श्रद्धांजली
स्वाती पेशवे
दूरदृष्टी, उद्यमशीलता आणि धडाडी असेल तर सामान्य घरातील माणूसही किती मोठी मजल मारु शकतो, हे रामोजी राव यांच्या जीवनचरित्रातून समजते. जागतिक पातळीवर नोंद घेतली गेलेल्या रामोजी फिल्म सिटीप्रमाणेच ‘ईनाडू’, ‘ई-टीव्ही’ सारख्या माध्यमातून त्यांनी मनोरंजन, प्रकाशन, टेलिव्हिजन क्षेत्रात ठसा उमटवलाच खेरीज अन्य व्यवसायक्षेत्रांमध्येही ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्याचा हा आठव…
रामोजी ग्रुपचे अध्यक्ष आणि ई-टीव्ही ग्रुपचे प्रमुख रामोजी राव यांच्या निधनामुळे देशातील एक द्रष्टा उद्योजक काळाच्या पडद्याआड गेल्याची सार्वत्रिक भावना व्यक्त झाली. आंध्र प्रदेशातील पेडापापरपुडी येथे एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रामय्या अर्थात रामोजींनी विविध क्षेत्रामध्ये अनमोल कामगिरी बजावून प्रसिद्धीची शिखरे पादाक्रांत केली असली तरी शेतीशी असणारे त्यांचे घट्ट संबंध अखेरपर्यंत अभंग होते. साहित्याचा उत्तम अभ्यास असणारी ही व्यक्ती नंतरच्या काळात यशस्वी व्यापारी आणि माध्यम उद्योजक म्हणून ख्यातकीर्त झाली.
10 ऑगस्ट 1974 रोजी विशाखापट्टणममध्ये सुरू केलेल्या त्यांच्या ‘ईनाडू’ या वृत्तपत्राला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. पुढील चार वर्षांतच तेे मोठे प्रकाशन झाले. ‘ईनाडू’ व्यतिरिक्त रामोजी राव जगातील सर्वात मोठे फिल्म प्रोडक्शन हाउस असणाऱ्या ‘रामोजी फिल्म सिटी’, ‘रामोजी ग्रुप’, ‘ई टीव्ही नेटवर्क’ आणि फिल्म प्रोडक्शन कंपनी असणाऱ्या ‘उषा किरण मूव्हीज’ चे प्रमुख होते. खेरीज ‘मार्गदर्शी चिट फंड’, ‘रमादेवी पब्लिक स्कूल’, ‘डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स’ आणि ‘प्रिया फूड्स’ यासारखे इतर व्यवसायही रामोजी ग्रुपच्या मालकीचे आहेत.
अशा नानाविध क्षेत्रात ठसा उमटवला असला तरी आजही सर्वसामान्यांमध्ये आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या आणि 1996 मध्ये बांधल्या गेलेल्या रामोजी फिल्म सिटीचे महत्त्व काही वेगळेच म्हणावे लागेल. ती रामोजी रावांची सर्वात मोठी कामगिरी मानली जाते. काळाच्या पुढे जाऊन विचार करत प्रत्यक्षात उतरलेले त्यांचे हे स्वप्न आजही बघणाऱ्याला चकित करणारे आहे. या फिल्मसिटीमध्ये अनेक मोठे स्टुडिओ असून तिथे अनेक चित्रपटांचे सेट उभारले जातात. ‘चेन्नई एक्सप्रेस’पासून ‘बाहुबली’पर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. होय, ‘बाहुबली’ चित्रपटात दाखवलेला तो मोठा धबधबा फिल्मसिटीमध्येच बांधला गेला होता…! ‘पुष्पा 2’, ‘सालार’, ‘आरआरआर‘ सारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे शूटग त्यांच्या फिल्मसिटीमध्ये झाले आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ मधील ‘बन के तितली…’ हे गाणे तसेच विद्या बालनच्या ‘डर्टी पिक्चर’मधील ‘ओ ला ला…’ हे गाणेही येथे शूट करण्यात आले आहे. ही यादी कितीही लांबू शकते. पन्नासहून अधिक लहान-मोठ्या सुंदर बागा, 50 पेक्षा जास्त स्टुडिओ, अधिकृत सेट, डिजिटल फिल्म मेकग सुविधा आणि उच्च-तंत्रज्ञान प्रयोगशाळा असे इथले वैभव अचंबित करणारे आहे. त्यामुळेच 1,666 एकरमध्ये पसरलेली रामोजी फिल्म सिटी चित्रपट निर्मात्यांबरोबर मनोरंजनविश्वाबद्दल, फिल्म मेकगबद्दल अधिक काही जाणून घेणाऱ्यांचे आकर्षणकेंद्र राहिलेली दिसते. या सिटीला पर्यटन स्थळ बनवण्याची दूरदृष्टी दाखवल्यामुळेच आज जगभरातून दररोज काही हजारांच्या घरात लोक येथे येतात. आज परिस्थिती अशी आहे की, एखादा पर्यटक हैदराबादला गेला आणि रामोजी फिल्मसिटीला भेट दिली नाही तर सहल अपूर्ण समजतो.
सर्वसामान्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी या अनोख्या सिटीमध्ये वेळोवेळी कार्निव्हल आयोजित करण्यास सुरूवात केली. दसरा-दिवाळी, नवीन वर्ष कवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आयोजित होणारे या कार्निव्हल्सच्या आयोजनातूनही राव यांची व्यावसायिक दृष्टी दिसून येते. या कार्निव्हल परेड लहानग्यांबरोबर सर्व वयोगटातील लोकांसाठी आकर्षणाचे केंद्रबदू ठरल्या. विदूषक, नर्तक, जुगलबंदी आणि आनंदाचे इतर सर्व रंग मिसळल्याने त्याला मोठी पसंती मिळाली. रामोजी फिल्मसिटीमध्ये प्रत्येक रंगाच्या फुलांची अभूतपूर्व विविधता बघायला मिळते. ड्रीम व्हॅली पार्कमधील कारंज्यांभोवती फेरफटका मारताना स्वप्नातील खोऱ्यात आल्याचा भास होतो. अंब्रेला गार्डनमध्ये फुलांपासून बनवलेल्या छत्र्यांच्या रांगा मनोवेधक ठरतात. निमल गार्डनमध्ये अनेक वन्य प्राण्यांच्या आकृती एखाद्या अभयारण्यात आल्याचा भास निर्माण करतात. चहाच्या बागेचा देखाव्यामुळे तर प्रेक्षकांना आसाम कवा दार्जिलगमध्ये असल्यासारखे वाटते तर दुसरीकडे जपानी गार्डनमध्ये पर्यटकांना आपण जपानमध्येच पोहोचल्याचा भास होतो. त्याचप्रमाणे डेझर्ट गार्डन आणि कॉम्बो गार्डनचे विलोभनीय दृश्यही बघणाऱ्याला भुरळ घालते. या जादूई नगरीची आणखीही अनेक वैशिष्ट्ये रामोजींची सौंदर्यदृष्टी आणि कल्पकता दाखवणारी ठरते. जगातील सर्वात मोठ्या फिल्म सिटीसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेल्या ‘रामोजी फिल्म सिटी’त अनेकांनी असा विलोभनीय अनुभव घेतला आहे.
रामोजी फिल्म सिटीची सैर केल्यामुळेच सर्वसामान्यांना चित्रपटांमध्ये पाऊस कसा पडतो, विजांचा गडगडाट कसा होतो, ॲक्शन सीन कसे शूट केले जातात, चित्रपटांमध्ये रेल्वे स्थानके आणि विमानतळ कुठून येतात, चित्रपटामध्ये शहरे कशी असतात, गावे कशी असतात? इमारती बहुउद्देशीय कशा असू शकतात हे सगळे समजले. एकच इमारत चार वेगवेगळ्या प्रकारे कशी वापरली जाते, हे दाखवणारा धडा रामोजी राव यांनी अत्यंत कल्पनेतेने त्यांच्यासमोर मांडला. म्हणूनच त्यांच्या या अनोख्या प्रयोगाला आणि प्रकल्पाला जगाची दाद मिळाली. इथे देशभरातील सुमारे 750 कलाकार कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज असतात. चित्रपट निर्मितीशी निगडीत अडचणी पाहून त्यांनी अशा फिल्मसिटीची कल्पना केली होती ज्यात चित्रपट निर्माते फक्त स्क्रिप्ट घेऊन येतील आणि बनवलेला चित्रपट घेऊन परत जातील. अथक प्रयत्नांमुळेच त्यांनी आपले हे स्वप्न सत्यात उतरले. येथे दरवर्षी जवळपास 200 चित्रपटांचे चित्रीकरण होत असल्याचे बोलले जाते. आत्तापर्यंत येथे सुमारे 2,000 चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.
एकूणच रामोजींची जीवनकथा व्यवसायविस्तार कसा करावा, हे दाखवून देणारी आहे. त्यांनी उत्पन्नाचे अनेक स्त्रोत शोधले आणि कामात कमालीचे सातत्य राखत यशस्वी होण्याचा मंत्र जगाला दिला. म्हणूनच आज अब्जाधिश होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाने त्यांचे जीवनचरित्र अभ्यासायला हवे. कठोर मेहनत आणि काळाच्या पुढे जात, बाजारातील मागणीचा अभ्यास करत नियोजन केले तर एखादा सामान्य शेतकरी घरातील मुलगाही 41,706 कोटी रुपयांचा मोठा आकडा गाठीशी बांधू शकतो हे सत्य त्यांच्या विस्तारलेल्या साम्राज्याकडे पाहून समोर येते. आज त्यांचे ‘ई-टीव्ही नेटवर्क’ दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय नेटवर्क आहे. रामोजी राव तेलुगू बातम्या आणि मनोरंजन चॅनेलच्या मोठा समुहाचे अध्यक्ष होते. त्याच्या अनेक शाखा असून त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये कार्यक्रम आणतात. ‘ई-टीव्ही तेलुगु, ई-टीव्ही प्लस, ई-टीव्ही सिनेमा, ई-टीव्ही आंध्र प्रदेश, ई-टीव्ही तेलंगणा, ई-टीव्ही अभिरुची, ई-टीव्ही लाईफ यासारखी अनेक क्षेत्रे हा समूह कव्हर करतो. थोडक्यात रामोजींनी एकही संधी हातातून निसटू दिली नाही. मनोरंजन आणि प्रकाशन व्यवसायाबरोबर त्यांनी खाद्यपदार्थांचा व्यवसायही चालवला. त्यांनी ‘उषोदय एंटरप्रायझेस’ अंतर्गत ‘प्रिया आचार’ आणि ‘सोमा फ्रूट ड्रक’ सारखी उत्पादने लाँच केली. ईनाडूप्रमाणेच प्रिया आचार आजही आंध्र प्रदेशातील प्रत्येक घरात लोकप्रिय आहे. सोमा फ्रूट ड्रक देखील पॅकेटमध्ये विकले जाणारे पहिले पेय म्हणून ओळखले जाते. उद्यमशिलतेचा परिचय देणारी त्यांची ओळख कधीही मिटणार नाही.
दूरदृष्टी अशी असावी-भरत दाभोळकर, प्रसिद्ध माध्यम अभ्यासक
एखादा समारंभ वगळता माझी रामोजी राव यांच्याशी भेट झाली नसली तरी त्यांच्याविषयी बरीच माहिती होती. त्यांच्या ‘ईनाडू’ या समुहाशी आमचा सातत्याने संबंध यायचा. टेलिव्हिजन क्षेत्रात प्रवेश करुन वेगवेगळ्या भाषांमध्ये ‘ई टीव्ही’ सुरू केल्यानंतरही अनेकदा मी त्यांच्या समुहाच्या संपर्कात आलो. पण मुख्यत: फिल्म सिटीच्या निर्माणानंतर मी त्यांच्या कामाने विलक्षण भारावलो कारण भारतातील तशा स्वरुपाची ती पहिलीच फिल्म सिटी होती. ‘वॉक इन विथ द आयडिया अँड वॉक आऊट विथ द फिल्म’ अशीच या फिल्म सिटीची ओळख होती आणि आजही आहे. मुंबईतही फिल्म सिटी आहे पण रामोजी फिल्म सिटीची खासियत वेगळीच आहे. रामोजी मध्ये मी दोन-तीन चित्रपटांचे चित्रीकरण केले. त्यातील एका चित्रपटात कामही केले आहे. या दोन्ही भूमिकांमध्ये काम करताना मला रामोजी रावांचा दूरदर्शीपणा प्रकर्षाने जाणवला. चित्रपटात एखादे औषधांचे दुकान दाखवायचे असेल तर या सिटीमध्ये तुम्हाला औषधांनी भरलेले दुकानही उपलब्ध होते. तारे-तारकांच्या निवाससोयीसाठी इथे त्यांनी उभी केलेली ‘तारा’ आणि ‘सितारा’ ही दोन हॉटेल्सही सुंदर आहेत. खेरीज अन्य मदतनीसांना राहण्याचीही चांगली सोय आहे. एडिटग स्टुडिओ, रेकॉर्डिंग स्टुडिओ या वा यासारख्या सगळ्याच सुविधा असल्यामुळे चित्रपट निर्मितीची काम अतिशय सोपे झाले. मुख्य म्हणजे यातून त्यांचे व्हिजन दिसते, कारण ही फार आधीची बाब आहे. एखादा माणूस निरनिराळ्या क्षेत्रात किती शिताफीने काम करतो आणि प्रसिद्ध होवू शकतो याचे रामोजी राव हे ज्वलंत उदाहरण होते, असेच मी म्हणेन.
(अद्वैत फीचर्स)
