नगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी काल पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणे याच्या निवासस्थानी जाऊन त्याचा सत्कार स्वीकारल्याच्या बातमीने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आज दिवसभर विविध वृत्तवाहिन्या ते वृत्त दाखवत असून त्यावर विविध पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. एकंदरीतच या प्रकारामुळे निलेश लंके यांच्यासमोरील अडचणी तर वाढणार नाहीत ना अशी शंका व्यक्त होत आहे.
गजा मारणे हे नाव पुण्याच्या वातावरणात काही नवीन नाही. एक कुख्यात गुंड म्हणून हा माणूस खूप प्रसिद्ध आहे . तो एक गँगस्टर असावा अशीही शंका घेण्यास वाव आहे. काही महिन्यांपूर्वी एका प्रकरणात तुरुंगात असताना जामिनावर सुटला त्यावेळी येरवडा तुरुंगापासून तर त्याच्या निवासस्थानापर्यंत त्याच्या समर्थकांनी भव्य मिरवणूकही काढली होती. एरवी अशा मिरवणुका राजकीय नेत्यांच्या निघतात. म्हणजेच गजा मारणे हा एखाद्या राजकीय नेत्यापेक्षा कुठेही कमी नाही असा निष्कर्ष काढता येतो.
अशा गुंडाच्या निवासस्थानी एखाद्या राजकीय लोकप्रतिनिधीने जावे हा विषय वादग्रस्त झाला नाही तरच नवल. त्यावर निलेश लंके यांनी खुलासा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार “मी त्या वस्तीत एका समर्थकाकडे गेलो असताना रस्त्यात मला गजा मारणे भेटले, त्यांची माझी यापूर्वी ओळखही नव्हती. त्यांनी मी त्यांच्या घरी यावे असा आग्रह केला, म्हणून मी थोडा वेळासाठी त्यांच्या निवासस्थानी गेलो. तिथे त्यांनी माझा सत्कार केला. तोवर मला ही व्यक्ती कोण आहे याची कल्पनाही नव्हती. अन्यथा मी गेलोच नसतो, असा दावा त्यांनी केला आहे.
मात्र हा दावा कुठेतरी न पटणारा आहे. अशा कुख्यात व्यक्तींसोबत राजकीय नेत्यांचे फोटो प्रसिद्ध होणे ही काही आजची बाब नाही. यापूर्वी देखील अनेक नेत्यांचे असे अनेक फोटो प्रसिद्ध झाले आहेत. काही दिवसांपूर्वी एका महिला पोलिसांनी नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत यांच्या श्रीमुखात भडकवलेची बातमी आली होती. दोन दिवसांपूर्वीच ती महिला पोलीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि होऊ घातलेले लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या समवेत उभी आहे असे छायाचित्र समाज माध्यमावर व्हायरल होते आहे, त्याचबरोबर या थप्पडमार प्रकरणास राहुल गांधींचा आशिर्वाद असल्याचेही बोलले जाते आहे.त्यामुळे अशी छायाचित्रे ठीक ठिकाणी व्हायरल होत असतात . आणि त्यावरून राजकीय नेत्यांना बदनाम करण्याचाही प्रयत्न केला जात असतो.
सर्वसाधारणपणे अशा व्यक्ती कोणत्याही राजकीय नेत्याला एखाद्या समारंभात भेटतात. तिथे व्यासपीठावर जाऊन त्याला पुष्पहार घालतात, किंवा पुष्पगुच्छ देतात, आणि त्यावेळचा फोटो काढून तो सर्वांना दाखवत आपण या नेत्याचे किती जवळचे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. यात बरेचदा तो नेता बदनामही होतो. काही वेळा अशा व्यक्ती त्या नेत्याच्या घरी जातात आणि फोटो काढून घेतात. अशावेळी चार लोक उभे असताना या व्यक्तीची माहिती असूनही लोकनेत्यांना फोटोसाठी नाही म्हणणे शक्य होत नाही. त्यामुळे असे फोटो काढले जातात आणि ते प्रसारितही केले जातात.
मात्र अशा नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीने एखाद्या कुख्यात गुंडाच्या घरी जाणे आणि त्याचा सत्कार स्वीकारणे हे कुठेतरी खटकणारेच वाटते. साधारणपणे एखाद्या समारंभात व्यासपीठावर आला किंवा रस्त्यात भेटल्यावर नमस्कार चमत्कार झाले किंवा अशी कुख्यात व्यक्ती घरी आली तर त्याला टाळता येत नाही. मात्र त्याच्या घरी जाणे आणि त्याचा सत्कार स्वीकारणे हे तर टाळता येते ना. त्यामुळेच निलेश लंकेचे हे वागणे वादग्रस्त ठरू शकते हे नक्की. आपल्याला ही व्यक्ती अचानक रस्त्यात भेटली आणि या व्यक्तीने घरी चहा घेण्यास या, असा आग्रह केला म्हणून मी गेलो, असा खुलासा निलेश लंके यांनी केला आहे.
मात्र एकदम अनोळखी व्यक्तीच्या घरी आपण जाऊ का याचे उत्तरही त्यांनी द्यायला हवे. गजा मारणे हा त्यांचा कार्यकर्ता नसावा, त्याची निवडणुकीच्या दरम्यान कुठेही मदतही झाली नसावी, मग अशावेळी त्याचा चहाच्या कपाचा आग्रह लंकेना सहज टाळता आला असता. अशावेळी सोबतच्या कार्यकर्त्यांना ते किमान विचारून मग तरी ठरवू शकले असते. सोबतच्या एखाद्या तरी कार्यकर्त्याने त्यांना सांगितले असते आणि हा गजा मारणे कोण आहे ते त्यांनी जाणून घेतले असते आणि मग ठरवले असते तर ते उचित राहिले असते. मात्र सोबतच्या एकाही कार्यकर्त्याने त्यांना कल्पना देऊ नये हे न पटणारे आहे. जर सोबतचा कोणीही कार्यकर्ता गजा मारणेला ओळखणारा नसेल, तर मग अशा अनोळखी व्यक्तीकडे जाणे कितपत योग्य आहे? त्यातही लंके आपल्या मतदारसंघात नव्हते. जर ते मतदार संघात असते तर अनोळखी व्यक्ती देखील आपला मतदार असू शकते या भावनेतून ते भेटले असते, किंवा घरी गेले असते, तर ते क्षम्य होते. मात्र ते मतदार संघाबाहेर होते, आणि त्यात निवडणुकाही आता संपलेल्या आहेत. त्यामुळे या कुख्यात व्यक्तीवर त्यांनी अचानक अशी मेहरबानी का केली हा प्रश्न निश्चित विचारला जाऊ शकतो. इथे आणखी एक मुद्दा विचारात घ्यायला हवा. निलेश लंके गजा मारणे कडे गेले आणि त्यांचा सत्कार स्वीकारला याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सर्व माध्यमांवर प्रसारित झाली आहेत. याचाच अर्थ गजा मारणेने आपल्याकडे लंके येणार आहेत असे सांगून मध्यम प्रतिनिधी आणि छायाचित्रकार यांना आगाऊ निमंत्रण दिले असू शकते. जर आगाऊ नियंत्रण दिले असेल तर मग ही भेट पूर्वनियोजितच म्हणायला हवी. पुण्यासारख्या शहरात ऐनवेळी रस्त्यात नेता भेटला आणि तो घरी आला म्हणून माध्यम प्रतिनिधी आणि माध्यम छायाचित्रकार उपलब्ध होऊ शकत नाहीत हे नक्की. राजकीय जीवनात कोणत्याही लोकनेत्याला स्वतःचे स्वच्छ प्रतिमा जपणे अतिशय गरजेचे असते. १९९४-९५ च्या दरम्यान शरद पवारांच्या कार्यालयातून एका परदेशातील दहशतवाद्याला आणि एका गँगस्टरला फोन केले गेले असल्याचा विरोधकांनी आरोप केला होता. ते फोन पवारांनीच केले होते का याचे उत्तर आजही कोणी देऊ शकणार नाही. मात्र त्या मुद्द्यावरून पवारांना भरपूर बदनाम केले गेले होते. अशाच प्रकारे पवारांच्या सरकारी विमानातून दोन कुख्यात दहशतवादी गेल्याचाही आरोप झाला होता. १९९५ च्या आणि १९९६ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवारांना अडचणीत आणण्यासाठी हे संदर्भ प्रामुख्याने वापरले गेले होते. म्हणूनच राजकीय नेत्यांनी तारतम्य बाळगणे गरजेचे असते. राजकीय नेते त्यामुळेच निवडणुकांचा कालखंड सोडून एरवी कोणाकडेही जायचे असेल किंवा कोणताही कार्यक्रम स्वीकारायचा असेल तर संपूर्ण चौकशी करून घेत असतात. प्रसंगी ते पोलीस रेकॉर्डही तपासतात आणि प्रसंगी कार्यकर्त्यांचीही मदत घेतात. मात्र नेमकी माहिती मिळेपर्यंत ते कोणत्याही कार्यक्रमाला स्वीकृती देत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. अशावेळी लंकेंनी अशी घोडचूक कशी केली हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे.
घडलेली घटना आणि त्यावर लंकेने केलेला खुलासा हे बघता त्यांचे आणि गजा मारण्याचे आधीचे काहीतरी संबंध असावे, असा निष्कर्ष काढता येतो. संबंध असायला काहीही हरकत नाही. राजकीय व्यक्तीला सर्वच क्षेत्रांमध्ये संबंध ठेवावे लागतात. मात्र काही व्यक्तींना चार हात दूर ठेवूनच संबंध जपावे लागतात. इथे एक संत वचन आठवते.
सर्प विंचू नारायण.. परी ते वंदावे दूरून..
हे वचन पुरेसे बोलके आहे. अशा सर्व स्तरातील व्यक्तींशी राजकीय नेत्यांचे संबंध असले तरी कुणाला किती जवळ करावे याचे भान राजकीय नेत्याला सांभाळावे लागते. निवडणुकीच्या काळातही एखादी व्यक्ती रस्त्यात भेटली तर लगेच कोणीही नेता त्याच्या घरी जात नाही. रस्त्यातच राम राम करून मला मते द्या आणि इतरांनाही सांगा अशी कळकळीची विनंती करून पुढला प्रवास सुरू करतो. त्यामुळे लंकेचा हा खुलासा देखील लवकर पटत आणि पचतही नाही हे निश्चित. आता या प्रकारावर घटनेवर बरेच राजकारण होणार हे नक्की आहे. कदाचित पुढल्या निवडणुकांमध्ये या भेटीची व्हिडिओ क्लिप ही दाखवली जाईल आणि लंके यांचे जितके जास्त चारित्र्यहनन करता येईल तितके केले जाईल. एकूणच हा प्रकार लंकेंना अडचणीचा ठरणार आहे. भविष्यात तरी ते याची काळजी घेतील अशी आशा करू या. तसे न केले तर ते एक अपरिपक्व राजकारणी म्हणून इतिहासात नोंदले जातील.
