नवी दिल्ली : आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी एकदा नव्हे तर तब्बल दोनदा बंद दाराआड चर्चा केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कला उधाण आले आहे. भागवत आणि योगी यांच्या या भेटीमुळे राजकीय टेन्शन मात्र वाढले आहे.

सकाळी मोहन भागवत हे संघाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गोरखपूर येथील कैपियरगंज येथे पोहोचले. त्या ठिकाणी मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांची पहिली भेट झाली. या बैठकीनंतर योगी आदित्यनाथ हे पुन्हा गोरखरपूरमधील पक्कीबाग येथील सरस्वती शिशु मंदिरात रात्री साडेआठ वाजता मोहन भागवत यांना भेटले. यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड जवळापास ३० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मोहन भागवत यांनी गोरखपूरमध्ये येऊन योगी आदित्यनाथ यांची घेतलेली भेट ही समान्य भेट नव्हती, असे तीन दशकांपासून संघाशी संबंधित भाजपच्या एका नेत्याने सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, मोहन भागवत उत्तर प्रदेशातील पराभवामागील मुख्य कारणांबाबत योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार होते. याच कारणावरून या दोन्ही बैठका झाल्या असण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे एकीकडे लोकसभेच्या निकालानंतर संघाच्या मुखपत्रातून भाजपवर टीका करण्यात आली होती. तसेच, महाराष्ट्रात अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची किंमत केली, अशा प्रकारची टीकाही मुखपत्रातून करण्यात आली होती. असे असताना आता मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात ही बैठक झाल्याने अनेकांच्या भुवयादेखील उंचावल्या आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजप सर्वात मजबूत स्थितीत असल्याचे दिसत होते, परंतु निकाल त्याच्या उलट होते. येथील ८० जागांपैकी भाजपला केवळ ३३ जागा मिळाल्या. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने ७१ जागा जिंकल्या होत्या आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ६२ जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे, इंडिया आघाडीने ४३ जागा जिंकल्या आहेत. यापैकी सपाने ३७ तर काँग्रेसने सहा जागा जिंकल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *