मुंबई : लोकसभा निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले राखले असून आता पूर्ण ताकतीने विधानसभेच्या तयारीला लागा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
१९ जून रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. मात्र या निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक सक्षमपणे तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या.
