भिवंडी : भाजपा आमदार टी. राजा सिंह यांनी भिवंडी येथील धर्मसभेत पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राचा नारा दिला. भाजपाला लोकसभेत चारशेपारचा विजय मिळाला असता तर भारत हिंदूराष्ट्र झाले असते असेही टी. राज सिंह म्हणाले. राजा यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी भाजपावर संविधान बदलाची टिका केली आहे.

राजा यांनी भाषण करताना हिंदूंनी महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचे हात बळकट करायला हवेत, असं विधान केलं आहे. “आपल्याला सरकारचे हात मजबूत करायला हवेत. एकनाथ शिंदे हिंदू राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशाचा हिंदू तुमच्यासोबत आहे. मलंगगडाला मुक्त करा. शिंदेजी, तुम्हाला कुणाचं भय आहे? आमच्या सभांना आडकाठी आणली जातेय, महाराष्ट्रात येण्यापासून अडवलं जातंय, आमच्यावर एफआयआर टाकल्या जात आहेत. कुणाचं भय आहे? शिंदेजी घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत”, असं टी. राजा म्हणाले.

“तुमच्या आजूबाजूला काही सेक्युलर किडे बसले आहेत. पण त्यांच्याबाबतीत तुम्ही विचार करू नका. जो हिंदूंच्या हितावर बोलेल, तो महाराष्ट्रावर राज्य करेल”, असं सूचक विधानही टी. राजा यांनी केलं.

“माझ्या शिवाजी महाराजांनी, माझ्या संभाजीने महाराष्ट्रातल्या हिंदूंचं संरक्षण करण्यासाठी आपले प्राण दिले आहेत. आपण महाराष्ट्रात धर्मनिरपेक्षता वाढू देणार आहोत का? नाही. आपल्याला हिंदुत्व हवंय, आपल्याला धर्मनिरपेक्षता नकोय”, असं विधानही टी. राजा यांनी केलं आहे.

“हिंदू एकत्र आले तर हिंदू राष्ट्र बनेल हे आम्ही सांगतोय. पण आता असं वाटत नाही की आपण आपल्या भारताला हिंदू राष्ट्र घोषित करू शकू. ही धर्मसभा असली, तरी निवडणुकीच्या दृष्टीनेही आपण याकडे पाहायला हवं. आपले हिंदू कशाप्रकारे विभागले गेले आणि लव जिहादी कसे एकत्र आले. राजकारणावर मला बोलायचं नाहीये. पण राजकारणी नेत्यांशिवाय हिंदू राष्ट्र घोषित होऊ शकत नाही. यावेळी निवडणुकीत जर आपण ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या, तर हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं”, असा दावा त्यांनी केला. तसेच, “मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत हिंदू राष्ट्रासाठी प्रयत्न करत राहीन”, अशी शपथही त्यांनी उपस्थितांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *