झाले. त्यांचे ४३.९ टक्के आहे. फक्त ००.३० इतकाच फरक आहे. त्यामुळे त्यांना विजय मिळाल्याचा आभास तयार करता आला. भाजपाच्या १३ जागा अशा आहेत ज्या चार टक्केंपेक्षा कमी मतांनी आपण हरलो आहोत. जे जिंकले त्यांना शुभेच्छा आहे. आता आपल्याला जे मिळालंय ते पुढे घेऊन जाऊ. ज्या पक्षाला एकेकाळी दोन खासदारांवरुन हिणवलं होतं त्या पक्षाच्या नेत्यांनी रेकॉर्ड केला आणि पंडीत नेहरुंच्या नंतर मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
देशात संपूर्ण इंडिया आघाडी मिळून जेवढ्या जागा मिळाल्या त्याहून जास्त जागा भाजपाला मिळाल्या. आपली लढाई फेक नरेटिव्हशी होती. ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या ठिकाणी आपण इंडिया आघाडीशी हरलो नाही, फेक नरेटिव्हमुळे कमी पडलो आहे. देशातल्या ७६ जागा अशा आहेत जिथे कमी फरकाने आपण पडलो. संविधान बदलणार या खोट्या प्रचारामुळे या गोष्टी घडल्या.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“फेक नरेटिव्ह फॅक्टरीला सोशल मीडियावर आपण तेवढ्या ताकदीने उत्तर देऊ शकलो नाही किंवा डॅमेज इतकं होतं आहे हे लक्षात आलं नाही. त्यामुळे कमी फरकाने आपण देशात ७६ सीट हरलो. काही लोक डमरु वाजवत आहेत, काही लोक छाती बडवत आहेत, त्या सगळ्यांना मी सांगतो फेक नरेटिव्ह एकदा चालतो तो वारंवार चालत नाही. यंदा विधानसभेत तर आपण जास्त जागा जिंकूच पण महापालिका निवडणूक कधीही येऊद्या महानगरपालिकेवर आपला भगवा फडकणारच. असा निर्धारही देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
“मुंबईत लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या चार जागा कुठून आल्या हे नीट पाहिलं तर लक्षात येईल की सामान्य मुंबईकर आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही. मुंबईत असलेल्या, चार पिढ्या मुंबईकर असलेल्या उत्तर भारतीयांनी मतदान केलेलं नाही. त्यांना नेमकं कुठून मतदान मिळालं तर लक्षात येईल की मागचे चार महिने ज्यांचे पाय ते पकडत होते, ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदू बांधवांनो भगिनींनो म्हणलं सोडलं होतं. केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी अर्थमॅटिक जिंकलं आहे. असं फडणवीस म्हणाले.
